रमजान महिन्यात 'जकात' कशासाठी आणि कोणासाठी?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2018 07:08 AM2018-05-18T07:08:48+5:302018-05-18T07:08:48+5:30

इस्लाम धर्मातील रमजान हा पवित्र महिना. रमजानविषयी माहिती देणारी ही खास लेखमालिका. आज इस्लाम धर्मातील 'जकात' च्या प्रथेविषयी:

Zakat in Ramzan | रमजान महिन्यात 'जकात' कशासाठी आणि कोणासाठी?

रमजान महिन्यात 'जकात' कशासाठी आणि कोणासाठी?

नौशाद उस्मान

इस्लामचे पाच स्तंभ आहेत:

  • इमान - एकत्व (अल्लाह एकच असून त्याच्याशिवाय कुणीही पूज्य नाही, कुणाची मूर्तिपूजा, व्यक्तिपूजा करायची नाही), अखेरत्व (मरणोत्तर जीवनावर विश्वास), प्रेषित्व (अल्लाहचे अंतिम प्रेषित मुहम्मद सलअम आणि त्यांच्या पूर्वी आलेल्या जवळपास एक लाख चोवीस हजार प्रेषितांशी निष्ठा राखून प्रमाण मानने) या तत्वांशी इमान राखणे
  • नमाज
  • रोजे
  • जकात
  • हज

यापैकी जकातविषयी आज आपण माहिती घेऊ या.

रमजानमध्ये जकात दिली जाते. वर्षभरातील बचतीचा अडिच टक्के भाग हा गोरगरीब, गरजवंत व इतरांना दिला जातो, त्याला जकात म्हणतात. खरं म्हणजे खाऊन पिऊन साडे सात तोळे सोने किंवा बावन तोळे चांदी किंवा त्याच्या किंमती एवढी संपत्ती बचत म्हणून असेल तर जकात देणे फर्ज (कर्तव्य) ठरते. खरं म्हणजे जेंव्हा जकात फर्ज झाली तेंव्हाच ती देऊन टाकायला हवी, पण अधिक पुण्य मिळते म्हणून ती रमजान महिन्यात दिली जाते.

वास्तविक पाहता जकात म्हणजे भिक किंवा दान नाही, तर ते एक कर्तव्य आहे. काही लोकं तर त्याला धर्मकरदेखील संबोधतात. शहरात येणाऱ्या मालावर सरकारकडून पूर्वी लावणाऱ्या जवळपास अडिच टक्के करालादेखील हे नाव देण्यात आले होते. कुरआनात हे जकात आठ ‘हेड्स’खाली खर्च करण्याचा आदेश आहे -

‘‘हे दान तर खऱ्या अर्थी फकीर आणि गोरगरिबांसाठी आहे. आणि त्या लोकांसाठी जे दान वसुलीच्या कामावर नेमले आहेत आणि त्या लोकांकरिता ज्यांची दिलजमाई अपेक्षित आहे. तसेच हे, गुलामांच्या मुक्ततेसाठी व कर्जदारांना मदत करण्यासाठी व ईश्वरी मार्गात आणि वाटसरूंच्या सेवेसाठी उपयोगात आणण्याकरिता आहे. एक कर्तव्य आहे अल्लाहकडून आणि अल्लाह सर्वकाही जाणणारा द्रष्टा व बुद्धिमान आहे.’’

- कुरआन (९:६०)

म्हणजे खालील लोकांना जकात दिली गेली पाहिजे-

  • फकीर (ज्यांच्या घरी ‘फाका’ म्हणजे उपासमार होते)
  • गरीब
  • जकात सार्वजनिकरित्या गोळा करणारे कर्मचारी/कार्यकर्ते
  • नैराश्येने इमान सोडून बेईमान होऊ नये म्हणून अशा लोकांना
  • वेठबिगार मजूरांसारखे अडकलेले किंवा खोट्या आरोपाखाली अडकलेल्या गरीब आरोपींचा जामीन घेण्यासाठी
  • कर्जबाजारी झालेले (उदाहरणार्थ शेतकरी)
  • ईश्वरी कार्यासाठी (ईश्वरी संदेश पोहोचविण्याकरिता व तो कायम करण्याकरिता)
  • प्रवाशांना (तो श्रीमंत असला तरीही प्रवासात समजा त्याचे पैसे संपले किंवा हरवले किंवा चोरीला गेले असल्यास )

यानुसार सहाव्या प्रकारच्या लोकांना म्हणजे कर्जबाजारी झालेल्या लोकांनाही जकात दिली जाऊ शकते. आज अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यांना जर जकात दिली गेली तर त्या थांबू शकतात. बरं, वर असा कुठेही उल्लेख नाही की, फक्त मुस्लिमांनाच जकात द्या म्हणून. त्यामुळे शेतकरी मग तो मराठा असो की मुस्लिम असो की आणखी कोणत्याही जाती धर्माचा असो, त्याला जकात दिली जाऊ शकते, दिली गेली पाहिजे, तेंव्हाच शितलसारख्या मुलीचे आणि शेतकर्यांचे आम्ही जीव वाचवू शकू. जकात वैयक्तिक नव्हे तर सामुहिकरित्या देणेच अपेक्षित आहे, तरच ती प्रभावी ठरते. सार्वजनिकरित्या जकात संकलित करून ती वितरित करण्याकरिता अनेक संघटना पुढे आल्या आहेत. त्यांना योग्य तो प्रतिसाद देण्याची गरज आहे.

(नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)

Web Title: Zakat in Ramzan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.