उमलत्या भावविश्वाची स्पंदने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 07:18 PM2018-03-17T19:18:55+5:302018-03-17T19:21:18+5:30
प्रासंगिक : लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संस्था, पुणे’ या संस्थेची मराठवाड्यातील पहिली शाखा स्थापन करण्यात येत आहे. या शाखेच्या उद्घाटनानिमित्त उदगीर येथे पहिले विभागीय बालकुमार साहित्य संमेलन रविवारी (दि.११) आयोजित करण्यात आले होते . या निमित्ताने टाकलेला हा प्रकाश.
- अनिता यलमटे
मराठी साहित्याचे दालन समृद्ध आणि संपन्न आहे. यातील ललित वाङ्मयाचा प्रकार असलेली एक शाखा ‘बालसाहित्य’ हा तसा साहित्यविश्वात दुर्लक्षित विभाग आहे. इतर वाङ्मय प्रकाराच्या तुलनेत अभावानेच महत्त्व दिल्याची प्रचीती आपल्याला येते. अनेक दिग्गज साहित्यिक बालसाहित्याला ‘बच्चों का खेल’ समजून हाताळताना दिसत नाहीत. ही फार मोठी शोकांतिका मराठी साहित्यविश्वाची आहे. असे असले तरी मायमराठीच्या प्रांगणातील प्रस्थापित सारस्वतांपैकी साने गुरुजी, ताम्हनकर, जी.ए., आचार्य अत्रे, ग.दि.मा., भा.रा. भागवत, शांताबाई शेळके, कुसुमाग्रज यांच्यासह इतर साहित्यिकांनी बालसाहित्यविश्व समृद्ध केले आहे. हेही निर्विवाद सत्य आहे. जीवनाचा प्रारंभ बाल्यदशेने व्हावा, हे निसर्गाचे सूत्र मराठी साहित्याने स्वीकारले व मराठी मुद्रित साहित्याची सुरुवात बालसाहित्यानेच झाली आहे. मुलांनी लिहिलेल्या साहित्याला बालसाहित्य म्हणावे, की मोठ्यांनी लहान होऊन लिहलेल्या साहित्याला बालसाहित्य म्हणावे. हा जरी वादाचा विषय असला तरी लेखकांनी स्वत:तील लहान मूल जिवंत ठेवून निर्मळ, निरागस मनाने मुलांच्या भावविश्वाची बाग फुलवत मनावर संस्काराची मशागत करीत निर्मिलेल्या कसदार साहित्यालाच बालसाहित्य म्हणावे. मनोरंजन आणि आनंदनिर्मितीतून मूल्यसंस्काराची पेरणी हे बालसाहित्याचे पहिले प्रयोजन असेल, तरच ते साहित्य मुलांना आवडेल.
आमची मुले वाचतच नाहीत, असा सूर पालकसभांतून ऐकायला मिळतो; पण वाचन हा संस्कार नेणतेपणात मूल आई-वडिलांच्या मांडीवर बसून अवगत करते. म्हणजेच आई-वडिलांचे वाचनविश्व समृद्ध असेल, तरच मुलांवर नकळतपणे वाचनसंस्कार होइल. आमच्या पिढीचे पालक घरी येताना फास्ट-फूडऐवजी चम्पक, कॉमिक्स, किशोर, चांदोबा व मुलांचे मासिक घरी घेऊन येत असत. ‘श्यामच्या आई’ने आम्हाला हमसून रडायलाच लावले. भा.रा. भागवतांचा ‘फास्टर फेणे’, प्रभावळकरांचा ‘बोक्या सातबंडे’ व ताम्हणकरांचा ‘गोट्या’ हेच तर सगळे आमचे हीरो होते. पंचतंत्र, हितोपदेश, इसापनीती, सिंहासन बत्तिशी, वेताळ पंचविशी, परीकथा, जादूकथा, सिंड्रेला, अकबर बिरबल, अशा पुस्तकात आम्ही रमायचो. या जगात आनंदाचा खजिना दडलेला असायचा. पुस्तक वाचून हातावेगळे झाले, की आम्ही पूर्वीसारखे नसायचो. पूर्वीपेक्षा संपन्न, समृद्ध आणि कितीतरी नवे झालेलो असायचो. किती श्रीमंत होते ना आमचे बालपण! पुस्तके माणसाला उन्नत करतात. पायापासून क्षितिजापर्यंत बघायला शिकवतात, अशी श्रद्धा बाळगणारा व वैचारिकदृष्ट्या समृद्ध असणारा तो काळ होता.
सध्याचे युग हे टेक्नोसॅव्ही आणि इलेक्ट्रॉनिक्सचे आहे. मूल वैश्विक बनत आहे. आमच्या पिढीपेक्षा ते अधिक वेगवान प्रतलावर प्रवास करीत आहे. अवघे जग त्याच्या तळहातावर एका रिमोटच्या बटणाशी निगडित आहे. अशा परिस्थितीत त्यांना वाचनाकडे वळवणे हे बालसाहित्यिकांसमोर शिवधनुष्य पेलण्याचेच आव्हान आहे. बालसाहित्य केव्हा लोकप्रिय-बालप्रिय होते? तर जेव्हा ते मुलांच्या मनात भिडते. त्यातला आशय त्यांना स्वत:च्या जीवनाशी सुसंगत वाटतो. ही पिढी विज्ञाननिष्ठ असल्याने प्रत्येक गोष्टीची सत्यता तपासून पाहते. परीकथा किंवा जादूकथा काही काळ भावेल; पण त्यांच्या मनात नानाविध प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे बालसाहित्य हे बालजीवनावर प्रकाश टाकणारेच असावे. लहान मूल हे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे त्यास दरवेळी गृहीत धरून चालणार नाही. टी.व्ही., मोबाईल, इंटरनेट व व्हिडिओ गेमच्या मोहजालातून बाहेर काढून विभक्त कुटुंबपद्धती आणि ग्लोबलायझेशनच्या माध्यमातून आलेल्या विस्कळीतपणाची शिकार झालेल्या मुलांना फुलवायचे असेल, तर त्यांचा स्वत:शी, मातीशी, निसर्गाशी, संस्कृतीशी संवाद व्हायला हवा. कविवर्य पाडगावकरांच्या भाषेत सांगायचे म्हणजे मुले शब्दांचा खुळखुळा करतात, त्यांच्याशी खेळतात. अंत:करणाने कविता वाचतात. यासाठी मराठी बालसाहित्याने कात टाकली पाहिजे.
या सर्व चिंतनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र व पंजाब राज्यांतच बालसाहित्य गांभीर्याने लिहिले जाते. हेही निर्विवाद सत्य आहे. अनेक दिग्गज मराठी लेखकांना मुलांच्या मनोभूमीची नस सापडली आहे. विंदा करंदीकरांचे हे जन्म-शताब्दी वर्ष आहे, त्यांचा ज्ञानपीठ सन्मान हा बालसाहित्यालाही वेगळ्या उंचीवर नेणाराच ठरला. अनिल अवचट, बाबा भांड, विजया वाड, राजीव तांबे, ल.म. कडू, महावीर जोंधळे, संदीप खरे, बालाजी इंगळे, एकनाथ आव्हाड, बबन शिंदे, हेरंब कुलकर्णी, विद्या सुर्वे, संगीता बर्वे, माधव राजगुरू, नरेंद्र लांजेवार, आबा महाजन, कविता महाजन, स्वाती राजे, प्रवीण दवणे, भारत सासणे, विजय तेंडुलकर, सई परांजपे, सूर्यकांत सराफ आदींनी ग्रंथविश्वात मुलांनी मनोरंजनाची व वैचारिक जाणीव समृद्धीची सहल अनुभवलीच पाहिजे. तसेच किरण केंद्रे यांनी किशोरच्या संपादक पदाची धुरा घेतली आणि अनेक लिहित्या हातांना प्रतिभेचे पंख फुटले.
मराठवाड्याच्या बालसाहित्यातील काही विशेष उल्लेखनीय बाबींचा येथे गौरव करावा वाटतो. सुरेश सावंत, मथू सावंत, पृथ्वीराज तौर, स्वाती काटे व तृप्ती अंधारे यांनी बालसाहित्यात वेगळे प्रयोग करीत मुलांच्या सृजनशक्तीला जणू पंख दिले आहेत. बालसाहित्याला ग्लॅमर नाही किंवा त्यात पैसा नाही म्हणून अनेक प्रस्थापित प्रकाशकही बालसाहित्याकडे कानाडोळाच करतात; पण बाबा भांड यांचे ‘साकेत’ व दत्ता डांगेंचे ‘इसाप’ या प्रकाशन संस्थांची आवर्जून नोंद घ्यावी लागेल. कारण या बालसाहित्याला वाहिलेल्या संस्था आहेत. मराठी बालसाहित्यात ग्रामीण बालविश्व चित्रित करण्याचे श्रेयही इंद्रजित भालेराव, शंकर वाडीवाले, महावीर जोंधळे आदी लेखकांना जाते. याशिवाय पंचहत्तराव्या वर्षी बालकविता लिहिणारे आमचे रा.रं. बोराडे मराठवाडीच! काही कवी, कथाकारांचा नामोल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. विनय अपसिंगेकर, रमेश चिल्ले, रेखा बैजल, लीला शिंदे, दासू वैद्य, रेणू पाचपोर, अर्चना डावरे, अरुण देशपांडे, सरोज अहंकारी, श.ला. नाईक, भास्कर बडे, धनंजय गुडसूरकर, रामदास केदार, उमेश मोहिते, आबासाहेब वाघमारे, चंद्रदीप नादरगे, संतुक पाठक, मुक्तविहारी, अनंत कदम इतके सारे बालसाहित्य निर्मिलेले असले तरी अजूनही विज्ञानकथा, विज्ञान कादंबर्या, प्रवासवर्णने, गूढकथा, प्राणिकथा, फँटसीकथा या साहित्याची वानवा आहेच. मुलांवर साहित्याचे संस्कार करण्याची संयुक्तिक जबाबदारी लेखक आणि प्रकाशकांचीही आहे. बालसाहित्याची दुनिया सुंदर, देखणी आहे; पण ती तळागाळातील मुलांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. बालसाहित्याचा हा खजिना मनसोक्तपणे समाजाच्या अंतिम कोवळ्या बालमनाला प्रोत्साहित करणारी महाचळवळ ठरावी. इतकीच अपेक्षा.
( anitayelmate@gmail.com)