लिंगायत समाजाचा आरसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 06:46 PM2018-07-28T18:46:34+5:302018-07-28T18:47:31+5:30
बुकशेल्फ : लिंगायत धर्म, समाज, संस्कृती, सद्य:स्थिती, गती आणि भविष्यकालीन वाटचाल यावर लेखकाने अनेक प्र्रकारे भाष्य केले आहे. हा केवळ वर्णनात्मक नव्हे, तर विश्लेषात्मकही ग्रंथ आहे.
- डॉ. सूर्यकांत घुगरे
लिंगायत स्वतंत्र धर्मच’ हा चन्नवीर भद्रेश्वरमठ यांचा ग्रंथ नुकताच प्रसिद्ध झाला. वस्तुत: लिंगायत हा भारतातील चौथ्या क्रमांकाचा धार्मिक अल्पसंख्याक समाज आहे. लिंगायतांशी संबंधित बहुतेक गोष्टींची सूक्ष्म, वस्तुनिष्ठ, साधार व सविस्तर माहिती उपलब्ध करून देणारा हा एक योगदानकारक ग्रंथ आहे. हा ग्रंथ संशोधनमूल्य जोपासून लिहिलेला असल्यामुळे त्याचा साहित्यिक दर्जा वरच्या पातळीवरचा आहे. हा लिंगायत धर्माविषयीचा एक दखलपात्र ग्रंथ आहे. लिंगायत धर्म, समाज, संस्कृती, सद्य:स्थिती, गती आणि भविष्यकालीन वाटचाल यावर लेखकाने अनेक प्र्रकारे भाष्य केले आहे. हा केवळ वर्णनात्मक नव्हे, तर विश्लेषात्मकही ग्रंथ आहे.
धर्म ही खूप व्यापक संकल्पना आहे. धर्म जीवनस्पर्शी, जीवनव्यापी व जीवनप्रभावी असतो. व्यक्ती आणि समाजजीवनात धर्मव्यवस्थेला विशेष महत्त्व असते. धर्माचे अनेक अर्थ आहेत. किंबहुना धर्माचे शंभराहून अधिक अर्थ असल्याची भूमिका काही समाजशास्त्रज्ञांनी तसेच मानववंशशास्त्रज्ञांनी मांडलेली आहे. मूलत: धर्म हा जीवनविषयक दृष्टिकोन बदलला की, समाजाची एकूण जीवनशैली व जीवनपद्धती बदलत असते. हिंदू, बौद्ध, जैन, शीख, पारशी, ख्रिश्चन, इस्लाम आणि लिंगायत हे स्वतंत्र जीवनविषयक दृष्टिकोन आहेत. म्हणून त्यांची जीवनपद्धती वेगळी आहे. लिंगायत हा एक जीवनविषयक दृष्टिकोन तसेच वेगळी जीवनपद्धती आहे की जी हिंदूंपेक्षा सर्वच बाबतीत वेगळी, भिन्न, स्वतंत्र व वैशिष्ट्यपूर्ण आहे. लिंगायत आणि हिंदू यांच्यातील वेगळेपणा हा व्यक्तीच्या जन्मपूर्व काळापासून ते मृत्युपश्चातदेखील संपत नाही. लिंगायत आणि हिंदू या दोन पूर्णत: वेगळ्या भेददर्शक वास्तवता आहेत, हे नीटपणे समजावून घेणे आवश्यक आहे. याच मताचे वास्तववादी समर्थन अनेक प्रकारच्या पुराव्यांसह लेखकाने स्पष्ट केले आहे.
लिंगायत हे हिंदू का नाहीत? अर्थात, लिंगायत हे हिंदू का नव्हेत? या प्रश्नाचा सविस्तर खुलासा करताना भद्रेश्वरमठांनी अनेक मुद्यांची माहिती दिली आहे. लिंगायत हे हिंदू का नव्हेत? याच्या स्पष्टीकरणार्थ त्यांनी धर्मसंस्थापक, धर्मग्रंथ, आचारसंहिता तत्त्वज्ञान व धर्मप्रतीक या भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेले मूलभूत निकष स्पष्ट केले आहेत. याशिवाय ईश्वरवाद, ईश्वर संकल्पना, ईश्वर उपासना, जन्म-विवाह-मृत्यू व एकंदरीत संस्कारव्यवस्था, पुनर्जन्म संकल्पना, सुतकप्रथा, पौरोहित्यव्यवस्था, स्त्रियांचा धर्मविषयक सामाजिक दर्जा, विश्वनिर्मिती, विश्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, स्वर्ग-नरक संकल्पना, संस्कृती, नीतिसंकल्पना, धर्मक्षेत्र, धर्मपीठपंरपरा, धर्मध्वज, धर्मउद्दिष्ट, जीवनविषयक दृष्टिकोन आणि जीवनपद्धती, अशा ३५ मुद्यांचा आढावा घेतला आहे.
ग्रंथाची भाषा ही साधी, सोपी, सरळ, स्पष्ट, ओघवती व अर्थपूर्ण आहे. ज्येष्ठ पत्रकार व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. श्रीरंग गायकवाड यांची प्रस्तावना ग्रंथाला लाभलेली आहे. साधारणत: १४४ पृष्ठांचा व ३ प्रमुख प्रकरणांमध्ये विभागलेला हा ग्रंथ आहे. विचारांच्या समर्थनार्थ विपुल संदर्भग्रंथ उपयोगिले आहेत. सामान्य कार्यकर्ते, संशोधक, अनुभवी व इतर विद्वानांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन आपली मते आणि व्यावहारिकता यांची सांगड घालण्याचा यथोचित प्रयत्न केला गेला आहे. एकूणच ग्रंथ खूप चांगला आहे. एका ज्वलंत विषयावर स्वच्छ संशोधनात्मक प्रकाश लेखकाने टाकलेला आहे.