भाष्य - चित्रनगरीला बहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 12:22 AM2017-08-07T00:22:14+5:302017-08-07T00:22:25+5:30
कोल्हापूरच्या चित्रपट निर्मितीचा काहीसा थांबलेला इतिहास पुन्हा एकदा पुढे सरकू लागला आहे. श्रावणातील हिरवळीप्रमाणे ती पुन्हा एकदा बहरू लागली आहे. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक अनंत माने यांच्या सत्कार समारंभात राज्य शासनाच्या वतीने कोल्हापुरात चित्रनगरी उभारण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली होती. त्याला ३४ वर्षे झाली.
कोल्हापूरच्या चित्रपट निर्मितीचा काहीसा थांबलेला इतिहास पुन्हा एकदा पुढे सरकू लागला आहे. श्रावणातील हिरवळीप्रमाणे ती पुन्हा एकदा बहरू लागली आहे. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक अनंत माने यांच्या सत्कार समारंभात राज्य शासनाच्या वतीने कोल्हापुरात चित्रनगरी उभारण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली होती. त्याला ३४ वर्षे झाली. तत्कालीन सांस्कृतिक मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी वारंवार निधी देण्याचे आश्वासन दिले. मात्र, चित्रनगरीच्या स्थापनेला गती काही येत नव्हती. कोल्हापूर शहराच्या उत्तरेला असलेल्या मोरेवाडीच्या माळावर ७७ एकर जागेवर आता ‘लाईट, कॅमेरा, अॅक्शन’चा आवाज येऊ लागला आहे. दोन दिवसांपूर्वी रॉक्सन ग्लोबल या चित्रपट निर्मिती संस्थेने ‘भगवद्गीता’ चित्रपटाचे दोन दिवसांचे चित्रीकरण करून कोल्हापूरच्या देदीप्यमान, पण थांबलेल्या इतिहासाचे चक्र पुन्हा सुरू केले. कोल्हापूरच्या चित्रनगरीच्या उभारणीसाठी आघाडी सरकारने भरीव आर्थिक तरतूद केल्यानंतर पहिल्या टप्प्यातील सुमारे १२ कोटींची कामे सुरू झाली. त्यामध्ये संपूर्ण ७७ एकर जागेला कम्पाऊंड, पाटलांचा वाडा, जुन्याच इमारतीत स्टुडिओ, कोर्र्टाची इमारत, पोलीस ठाणे, कॉलेज, आदी बांधण्यात आले. दुसºया टप्प्यात १६ कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक स्टुडिओ उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये परिपूर्ण हिंदी चित्रपटाचे कामही करण्यात येऊ शकेल. मुंबईमध्ये चित्रीकरणासाठी आणि डबिंगसाठी अनेक वेळा स्टुडिओ उपलब्ध होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. ती गरज आता कोल्हापूरच्या चित्रपटनगरीत पूर्ण होणार आहे. याशिवाय कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरात असंख्य सहायक कलाकार (साईड आर्टिस्ट) आहेत. त्यांना रोजगाराबरोबरच चित्रपटात काम करण्याची स्थानिक पातळीवर संधी उपलब्ध होणार आहे. भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम, दादा कोंडके, अनंत माने, दिनकर द. पाटील यांच्यासारख्या असंख्य दिग्गज चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी कोल्हापूरच्या चित्रवैभवात मोलाची भर घातली आहे. जयप्रभा स्टुडिओ किंवा शालिनी सिनेटोनसारखी चित्रपट निर्मितीची केंद्रे अनेक वर्षे ही सेवा देत होते. काळाच्या ओघात ती बंद पडली. परिणामी कोल्हापूरची चित्रपट निर्मिती थंडावली. स्टुडिओ नसल्याने गैरसोय होऊ लागली. वास्तविक कोल्हापूर परिसर हा निसर्गाने नटलेला आहे. उत्तम आऊटडोअर लोकेशन्स आहेत. चित्रनगरीतील सोयी-सुविधा आणि या लोकेशन्समुळे पुन्हा एकदा कोल्हापूरच्या ऐतिहासिक चित्रपट निर्मितीच्या वैभवाला चालना मिळणार आहे. आज जरी येथे चित्रनगरी परिपूर्ण आणि पूर्ण क्षमतेने कार्यरत नसली, तरी अनेक उदयोन्मुख, तरुण, यशस्वी, गुणवंत कलाकार चित्रपट तसेच विविध टीव्ही चॅनेल्सवरील मालिकांत कामे करण्यासाठी बाहेर आहेत. त्या सर्वांनाच नव्या उमेदीने काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे आता ‘भगवद्गीता’ने जी सुरुवात झाली आहे, ती कोल्हापूरच्या चित्रनगरीची नवी पहाट असणार आहे.