गल्लीबोळात शिकवणी वर्गांची "दुकानदारी"
By admin | Published: May 27, 2017 12:26 AM2017-05-27T00:26:38+5:302017-05-27T00:26:38+5:30
शहरासह तालुक्यातील गल्लीबोळात शिकवणी वर्गाचे पेव फुटले आहे. गुणवंतांच्या टक्केवारीचे भांडवल करीत शिकवणी संचालक आपले खिसे भरीत आहेत.
आर्थिक पिळवणूक : गुणवंतांच्या टक्केवारीचे भांडवल
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरासह तालुक्यातील गल्लीबोळात शिकवणी वर्गाचे पेव फुटले आहे. गुणवंतांच्या टक्केवारीचे भांडवल करीत शिकवणी संचालक आपले खिसे भरीत आहेत. लाखो रुपये कमावणाऱ्या या शिकवणी वर्गांकडे कुणाचेही लक्ष नसते. सुविधांचा अभाव आणि अपुऱ्या जागेत विद्यार्थी शिकताना दिसतात.
स्पर्धेच्या युगात टक्केवारीला महत्व आले आहे. प्रत्येक पालकाला आपल्या मुलाला पैकीच्या पैकी गुण हवे असतात. त्यासाठी ते वाटेल ते करायला तयार असतात. याच मानसिकतेचा फायदा शिकवणी वर्ग चालकांनी घेतला आहे. उमरखेड शहरातील गल्लीबोळात शिकवणीवर्ग सुरू झालेले आहेत. दहावी, बारावी आणि उच्च शिक्षणाच्या शिकवणीचे ठिक आहे परंतु शहरात नर्सरीपासूनच शिकवणी घेतली जात आहे.
आपल्याकडे विद्यार्थी ओढण्यासाठी शिकवणी वर्ग चालकांमध्ये जाहिरातीचे युद्ध सुरू असते. लवकरच दहावीचा निकाल लागणार आहे. या निकालात गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचे फोटो काढून त्यांचे फ्लेक्स शहरात लावले जातात. त्यावर विद्यार्थ्यांच्या फोटोसह शिक्षकांचाही फोटो असतो. आमच्या शिकवणी वर्गात गुणवंत विद्यार्थी कसे घडतात, याचे गुणगाण या जाहिरात फलकात दिसून येते.
मात्र त्याच शिकवणीवगार्तील नापास झालेल्या विद्यार्थ्यांची जबाबदारी मात्र शिकवणी संचालक झटकतात. आमचे विद्यार्थी असले तरी त्यांनी अभ्यास केला नसेल असे सांगतात. गुणवंतांचे श्रेय घ्यायचे आणि नापासांना दूर करायचे असा हा प्रकार आहे. शहरात असलेल्या शिकवणी वर्गात विद्यार्थी नियमित येतात तर दुसरीकडे सर्व सुविधा असलेल्या महाविद्यालयाला मात्र बुट्टी मारतात. पालकही शाळा बुडली तरी चालेले शिकवणी बुडवू नको असे सांगतात.
शिकवणी वर्गात सुविधांचा अभाव
शहरातील शिकवणी वर्गात सुविधांचा अभाव आहे. एखाद्या कोंदट खोलीत बाकडे टाकून शिकवणीवर्ग भरविले जातात. एका-एका बाकड्यावर चार-चार विद्यार्थी बसलेले असतात. शाळेत नसेल एवढी गर्दी या वर्गात असते. अनेकदा तर शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षकाचा आवाजही जात नाही. आता तर शिकवणी चालकांनी पॅकेजेस सुरू केले आहेत. विविध विषयांचे पॅकेज घ्यायचे आणि विद्यार्थ्यांना गुणवंत करायचे, असा प्रकार सुरू असतो. विशेष म्हणजे लाखो रुपये कमावणाऱ्या या शिकवणी चालकांकडे आयकर विभागाचे लक्ष नसते.