महिलांच्या सुरक्षिततेसाठी जनजागृती मोहीम
By admin | Published: May 6, 2016 12:43 AM2016-05-06T00:43:03+5:302016-05-06T00:43:03+5:30
पोलीस विभागामार्फत उपलब्ध केलेल्या सुविधांची माहिती व्हावी, या उद्देशाने विविध शाळांना भेटी देऊन महिला पोलिसांनी जनजागृती मोहिम राबविली.
महिला पोलिसांचा उपक्रम: उपलब्ध सुविधांचा वापर करण्याचे आवाहन
भंडारा : पोलीस विभागामार्फत उपलब्ध केलेल्या सुविधांची माहिती व्हावी, या उद्देशाने विविध शाळांना भेटी देऊन महिला पोलिसांनी जनजागृती मोहिम राबविली. या मोहिमेला विद्यार्थींनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महिला सेल व दामिनी पथकाने महर्षी विद्या मंदिर बेला, रॉयल पब्लिक स्कुल, सेंट पिटर्स स्कुल बेला, सेंट मेरी स्कुल येथे भेटी दिल्यात. त्यांनी भंडारा पोलीस दलातर्फे महिलांच्या सुरक्षिततेसाठी नियंत्रण कक्ष भंडारा येथे उपलब्ध असलेले हेल्पलाईन क्रमांक (१०९१ व भ्रमणध्वनी क्रमांक ९४०५८३११०० , ९४०५८४११००) या क्रमांकावर दुरध्वनीव्दारे किंवा व्हॉटसअॅपव्दारे तत्काळ माहिती देऊन जिल्ह्यातील महिला व मुलींनी मदतीची मागणी करुन तत्काळ मदत घ्यावी, असे आवाहन केले. भंडारा विभागामध्ये महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकानातून जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी महिलांसाठी दामिनी पथकाची नेमणूक केली. दामिनी पथक महिलांच्या सुरक्षिततेसाठी भंडारा, कारधा, वरठी, जवाहरनगर आदी ठिकाणी शाळा, महाविद्यालय, बसस्थानक, रेल्वेस्थानक, बगिचा, पर्यटनस्थळ आदी ठिकाणी दरदिवशी भेटी देत आहेत. महिलांच्या गुन्ह्यांच्या प्रमाणावर आळा बसावा, यासाठी 'पेट्रोलिंग करीत आहेत. जिल्हा पोलीस दलातर्फे 'सिटीजन कॉप्स' व 'प्रतिसाद' या अॅपचे शुभारंभ करण्यात आला. या दोन्ही अॅपव्दारे कुणीही महिला, पुरुष अडचणीत असल्यास त्यांनी या अॅपवरुन मदतीची मागणी केल्यास मदत देण्याची उपाययोजना केली असल्याचे सांगण्यात आले. याप्रसंगी महिला सेलच्या सहायक पोलीस निरीक्षक एल.एन तोडासे म्हणाल्या, 'सिटीजन कॉप'मध्ये जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व पोलीस अधिकाऱ्यांचे दुरध्वनी क्रमांकाची यादी उपलब्ध आहे. 'प्रतिसाद'मध्ये आॅनलाईन तक्रार नोंदविली जाते. व्हिडीओ, आॅडिओ, व छायाचित्र पाठविण्याची सुविधा उपलब्ध आहे. काही महिला तक्रारदार सामाजिक, कौटूंबिक कारणावरुन पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात टाळाटाळ करतात. त्यामुळेच महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे मनोबल वाढते, महिलांवरील अत्याचारात वाढ होते. पोलीस विभागातर्फे उपलब्ध सुविधांचा वापर करून पोलिसांना सहाकार्य करावे, असे आवाहन तोडासे यांनी केले आहे.
मोहिमेत जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.एन. तोडासे यांच्या नेतृत्वात महिला पोलीस कर्मचारी मंदा ठवरे, प्रिती हलामारे, शालु चंद्रिकापुरे, मंदा वाघमारे, शिल्पा शेंडे, रुपाली नेवारे, पुजा बावनकुळे, तृप्ती खोब्रागडे सहभागी झाल्या होत्या. (नगर प्रतिनिधी)