दुर्ग दुर्गेश्वर रायगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 02:49 AM2017-12-28T02:49:38+5:302017-12-28T02:49:55+5:30

गड किल्ले म्हणजे महाराष्ट्राचे वैभव. रायगड या वैभवाचे शिखर. किल्ल्याशी मराठी मनाचे साडेतीन शतकांपासूनचे ऋणानुबंद आजही कायम आहेत.

Durg Durgeshwar Raigad | दुर्ग दुर्गेश्वर रायगड

दुर्ग दुर्गेश्वर रायगड

Next

- नामदेव मोरे
गड किल्ले म्हणजे महाराष्ट्राचे वैभव. रायगड या वैभवाचे शिखर. किल्ल्याशी मराठी मनाचे साडेतीन शतकांपासूनचे ऋणानुबंद आजही कायम आहेत. वारकरी ज्या भक्तीने पंढरीच्या वारीला जातो, तीच भावना रायगडच्या पाय-या चढणा-या करोडो शिवप्रेमींच्या मनामध्ये निर्माण झालेली असते.
महाड शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर समुद्रसपाटीपासून २७०० फूट उंचावर आकाशाशी स्पर्धा करणारा सर्वश्रेष्ठ दुर्ग म्हणजेच रायगड. चारही बाजूला डोंगररांगा. उत्तर व पूर्वेला काळ नदीचे खोरे, पश्चिमेला गांधारी, पूर्वेला लिंगाणा. आग्नेय दिशेला दूरवर राजगड, तोरणा व दक्षिणेकडे मकरंदगड, प्रतापगड, वासोटा असा विभाग. गडाला पाचशे वर्षांचा इतिहास. पूर्वी तो फक्त डोंगर होता. रासिवटा व तणस अशी त्याची नावे. पुढे त्याला नंदादीप व रायरी संबोधले जाऊ लागले. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५६मध्ये हा गड जिंकला व त्याचे ‘रायगड’ असे नामकरण करण्यात आले. स्वराज्याची राजधानी म्हणूनही त्याची निवड करण्यात आली. ‘सभासद बखर’मध्ये याविषयी म्हटले आहे.‘ राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा, चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दीड गांव उंच. पर्जन्यकाळी, कडीयावर गवत उगवत नाही. धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा; परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलले तक्तास जागा हाच गड करावा.’ युरोपीय राज्यकर्ते रायगडला पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत.
स्वराज्याच्या अनेक घटनांचा साक्षीदार असलेल्या रायगडविषयी करोडो भारतीयांच्या मनामध्ये नेहमीच आदर राहिलेला आहे. आतापर्यंत गडाची माहिती देणारी ५१ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. जगाच्या इतिहासामध्ये गड, किल्ल्यावर एवढे लिखाण कुठेच झालेले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे प्रतीक म्हणजे रायगड. वास्तुशास्त्राचे आदर्श उदाहरण म्हणून या किल्ल्याकडे पाहिले जाते. देश, विदेशातील हजारो शिवप्रेमी प्रत्येक वर्षी गडाला भेट देत असतात.
>दुर्गदुर्गेश्वराची १५ नावे
रायगड, रायरी, इस्लामगड, नंदादीप, जंबुद्वीप, तणस,राशिवटा, बदेनूर, रायगिरी, राजगिरी, भिवगड, रेड्डी, शिवलंका,राहीर व पूर्वेकडील जिब्राल्टर
>गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
पाचाडचा जिजाऊ माँ साहेबांचा वाडा, खुबलढा बुरूज, नाना दरवाजा, महादरवाजा, चोरदिंडी, हत्ती तलाव, गंगासागर तलाव, स्तंभ, पालखी दरवाजा, मेणा दरवाजा, राजभवन, रत्नशाळा, राजसभा, नगारखाना, बाजारपेठ, शिर्काई देऊळ, जगदीश्वर मंदिर, महाराजांची समाधी, कुशावर्त तलाव, वाघ दरवाजा, टकमक टोक, हिरकणी टोक, अश्मयुगीन गुहा, वाघबिळ
>रायगडावरील महत्त्वाच्या घडामोडी
११वे शतक
यादव सत्ता
१२वे शतक
यादव सत्ता व मराठा पाळेगारांचा ताबा
१३वे शतक
पाळेगारांचे विजयनगरचे मांडलिकत्व
१४वे शतक
सुभा रायरी निजामशाहीच्या ताब्यात
१५वे शतक
निमाजमशाहीचा अंमल
१६वे शतक
रायरी आदिलशाहीकडे आला
एप्रिल १६५६
रायरीचा किल्ला शिवाजी महाराजांची जिंकला
१६६२
रायगड असे नामकरण
१६७२
रायगडावर राजधानी वसविण्यास सुरुवात
६ जून १६७४
शिवराज्याभिषेक
१७ जून १६७४
पाचाड येथे जिजाऊ माँ साहेबांचे निधन
३ एप्रिल १६८०
महाराजांचे महानिर्वाण
जानेवारी १६८१
संभाजी महाराजांचा राज्याभिषेक
३ नोव्हेंबर १६८९
रायगड मोगलांच्या ताब्यात
८ जून १७३३
पंतप्रतिनिधींनी गडाचा ताबा घेतला
१८६९
महात्मा जोतिबा फुले यांनी रायगडला भेट
१८९६
लोकमान्य टिळक व शि. म. परांजपे यांनी उत्सव सुरू केला
>जाण्याचा मार्ग
मुंबई-गोवा महामार्गावर महाड बस स्थानकापासून बसने व खासगी वाहनाने गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते.
पायथ्यावरून रोप वेने १० ते १५ मिनिटांत किल्ल्यावर पोहोचता येते.
नाना (नाणे) दरवाजापासून पायवाटेने किल्यावर जाता येते.

Web Title: Durg Durgeshwar Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.