सिंधुदुर्ग जंजिरा, जगी अस्मानी तारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:53 PM2017-07-24T12:53:48+5:302017-07-25T16:34:07+5:30
सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण हे तालुक्याचे गाव गाठावे. मालवण एस.टी. स्थानकावरून आपण थोड्या वेळात बंदरावर पोहोचतो. तेथून किल्ल्यावर जाण्यासाठी बोटी मिळतात.
- गौरव भांदिर्गे
सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण हे तालुक्याचे गाव गाठावे. मालवण एस.टी. स्थानकावरून आपण थोड्या वेळात बंदरावर पोहोचतो. तेथून किल्ल्यावर जाण्यासाठी बोटी मिळतात.
पाहण्याची ठिकाणे -
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या महादरवाजाची बांधणी गोमुखी पद्धतीची असल्यामुळे प्रवेशद्वार कुठे आहे हे पटकन कळत नाही. प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस दक्षिणाभिमुख मारुतीची मूर्ती आहे व किल्ल्यात प्रवेश करताच जरीमरीचे मंदिर आहे. येथून उजव्या बाजूस असणाऱ्या जिन्याने महादरवाजावरील नगारखाण्यात पोहोचावे.
येथून डाव्या बाजूच्या बुरुजावर गेल्यावर आपल्याला दोन छोट्या घुमट्या दिसतात. त्यातील खालच्या घुमटीत महाराजांच्या डाव्या पायाचा ठसा व वरच्या घुमटीत उजव्या हाताचा ठसा आहे. किल्ल्याच्या बांधकामाची पाहणी करताना ओल्या चुन्यात महाराजांच्या हाताचा व पायाचा ठसा उमटवला होता. पुढे गेल्यावर महाराष्ट्रात एकमेव असलेले श्रीशिवराजेश्वराचे मंदिर लागते. शिवरायांचे पुत्र राजाराम यांनी नावाड्याच्या वेशातील वीरासनात बसलेली शिवप्रतिमा येथे स्थापन केली आहे. मूर्तीची पूजाअर्चा संकपाळ घराण्याकडे आहे. मूर्तीला पूजेनंतर सोन्याचा किंवा चांदीचा मुखवटा व वस्त्र चढवतात. त्यामुळे मूळ मूर्ती दिसत नाही. देवळात असलेल्या फोटोवरच समाधान मानावे लागते. या मूर्तीसमोर एक मराठा मुठीची तलवार ठेवलेली आहे. शिवराजेश्वर मंदिराच्या मागे श्रीमहादेव मंदिर व मंदिरातच असलेली विहीर आहे. त्याच पदपथावरून पुढे गेल्यावर साखरबाव, दूधबाव व दहीबाव या गोड्या पाण्याच्या विहिरी लागतात. चारही बाजूंनी समुद्र्र असूनही विहिरींचे पाणी गोड आहे. त्यामुळेच शिवरायांनी कुरटे बेटावर किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला. या विहिरींच्या पुढे शिवरायांच्या व ताराराणींच्या वाड्याचे जोते आहेत.
वाड्याच्या अवशेषांच्या पश्चिमेला किल्ल्याच्या तटबंदीपासून वेगळा व आत असलेला उंच दर्याबुरूज किंवा निशाणकाठी बुरूज आहे. बुरुजाजवळ पाण्याचा तलाव आहे. बुरुजाच्या मागच्या बाजूस थोडे चालत गेल्यावर तटबंदीत एक छोटा दरवाजा आहे. या दरवाजातून बाहेर आल्यावर एक छोटीशी पुळण लागते. यास ‘राणीची वेळा’ म्हणतात. ताराराणी ह्या ठिकाणी समुद्रस्नानास येत असत. या दरवाजाच्या समोरच्या बाजूस चुन्याचा घाणा आणि चुना साठवण्याचे हौद पाहायला मिळतात. चुन्याच्या घाण्याच्या बाजूला असलेल्या जिन्याने फांजीवर चढून पुढे गेल्यावर बुरुजात असलेली खोली पाहायला मिळते. फांजेवरून पुढे चालत गेल्यावर एक वाट भगवती देवीच्या मंदिराकडे जाते. मंदिर पाहून परत फांजीवर येऊन किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे चालत जाताना प्रवेशद्वारापासून चौथ्या बुरुजाच्या खाली एक चोरदरवाजा पाहायला मिळतो. या दरवाजाने थेट समुद्रात उतरता येत असे. आज हा दरवाजा दगडांनी चिणून बंद करण्यात आलेला आहे. त्याच्यापुढे दरवाजापासून दुसरा बुरूज हा चिलखती बुरूज आहे. या बुरुजाला दुहेरी तटबंदी आहे. येथून प्रवेशद्वारापाशी आल्यावर आपली गड फेरी पूर्ण होते. याशिवाय किल्ल्यावर गडपुरुष मंदिर पाहता येतात.
किल्ल्याला ४२ बुरूज आहेत. तटबंदीची उंची ३५ फूट तर बुरुजांमधील तटबंदीची रुंदी १० फूट आहे. किल्ल्याचा परीघ ४ कि.मी.चा आहे. तटबंदीत वर-खाली करण्यासाठी ४५ जिने आहेत व ४० शौचकूप आहेत. किल्ल्याच्या परिसरात १०-१२ घरे असून, ‘आकाशात चंद्र, सूर्य असेपर्यंत हा गड सोडू नका’ या शिवरायांच्या आदेशाचं हे लोक अजून पालन करत आहेत.
इतिहास :
हा किल्ला बांधण्यासाठी ५०० पाथरवट, २०० लोहार व ५००० सैन्य किल्ल्याच्या रक्षणासाठी किनाऱ्यावर तैनात होते. हे सर्व जण ३ वर्षे अहोरात्र खपत होते. सागरी लाटांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी व किल्ल्याचा पाया भक्कम करण्यासाठी पायाचा दगडच तब्बल पाच खंडी शिशाच्या रसात बसविला गेला. तसेच घाटावरून मागवलेला चुना वापरून किल्ल्याचे इतर बांधकाम करण्यात आले. सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम प्लवंगनाम संवस्तरे शके १५८९ मधील चैत्र शुद्ध पौर्णिमेला म्हणजे २९ एप्रिल १६६७ रोजी पूर्ण झाले. त्या वेळी शिवाजी महाराज स्वत: हजर होते. किल्ले बांधणीच्या ३ वर्षांच्या काळात महाराजांनी लिहिलेली किल्ले बांधणीसंबंधी मार्गदर्शन करणारी पत्रे उपलब्ध आहेत.
राजारामांच्या मृत्यूनंतर कोल्हापुरातून ताराराणी स्वराज्याचा कारभार पाहात होत्या. शाहू आणि ताराबाई यांच्यात झालेल्या वारणेच्या तहानुसार मालवण परिसराचा ताबा ताराराणींकडे आला.
मेजर गॉर्डन व कॅप्टन वॉटसन यांनी सिंधुदुर्ग २८ जानेवारी १७६५ रोजी ताब्यात घेतला. त्या वेळी किल्ल्यातील दारूखाना जळून खाक झाला. कोल्हापूरच्या राणी जिजाबाई व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यातील करारानुसार २ जानेवारी १७६६ रोजी सिंधुदुर्ग मराठ्यांच्या ताब्यात आला. निपाणीच्या देसाईविरुद्ध इंग्रजांनी करवीरकरांना मदत केली. त्याच्या मोबदल्यात १७९२ला हा गड इंग्रजांच्या ताब्यात गेला.