सुगरण पक्ष्यांची होणार आता गणना
By Admin | Published: June 4, 2017 12:15 AM2017-06-04T00:15:15+5:302017-06-04T00:15:15+5:30
मागील काही वर्षांत वाढती लोकसंख्या आणि वाढते सिमेंटचे जग त्यामुळे सुगरण पक्षी दृष्टिस पडणे दुर्लभ होत आहे. सुगरण पक्ष्यांची कमी होत जाणारी संख्या लक्षात घेता,...
पर्यावरणदिनाचे औचित्य : बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी संस्थेचा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मागील काही वर्षांत वाढती लोकसंख्या आणि वाढते सिमेंटचे जग त्यामुळे सुगरण पक्षी दृष्टिस पडणे दुर्लभ होत आहे. सुगरण पक्ष्यांची कमी होत जाणारी संख्या लक्षात घेता, यंदाच्या पर्यावरण दिनाचे (५ जून) औचित्य साधून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी संस्थेने सुगरण पक्ष्यांची गणना करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ही गणना ४ जून ते १२ जूनपर्यंत करण्यात येणार आहे.
या उपक्रमात पक्षीप्रेमी, वनविभागाचे अधिकारी, वन्यजीव स्वयंसेवी संघटना आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बीएनएचएसने केले आहे. या पक्ष्यांच्या संख्येचा अंदाज आल्यास त्यांच्याबद्दल जाणीवजागृती करणे, त्यांचे अधिवास असलेले गवताळ प्रदेश वाचविणे व त्यातून त्यांची संख्या वाढविणे, असे प्रयत्न करता येणार आहेत.
बीएनएचएसच्या कॉमन बर्ड मॉनिटरिंग प्रोग्रामअंतर्गत या मोजणी उपक्रमाचे देशभरात आयोजनकेले जाणार आहे. या उपक्रमात ज्यांना सहभागी व्हायचे आहे, त्यांनी त्यांच्या आवडीची कोणतीही जागा निवडावी आणि त्या अधिवासातील सुगरण पक्ष्यांची संख्या मोजावी, असे या गणनेचे स्वरुप असल्याचे बीएनएचएसचे जिल्हा समन्वयक स्वप्नील वानखेडे यांनी सांगितले.
‘खोप्या मंदी खोपा’
सुगरण पक्षी म्हटला की, अनेकांना आठवते ती बहिणाबार्इंची ‘खोप्या मंदी खोपा’ पाठ्यपुस्तकात वाचलेली कविता. दैनंदिन आयुष्यात सुगरणींचे खोपे सगळ्यांनी ठिकठिकाणी बघितले असतील. सुगरण पक्षी कसा दिसतो, हे अनेकांना माहीत नसते, पण त्याचे काटेकोर विणलेले घरटे मात्र सगळ्यांच्याच परिचयाचे आहे. सुगरण पक्षी हा विणकर, गवळण या नावांनीही परिचित आहे. बाया सुगरण, स्ट्रेक सुगरण, ब्लॅक ब्रेस्टेड सुगरण, फिन सुगरण (पिवळा) आदी सुगरणच्या प्रजाती आहेत.