कहाणी पोदार कॉलेजमधील सांस्कृतिक चळवळीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:32 AM2018-02-18T00:32:10+5:302018-02-18T00:32:24+5:30
-अरुण म्हात्रे
पोदार कॉलेजचा विद्यार्थी म्हणून अकाउंटिंग विषयात चोख असे काम केले. पण मनातले साहित्यिक भावविश्व जपतच ! काय धमाल असायची कॉलेजात! वक्तृत्व स्पर्धा, युथ फेस्टिव्हलसाठी एकांकिका, समूहगान, समूहनृत्य. एकेवर्षी मी या तीनही गोष्टीत होतो. सतीश आळेकरांची एकांकिका केली, समूहगीतात होतो आणि कॉलेजने बसवलेल्या नागा नृत्यामागचे गाणे म्हणायला म्हणून त्या नृत्यकंपूतही ! संगीतसंध्या या कॉलेजच्या कार्यक्र मात जयवंत कुलकर्णी आणि अरु ण दाते या गायकांची उडती गाणी म्हणायला नि त्या जोरावर भाव मारायला मी पुढे असे.
लोकल ट्रेनने ठाण्याहून दादरच्या दिशेने जाताना माटुंगा स्टेशन सोडलं की डोक्यावरच्या घुमटाकारात भलं मोठ्ठं घड्याळ असलेली पोदार कॉलेजची म्हणजे माझ्या लाडक्या कॉलेजची इमेज मी कॉलेज जॉइन करण्याआधीपासून माझ्या मनात होती.
ठाण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून मी जुनी एसएससी झालेला विद्यार्थी. त्याआधी अलिबागसारख्या गावाकडच्या शाळेचे ग्रामीण संस्कार झालेला. संस्कार म्हणजे काय तर इंग्रजीच्या नावाने बोंब आणि एक गावाकडचा बुजरेपणा बावळटपणाच्या बरोबरीने सोबत आलेला. पोदारच्या आजूबाजूचे वातावरण इतके शहरी किंवा हायफंडा की माझे सुरुवातीचे दिवस आपण चित्रपटातल्या पात्रांकडे कसे भुवया विस्फारून बघत असतो तसे कॉलेजमधल्या सोबतच्या मुलामुलींकडे, कॉलेजच्या ब्रिटिशकालीन इमारतींचा थाट असलेल्या दगडी इमारतीकडे टक लावून बघत बसण्यात गेले. एसएससीला जरा बरे मार्क असल्याने सकाळच्या कॉलेजात माझे नाव दाखल करायला गेलेल्या माझ्या वडिलांना इतके चांगले मार्क असताना त्याला मॉर्निंग कॉलेजमध्ये का घालता, असा प्रश्न मुलाखतीला असलेल्या प्रभुराम जोशी सरांनी केला आणि माझी पूर्णवेळ कॉलेज करण्याची इच्छा मार्गी लागली. तेथून पोदार कॉलेजशी माझी नाळ जुळणे सुरू झाले. कारण माझ्या नंतरच्या आयुष्यावर अत्यंत प्रभावी प्रभाव टाकणारे सर प्रभुरामच होते आणि माझ्या आताच्या थोड्याशा सामाजिक बनण्यामागे किंवा जीवनाच्या हरेक क्षेत्रात काही तरी धडपड करण्याच्या वृत्तीमागे कॉलेजच्या शेवटच्या वर्षात प्रभुराम सरांनी केलेल्या वैचारिक संस्कारांचाच भाग आहे .
पोदार कॉलेज हे माझ्याइतके कोणाच्या आयुष्यात अपरिहार्य नसेल. कारण इथे कॉमर्स विषयातली डिग्री घ्यायला आलेला मी चक्क कवी - लेखक म्हणून आताच्या आयुष्यात सेटल झालो त्याचे कारण हे कुणालाही लेखकांच्या सुरस रम्य गोष्टींसारखे अविश्वसनीय वाटेल, पण ते अक्षरश: खरे आहे. आॅप्शनल अशा ५0 मार्कांच्या पेपरसाठी सत्यकथा मासिकाचे त्या वेळचे संपादक राम पटवर्धन येतात काय आणि माझी सगळी श्रद्धा कॉमर्स या रूक्ष विषयातून उडून फुलपांखरांप्रमाणे शब्दांवर, कवितेवर आणि नंतर संपादन, संकलन या साहित्यिक विषयांवर येऊन बसते काय... आयुष्याला एक वळण देण्याचा सिलॅबसच कॉलेजने मला दिला... पटवर्धन सरांनी जणू मशागत केली, तण काढले, माझ्या मनाची जमीन पेरण्यासारखी केली नि मग त्यावर बीज पेरण्याचे काम कॉलेजमधल्या अनेक अॅक्टिव्हिटीज आणि उपक्रम आणि नंतर प्रिन्सिपॉल म्हणून आलेल्या प्रभुराम जोशी सरांनी केले.
कॉलेजच्या त्या वेळी नव्याने झालेल्या पाचव्या मजल्यावरच्या लायब्ररीत मी मॅथेमॅटिक्स आणि ट्रायल बॅलन्सबरोबरच कविवर्य ग्रेस, ना.धों. महानोर, म. म. देशपांडे आणि वसंत आबाजी डहाके यांचा व्यासंग करीत होतो. लायब्ररीतले सत्यकथेचे त्या काळातले सगळे अंक मी परीक्षेचा अभ्यास करावा तसे खोदून खोदून वाचीत होतो.
एकीकडे वडिलांची बंद पडलेली कंपनी (त्या काळापासून कंपन्या बंद पाडण्याची नवी अर्थव्यवस्था देशात रूजू झाली होती) आणि मी कसंही करून नोकरी मिळवावी अशी घरची परिस्थिती. आणि मी तर शब्दांच्या या विलक्षण दुनियेत मग्न, डोक्यातल्या वादळापेक्षा हृदयातल्या हाकांना साद देण्याच्या मूडमध्ये. पुढे मी रीतीरिवाजाप्रमाणे नोकरी मिळवली, नि नोकरी केली पण माझ्या मनाने घेतलेले आणि कॉलेजच्या दिवसांनी दिलेले ते लेखनाचे वळण काही सुटले नाही.
पोदार कॉलेजचा विद्यार्थी म्हणून अकाउंटिंग विषयात चोख असे काम केले. पण मनातले साहित्यिक भावविश्व जपतच ! काय धमाल असायची कॉलेजात! वक्तृत्व स्पर्धा, युथ फेस्टिव्हलसाठी एकांकिका, समूहगान, समूहनृत्य. एकेवर्षी मी या तीनही गोष्टीत होतो. सतीश आळेकरांची एकांकिका केली, समूहगीतात होतो आणि कॉलेजने बसवलेल्या नागा नृत्यामागचे गाणे म्हणायला म्हणून त्या नृत्यकंपूतही! संगीतसंध्या या कॉलेजच्या सुगम संगीत कार्यक्र मात जयवंत कुलकर्णी आणि अरु ण दाते या गायकांची उडती गाणी म्हणायला नि त्या जोरावर पब्लिकमध्ये भाव मारायला मी पुढे असे.
एमकॉमला इकॉनॉमिक्स विषय शिकवणाºया नलिनी पंडितबाई इथेच होत्या आणि एनएनएसमध्ये खूप मोठे योगदान देणारे प्रोफेसर यु. यु. भटही आमच्याच कॉलेजात होते. या कॉलेजातच एकांकिकेसाठी मी तोंडाला पहिल्यांदा रंग फासला आणि गाण्यासाठी मंचावर उभा राहिलो. इथेच मी कविवर्य शंकर वैद्य, शं.ना. नवरे, व.पु. काळे या साहित्यिकांना आणि पंडित भीमसेन जोशी, पंडित जितेंद्र अभिषेकी, प्रभाकर कारेकर, मालिनी राजूरकर आणि प्रभा अत्रे यांना गाताना ऐकलं. इथेच ग्रंथालीचे सुरुवातीचे सांस्कृतिक कार्यक्रम पाहिले.
इथेच आयुष्यातल्या पहिल्यावहिल्या प्रेमकविता लिहिल्या नि इथेच नंतरच्या आयुष्यात परवलीच्या बनलेल्या सामाजिक कामाची छोटीशी सुरुवात केली. कॉलेजमध्ये लिहिणाºया लोकांत विनोद हडप याच्या नावाचा दबदबा होता तो त्याच्या एकांकिकांमुळे. हेमंत वाईरकर (कविता लेखन), मुकुंद भागवत, शशी दाते (सुगम संगीत), अंजली खरे, माधुरी ताम्हाणे (ललित लेखन) अशी काही नावे त्या काळात मला आदर्श होती. पुढे ही मंडळी व्यवसायात अधिक रमली असावी. त्यामुळे त्या वेळी अगदीच चुटुरपुटूर लिहिणारा मी आणि भारती बिर्जे दोघे एकूण मराठी लेखनविश्वात बºयापैकी उरलो .
कॉलेजच्या दिवसात मी विक्रोळीच्या टागोर नगरात हाउसिंग बोर्डाच्या चाळीत राहायचो. कॉलेजभोवतीचे वातावरण फारच वेगळे, सुशिक्षित, सॉफिस्टिकेटेड आणि शांत होते. माटुंगा स्टेशनात उतरताच कळायचे की आपण वेगळ्या प्रदेशात आलोय. त्या सॉफिस्टिकेशनचे किंचित दडपण यायचे. इंदिराजींनी आणीबाणी पुकारली ते वर्ष तणावाचे होते. आणि प्रभुराम जोशी सर बहुधा त्याविरोधात असणाºया लोकांचे संघटन करीत असावेत. कॉलेजमध्येही काँग्रेसधार्जिणे आणि काँग्रेसविरोधी असे गट निर्माण झाले होते. पण राजकारणातले फार कळत नव्हते. मात्र आपले प्रभुराम सर
आणि पटवर्धन सर ज्या बाजुचे ती बाजू योग्यच असणार, असा ठाम विश्वास होता. त्यामुळे कॉलेज संपल्यावर मी राष्ट्र सेवा दलात रु जू झालो आणि नवोदित कवी-लेखकांसाठी ‘अक्षर चळवळ’ अनियतकालिक सुरू केले, जणू माझे कॉलेज संपले नव्हतेच. उद्या असं कोणी म्हटलं की चक्क एका कॉमर्स कॉलेजने मराठीला एक कवी कार्यकर्ता दिला तरी मी आतून भरून पावेन!!