कॉमेडियन कपिल शर्मा रूपेरी पडद्यावर साकारणार स्वत:ची भूमिका?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 05:00 PM2018-07-06T17:00:19+5:302018-07-06T17:02:49+5:30
'तेरी भाभी है पगले' या सिनेमाच्या रिलीजनंतर ते लगेच कपिल शर्मा च्या बायोपिकवर काम सुरु करणार आहेत, असे ते म्हणाले.
मुंबई : कॉमेडियन कृष्णा अभिषेक त्याच्या 'तेरी भाभी है पगले' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सध्या बिझी आहे. दिग्दर्शक विनोद तिवारी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून यावेळी त्यांनी एका वेबसाईटसोबत बोलताना एक मोठी घोषणा केली. 'तेरी भाभी है पगले' या सिनेमाच्या रिलीजनंतर ते लगेच कपिल शर्मा च्या बायोपिकवर काम सुरु करणार आहेत, असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, 'कपिल शर्माच्या बायोपिकची कॉन्सेप्ट तयार आहे. सगळंकाही ठिक राहिलं तर ते एका महिन्यानंतर या सिनेमावर काम सुरु करतील. 2009 मध्ये आम्ही कपिल कॉमेडी शो करत असताना त्याला एका पंजाबी सिनेमासाठी फायनल केलं होतं. पण कपिल त्यावेळी वेळ देऊ शकल नाही. आता कपिल फार मोठा स्टार झाला आहे. त्यांचा झिरो ते हिरो हा प्रवास फारच रोमांचक आणि संघर्षाने भरलेला होता. त्याच्या या गोष्टींवर सिनेमा केला जाऊ शकतो'.
विनोद पुढे म्हणाले की, 'कपिल लोकप्रियतेच्या इतक्या उंचीवर जाऊनही त्याचे पाय जमिनीवर आहेत. गेल्या काही दिवसांपासून बायोपिकचा ट्रेन्ड चांगलाच सुरु आहे. आता कपिलचाही सिनेमा येऊ शकतो. या बायोपिकचं टायटल अजून ठरवण्यात आलेलं नाहीये. कपिलच्या कथेत त्याचा अमृतसर ते मुंबई, सामान्य कॉमोडियन ते किंग कॉमेडियन असा प्रवास दाखवला जाणार'.
ते म्हणाले की, 'कथा पूर्णपणे तयार आहे. पण आतापर्यंत याबाबत आम्ही कपिलसोबत काही बोललो नाहीये. जर कपिल यासाठी तयार झाला तर या सिनेमात मुख्य भूमिकाही त्यालाच करण्याची आमची विनंती असेल. जर कपिलने तसा नकार दिला तर कपिलच्या भूमिकेसाठी आम्ही कृष्णा अभिषेकला घेऊ'.