शॉपिंगचे आॅनलाइन ‘अॅडिक्शन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 12:48 AM2017-11-19T00:48:04+5:302017-11-19T00:48:15+5:30
गेल्या काही वर्षांत बाजारपेठा, मॉल्समध्ये फिरणा-या मुंबईकरांनी आॅनलाइन संकेतस्थळांची वाट धरली आहे. पूर्वी ‘आॅफलाइन’ सेल्सकडे हौसेने वळणारे ग्राहक, आता ‘आॅनलाइन सेल्स’ कधी सुरू होणार, याकडे डोळे लावून असतात.
- स्नेहा मोरे
गेल्या काही वर्षांत बाजारपेठा, मॉल्समध्ये फिरणा-या मुंबईकरांनी आॅनलाइन संकेतस्थळांची वाट धरली आहे. पूर्वी ‘आॅफलाइन’ सेल्सकडे हौसेने वळणारे ग्राहक, आता ‘आॅनलाइन सेल्स’ कधी सुरू होणार, याकडे डोळे लावून असतात. त्यामुळे जर तुम्ही दिवसभरात अनेक शॉपिंग साइट्स पाहात असाल किंवा रोजच्या रोज या साइट्स पाहणे हा तुमचा दिनक्रमाचा भाग झाला असेल, तर थोडे थांबा... ही सवय म्हणजे मानसिक आजाराची लक्षणे आहेत. केवळ एका क्लिकवर तुमच्या सेवेला हजर राहणाºया आॅनलाइनच्या जंजाळामुळे तर वेळीच काळजी घ्या. कारण शॉपिंगमुळे स्वत:वर नियंत्रण न राहणे, रात्रभर जागून शॉपिंग साइट्स चेक करणे, आॅर्डर आली नाही, म्हणून हैराण होणे, अशा छोट्या-छोट्या सवयी तुम्हाला मानसिक आजाराकडे नेऊ शकतात, असे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
या शॉपिंगचा खिशावर नव्हे, तर नकळत आपल्या जीवनावरही परिणाम होऊ लागल्याचे तुम्हाला जाणवतेय का? हा एक मानसिक आजारदेखील असू शकतो! कमी वेळात खूप साºया गोष्टींची खरेदी हा विचारच मुळात घातक असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. काही काम नसताना शॉपिंग साइट्स पाहणे, त्या संदर्भातील माहिती, फोटो डाउनलोड करणे अशा बºयाच कारणांमुळे ‘कम्पल्सिव्ह शॉपिंग डिसआॅर्डर’ नावाचा मानसिक आजार होऊ शकतो. एखाद्या ग्राहकाला ५० हजार रुपये वेतन आहे, त्यातील अर्ध्याहून अधिक पैसे आॅनलाइन शॉपिंगसाठी खर्च होत असतील, तर असे ग्राहक आॅनलाइन शॉपिंगच्या व्यसनाच्या आहारी गेले आहेत.
याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नूतन लोहिया सांगतात की, आॅनलाइन शॉपिंगची सर्वात जास्त क्रेझ महिला वर्गात आहेत. यात गृहिणींचेही प्रमाण अधिक आहे, केवळ एका क्लिकवर ही सेवा मिळत असल्याने, त्याच्या आहारी जाण्याचे प्रमाण बळावत आहेत. तापट स्वभावाचे किंवा राग आल्यास कुठलाही विचार न करणाºया व्यक्ती प्रामुख्याने या आजारात अडकतात. आपल्याकडे याबद्दल कुणाला ठाऊक नसल्याने, सतत आॅनलाइन शॉपिंग करणे हा आजार मानला जात नाही. त्यामुळे याविषयी डॉक्टरांशी बोलण्याचे प्रमाण खूप कमी आहे.
महिन्याला असे २ ते ३ रुग्ण उपचारांसाठी येतात. वस्तूंची विक्री वाढविण्यासाठी आॅनलाइन शॉपिंगद्वारे अत्यंत अॅग्रेसिव्ह माकेर्टिंग करतात. या साइट्स पाहता-पाहता आपल्याला वस्तू खरेदी करण्याचे व्यसन कधी जडते, हे कळतच नाही. वस्तू घेण्यासाठी तर आॅनलाइन शॉपिंग हा इंटरनेटच्या व्यसनाचा भाग असू शकतो. बराच काळ एखाद्या शॉपिंगच्या वेबसाइटवर वेळ घालविणे म्हणजे, त्या व्यक्तीला इंटरनेटचे अॅडिक्शन असू शकते, अशी माहिती मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मधुमिना कोरे यांनी दिली.