कंत्राटी कामगारांचे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 10:52 PM2018-04-18T22:52:59+5:302018-04-18T22:52:59+5:30
राबराब राबूनही हक्काचे किमान वेतन मिळत नाही. प्राथमिक सुविधाही मिळत नाही. हक्काची मागणी केल्यास दमदाटी करून कामावरून कमी करणे या प्रकाराला सनफ्लॅगचे कर्मचारी कंटाळले होते. त्यामुळे या कंत्राटी कामगारांनी मंगळवारी दुपारपासून कंपनीच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनात कंपनीतील ३०० च्या वर कामगार सहभागी झाले होते.
तथागत मेश्राम
वरठी : राबराब राबूनही हक्काचे किमान वेतन मिळत नाही. प्राथमिक सुविधाही मिळत नाही. हक्काची मागणी केल्यास दमदाटी करून कामावरून कमी करणे या प्रकाराला सनफ्लॅगचे कर्मचारी कंटाळले होते. त्यामुळे या कंत्राटी कामगारांनी मंगळवारी दुपारपासून कंपनीच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनात कंपनीतील ३०० च्या वर कामगार सहभागी झाले होते.
मागण्यांबाबत व्यवस्थापनाशी चर्चा झाली; परंतु ठोस निर्णय न झाल्यामुळे कामगारांमध्ये असंतोष वाढला होता. त्यानंतर कामगारांनी कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ घोषणाबाजी केली. यावेळी कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांवर होणाऱ्या अन्यायाचा अनेकांनी पाढा वाचला. सायंकाळी काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना पटोले हे ठिय्या आंदोलनात सहभागी होऊन ते कामगारांसह कंपनीच्या गेटसमोर बसून होते. दरम्यान पोलीस प्रशासन व आंदोलनकर्ते यांच्यात शाब्दिक चकमक झाली.
यावेळी माजी आमदार मधुकर कुकडे, अॅड.आंनदराव वंजारी, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू कारेमोरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, वरठीच्या सरपंच श्वेता येळणे, झिया पटेल, अॅड.शशिर वंजारी, डॉ.पंकज कारेमोरे, प्रमोद तितीरमारे,माजी उपसरपंच मनोज सुखानी, प्रसन्न चकोले, अतुल भोवते, राजकपूर राऊत, चेतन ठाकूर, चेतक डोंगरे, पुष्पा भुरे, ग्रामपंचायत सदस्य संघरत्न उके, योगेश हटवार, विशाल शेंडे, अरविंद येळणे उपस्थित होते.
सायंकाळी ७.३० वाजता मध्यस्थी म्हणून व्यवस्थापन व आंदोलनकर्ते यांच्यात कंपनीच्या विश्रामगृहात चर्चा झाली. यावेळी कामगारांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी व कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. चर्चेअंती व्यवस्थापन व आंदोलनकर्ते ठोस निर्णयापर्यंत आले नाही. व्यवस्थापनाने वेळ मारून नेली. मागण्याबाबत पाहतो, तपासून घेतो आणि कळवतो, या व्यतिरिक्त तोडगा निघाला नाही. यावेळी सनफ्लॅग कंपनीचे एस. के. गुप्ता, एचआर विभागाचे उपमहाव्यव्यस्थापक सतीश श्रीवास्तव, संचालक दळवी, स्थायी कामगार संघटनेचे मिलिंद वासनिक, रवी बोरकर, किशोर मारवाडे, विकास बांते, महेश बर्वेकर यांच्यासह उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले, तहसीलदार सूर्यकांत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड हे उपस्थित होते. कामगारांचे हे आंदोलन रात्री १० वाजतापर्यंत सुरू होते.
या चर्चेत १० मागण्यांपैकी एकाही मागणीवर ठोस निर्णय झाला नाही. व्यवस्थापनाने मागण्यांबाबत निर्णय घेण्यास वेळ मागितला आहे. तूर्तास निर्णय न झाल्यामुळे कामगारांमध्ये रोष होता. सनफ्लॅग कंपनीला ३० वर्षे झाली. सुरूवातीचे आंदोलन सोडले तर ३० वर्षांपासून सुरळीत असून कालच्या आंदोलनाने भूतकाळातील घटनांची पुनरावृत्ती होण्याचे संकेत दिले आहे.