आर. के. स्टुडिओ होणार इतिहासजमा, कपूर कुटुंबाने घेतला विकण्याचा निर्णय!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 02:18 PM2018-08-26T14:18:35+5:302018-08-26T14:19:07+5:30
होय, कपूर भावंडांनी अनेक अजरामर चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या या स्टुडिओला विकण्याचा निर्णय घेतला आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक क्लासिक चित्रपटांचा साक्षीदार राहिलेला आर. के. स्टुडिओच्या आता केवळ स्मृती उरणार. होय, कपूर भावंडांनी अनेक अजरामर चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या या स्टुडिओला विकण्याचा निर्णय घेतला आहे. स्टुडिओतून मिळणारं उत्पन्न तुलनेने कमी असून त्याच्या देखभालीसाठी होणारा खर्चच जास्त असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कळते.
ऋषी कपूर यांनी या बातमीला दुजोरा दिला. आर.के. स्टुडिओला लागलेल्या भीषण आगीनंतर स्टुडिओचे आणि त्यात संग्रहीत केलेल्या स्मृतींचेही अतोनात नुकसान झाले. आता तो पुन्हा उभा करणे शक्य नाही. आता हा स्टुडिओ विकणं योग्य ठरेल असा निर्णय आम्ही सर्वानुमते घेतला, असे त्यांनी स्पष्ट केले.
शो मॅन राज कपूर यांनी या स्टुडिओची स्थापना केली होती. या स्टुडिओने चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ पाहिला.
गतवर्षी सप्टेंबर महिन्यात या स्टुडिओच्या स्टेज नंबर १ वर ‘सुपर डान्सर’या डान्स रिअॅलिटी शोचा सेट उभारण्यात आला होता. या सेटवर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. आधी सेटवरच्या पडद्यांनी पेट घेतला आणि मग संपूर्ण स्टेज जळून खाक झाला होता. काहीच क्षणात स्टुडिओच्या अन्य भागात ही आग पसरली होती. या आगीने अनेक जुन्या आठवणी क्षणात नष्ट झाल्यात. ऋषी कपूर यांनी याबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले होते. अजूनही विश्वास बसत नाहीये, असे ते म्हणाले होते.
१९५१ मध्ये मधला ‘आवारा’, १९५३ मध्ये आलेला ‘आह’,१९५५ मधला ‘श्री 420’, त्यानंतर आलेले ‘जागते रहो’, ‘जिस देश मे गंगा बहती है’,‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘प्रेम रोग’, ‘राम तेरी गंगा मैली’, ‘हिना’, ‘प्रेम ग्रंथ’ अशा एकापेक्षा एक सरस चित्रपटांची निर्मिती आर. के. स्टुडिओमध्ये झाली आहे. या सर्व चित्रपटांचे कॉस्च्युम आर. के. स्टुडिओमध्ये संग्रहित ठेवले गेले होते. पण आगीत हे सगळे कॉस्च्युम भस्म झालेत. आर. के. स्टुडिओमध्ये शूटींग झालेल्या प्रत्येक चित्रपटाचे कॉस्च्युम येथे संरक्षित ठेवले जात. नरगिसपासून तर ऐश्वर्या राय बच्चनने त्यांच्या चित्रपटांत घातलेले पोशाख येथे संग्रहीत करण्यात आले होते. पण ते सगळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ‘जिस देश में गंगा बहती है’ या चित्रपटात पद्मिनीने घातलेले ज्वेलरी याठिकाणी संग्रहीत करण्यात आली होती.