पाणी विकत घेऊन नळ धारकांना केला जातो पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 11:05 PM2018-03-21T23:05:13+5:302018-03-21T23:05:13+5:30
करडी या गावाला वाढत्या लोकसंख्येनुसार दररोज ३ लाख लिटर पाण्याची गरज आहे. मात्र पाणी पुरवठा योजनेची क्षमता २ लाख लिटर इतकीच आहे.
युवराज गोमासे ।
आॅनलाईन लोकमत
करडी (पालोरा) : करडी या गावाला वाढत्या लोकसंख्येनुसार दररोज ३ लाख लिटर पाण्याची गरज आहे. मात्र पाणी पुरवठा योजनेची क्षमता २ लाख लिटर इतकीच आहे. त्यातच विहीर कोरडी पडल्यामुळे अनेक दिवस पाणी पुरवठा बंद होता. त्यावर उपाय म्हणून करडी ग्रामपंचायतीला राजेश राऊत या शेतकऱ्याकडून दररोज ३२० रूपये दराने पाणी विकत घेऊन जानेवारी २०१८ पासून दीड लाख लिटर पाणी पुरवठा करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती पाहता आणि पाणीपट्टी कर थकीत असल्याने ग्रामपंचायत प्रशासन अडचणीत आले आहे.
मोहाडी तालुक्यातील करडी परिसर कोरड्या दुष्काळामुळे होरपळून निघाला आहे. नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी भटकत आहेत. करडी पाणी पुरवठा योजनेची विहिर कोरडी पडली आहे. करडी गावाला पाणी पुरविण्यासाठी दोन लाख लिटर क्षमतेची पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली. पूर व अन्य अडचणींमुळे यापूर्वी पाणी पुरवठा वारंवार खंडीत असायचा. त्यावर उपाय म्हणून माजी जि.प. सदस्य श्रीराम येळणे व माजी जि.प. सदस्य रामकृष्ण शेंडे यांनी या योजनेच्या विहिरीसाठी मुंढरी खुर्द येथील शालीकराम राऊत यांचेशी चर्चा करून शेतजमीन ग्रामपंचायतीला दान दिली. त्यानंतर माजी जि.प. सदस्य महेंद्र शेंडे यांच्या प्रयत्नातून १८ लाख रूपयांची पाईपलाईन योजना कार्यान्वित करण्यात आली. करडीची लोकसंख्या पाच हजारावर गेल्याने पाणी पुरवठा करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यातच योजनेवर होणारा खर्चही वाढला आहे. मागील तीन वर्षांपासून पावसाअभावी रोवणीविणा हजारो एकर शेती पडीत राहत असते. यावर्षीही अत्यल्प पावसामुळे नदीनाले, तलाव व बोड्यांत पाण्याचा ठणठणाट होता.
निसर्गाच्या अवकृपेमुळे करडी पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीत पाण्याचा ठणठणाट आहे. त्यावर उपाय म्हणून जि.प. सदस्या निलीमा इलमे व सरपंच महेंद्र शेंडे व ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी राजेश राऊत यांना पाणी देण्याची विनंती केली. गावाची अडचण लक्षात घेऊन त्यांनी स्वत:च्या शेतीतील विहिरीतून जानेवारीपासून गावाला पाणी पुरवठा करीत आहेत.
गावाला दररोज ३ लाख लिटर पाण्याची गरज आहे. योजनेची क्षमता दोन लाख लिटरची आहे. त्यातच विहिरी कोरडी पडल्याने त्यावर उपाय म्हणून दररोज ३२० रुपये दराने दीड लाख लिटर पाणी विकत घ्यावे लागत आहे. परिणामी ग्रामपंचायत अडचणीत आली आहे. त्यामुळे गावात राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर होण्याची गरज आहे.
- महेंद्र शेंडे, सरपंच करडी
राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी ग्रामपंचायतीचे ठराव प्राप्त झाले. जि.प.मध्ये हा विषय मांडण्यात आला. वारंवार पाठपुरावा केला जात आहे. गावाला राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर करण्यासाठी प्रयत्नरत आहे.
- निलीमा इलमे, जि.प. सदस्या करडी
ग्रामपंचायत सरपंच व जि.प.सदस्यांनी गावाच्या पिण्याच्या पाण्याची समस्या मांडली. त्यामुळे पाण्याची सुविधा करून दिली परंतु माझी शेती अडचणीत येण्यापूर्वी प्रशासनाने यावर उपाययोजना करावी.
- राजेश राऊत, पाणी पुरवठादार शेतकरी मुंढरी.