सुरू झाली कपिल शर्माच्या बायोपिकची तयारी, पण ‘हिरो’ नाही राजी!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 07:33 PM2018-07-30T19:33:18+5:302018-07-30T21:00:00+5:30
अचानक कपिल आठवण्याचे कारण म्हणजे, त्याच्याबद्दलची एक ताजी बातमी. होय, कपिलने म्हणे, एक मोठा प्रोजेक्ट धुडकावून लावला.
कपिल शर्मा दीर्घकाळापासून गायब आहे. नाही म्हणायला सोशल मीडियावर तो अधून मधून उगवतो. पण पडद्यावर परतण्याबाबत मात्र अद्यापही काहीही बोललेला नाही. अचानक कपिल आठवण्याचे कारण म्हणजे, त्याच्याबद्दलची एक ताजी बातमी. होय, कपिलने म्हणे, एक मोठा प्रोजेक्ट धुडकावून लावला. ‘तेरी भाभी है पगले’चे दिग्दर्शक विनोद तिवारी यांनी कपिल शर्माच्या आयुष्यावर बायोपिक बनवण्याची तयारी चालवली आहे. ‘संजू’ बघून त्यांना या बायोपिकची कल्पना सुचली होती. यात कपिल शर्मालाचं या बायोपिकमध्ये कास्ट करण्याची त्यांची इच्छा होती. पण कपिलने म्हणे, या प्रोजेक्टमध्ये फार रस न दाखवता हा प्रस्ताव धुडकावून लावला. यानंतर विनोद यांनी कृष्णा अभिषेकला या चित्रपटात काम करण्याबद्दल विचारले. पण त्यानेही नकार दिला. खुद्द विनोद तिवारी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या बायोपिकची स्क्रिप्ट तयार आहे. ‘कपिल शर्मा - द रिअल हिरो’ हे टायटलही फायनल करण्यात आले आहे. या बायोपिकसाठी कपिल शर्मा माझी फर्स्ट चॉईस होता. पण त्याने माझा प्रस्ताव धुडकावून लावला. कृष्णाचा कॉमिक सेन्स चांगला आहे. त्यामुळे मी त्यालाही आॅफर दिली. त्याने आधी होकार दिला. पण आता त्याने नकार कळवला आहे. कदाचित त्याला कपिल शर्माशी पंगा घ्यायचा नसेल. पण मी मात्र हे बायोपिक बनवणारचं. माझा हिरोचा शोध सुरू आहे, असे ते म्हणाले. ‘संजू’मध्ये संजय दत्तची सकारात्मक बाजू दाखवली गेली. कपिल शर्माच्या बायोपिकमध्येही असेच असणार का, असे विचारले असता, कपिल एक सामान्य माणूस आहे. त्यात मला काहीही निगेटीव्ह दिसत नाहीये. कपिलच्या कथेत त्याचा अमृतसर ते मुंबई, सामान्य कॉमोडियन ते किंग कॉमेडियन असा प्रवास दाखवला जाणार, असे ते म्हणाले.
गतवर्ष कपिलच्या करिअरच्या दृष्टीने फारसे चांगले राहिले नाही. वर्षाच्या सुरुवातीलाच कपिलच आणि सुनील ग्रोवरचे भांडण झाले. याचा फटका शोला बसला यानंतर वारंवार कपिलची तब्येत बिघडायला लागली त्यामुळे शोदेखील ऑफ एअर करण्यात आला. अनेक सेलिब्रेटींना कपिलच्या सेटवर येऊऩ शूटिंग न करताच परतावे लागले होते. गतवर्षी आलेला कपिलचा ‘फिरंगी’ चित्रपट ही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला.