सिनेस्टाईल पाठलाग करून दारूसह २० लाखांचे साहित्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 10:58 PM2017-11-13T22:58:59+5:302017-11-13T22:59:13+5:30
पवनी तालुक्यातील भावड येथील परवानाधारक देशी दारू दुकानात आलेले साहित्य नऊ इसमांनी धाकाच्या आधारावर लुटून नेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : पवनी तालुक्यातील भावड येथील परवानाधारक देशी दारू दुकानात आलेले साहित्य नऊ इसमांनी धाकाच्या आधारावर लुटून नेले. यात पोलिसांनी समयसुचकता दाखवून सिनेस्टाईल पद्धतीने पाठलाग करून ट्रकसह एका इसमाला पकडले. यात २० लक्ष रूपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही घटना काल रविवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
माहितीनुसार, रविवारी रात्रीच्या सुमारास भावळ येथील देशीदारू दुकानात ६२४ पेट्या भरून मिनी ट्रक क्रमांक एमएच ३५ / ११०६ चा चालक महेश रजवाडे हा तीन मजुर घेऊन रात्रीला भावड येथे पोहचला. परंतु दुकान बंद असल्याने रात्र झाल्याने गाडीतच झोपी गेले. यावेळी टाटा सुमोमध्ये नऊ इसम लुटण्याच्या इराद्याने आले.
या इसमांनी मारहाण करून धाक दाखवून दारू भरलेला ट्रकच पळवून नेला. पोलीस स्टेशन अड्याळला रात्री ११ च्या सुमारास माहिती मिळताच रात्रीला पेट्रोलींगवर असणारे ए.एस.आय. जाधव, भोंगाडे, गिºहेपुंजे यांनी त्वरीत पवनी पोलीस स्टेशनला संपूर्ण माहिती कळविताच अड्याळ व पवनी परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती.
पोलिसांनी वेळ न घालवता सिनेस्टाईल पद्धतीने ट्रक व एका आरोपीला पाठलाग करून पकडले. नाकाबंदी दिसताच लुटारू वाहने ठेवून पसार झाले होते, हे येथे विशेष. निलज फाट्यावरून हा ट्रक ब्रम्हपुरीला जाणार असल्याची माहिती अड्याळ येथील ठाणेदार पिचक यांनी दिली.
या प्रकरणात सहभागी असलेले अन्य इसम पसार होण्यास यशस्वी झाले. परंतु शुभम अर्पण रामटेके हा अडकला. यात पोलिसांनी तीन मोबाईल व २० लक्ष रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा तपास अड्याळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार यशवंत किचक हे करीत आहेत.
पवनी तालुक्याच्या सिमेलगत चंद्रपूर जिल्ह्याची सिमा आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असल्यामुळे भंडारा जिल्ह्यातून दारूची निर्यात केली जाते. चोरी, छुप्या मार्गाने हा व्यवसाय केला जातो. यात अन्य जिल्ह्यातील तरूणांचाही सहभाग असल्याची विश्वसनीय माहिती आहे.