Birthday Special: तुरुंगात असताना संजय दत्तला झाले होते प्रेम!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 09:14 AM2018-07-29T09:14:02+5:302018-07-29T09:16:04+5:30
संजयची पहिली पत्नी होती पत्नी रिचा शर्मा. रिचा शर्माबद्दल तुम्ही अनेक गोष्टी ऐकल्या वा वाचल्या असतील. पण आज आम्ही संजयच्या दुस-या पत्नीबद्दल म्हणजेच, रिया पिल्लईबद्दल तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत.
बॉलिवूडचा ‘मुन्नाभाई’ संजय दत्त याचा आज (२९ जुलै) वाढदिवस. संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेला ‘संजू’ अलीकडेच प्रदर्शित झाला. या चित्रपटाने संजूबाबाच्या आयुष्यातील अनेक रहस्यांवरून पडदा उठवला. अर्थात यात संजयच्या पहिल्या व दुसऱ्या पत्नीबद्दल काहीच दाखवण्यात आले नाही, असा आरोपही झाला. संजयची पहिली पत्नी होती पत्नी रिचा शर्मा. रिचा शर्माबद्दल तुम्ही अनेक गोष्टी ऐकल्या वा वाचल्या असतील. पण आज आम्ही संजयच्या दुस-या पत्नीबद्दल म्हणजेच, रिया पिल्लईबद्दल तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत.
संजयच्या आयुष्यात अनेक वादळे आलीत. मग ते त्याचे ड्रग्जचे व्यसन असो, अवैधरित्या शस्त्रास्त्र बाळगल्याचा आरोप असो किंवा अनेक अभिनेत्रींसोबतचे त्याचे अफेअर्स असो. त्याच्या आयुष्यात अनेक नट्या आल्यात. यापैकी तिघींशी त्याने लग्न केले.
पहिली अभिनेत्री होती रिचा शर्मा. १९८७ मध्ये संजयने रिचाशी लग्न केले. लग्नानंतर रिचाने बॉलिवूड इंडस्ट्रीला कायमचा रामराम ठोकला. रिचा व संजयची त्रिशाला नावाची एक मुलगीही आहे. पण रिचाला कॅन्सरने ग्रासले आणि १९९६ मध्ये तिचे निधन झाले.
रिचानंतर संजयच्या आयुष्यात आली ती मॉडेल आणि सोशललाईट रिया पिल्लई. संजय व रिया आधीपासूनचे मित्र होते. पण त्यांचे प्रेम ऐन बहरात असताना संजयला मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात तुरुंगात जावे लागले. या काळात रिया संजयच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. तुम्हाला कदाचित माहित नसेल की, रिया ही हैदराबादचे महाराजा नरसिंहगिर धनराजगिर ज्ञान बहादूर यांची नात आहे. रियाने संजयला खूप मोठा आधार दिला. या काळात ती संजयला भेटायला तुरुंगात जायची. तुरुंगात असताना मी रियाच्या प्रेमात पडलो, असे संजयने एका मुलाखतीत सांगितले होते. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर व्हॅनेन्टाईन डे पार्टीत संजयने रियाला लग्नासाठी प्रपोज केले. यानंतर दोघांनी साईबाबा मंदिरात लग्न केले. लग्नानंतर संजयने सात चित्रपट साईन केलेत आणि आपल्या कामात बिझी झाला. तो इतका बिझी झाला की, रियाला वेळ देऊ शकला नाही. शूटींगमुळे माझी पर्सनल लाईफ संपलीय, अशी कबुली खुद्द संजयनेच दिली होती. पण यामागचे वास्तव काही वेगळेच होते.
होय, प्रत्यक्षात संजय मान्यताच्या जवळ आला होता आणि रिया टेनिस प्लेअर लिएंडर पेसला डेट करू लागली होती. रिया एक मॉडेल होती आणि आर्ट आॅफ लिव्हिंगची इंस्ट्रक्टर होती. संजयसोबत लग्न केल्यानंतर दोनचं वर्षांत दोघांमध्येही खटके उडू लागले होते. दोघांना एकत्र राहणे कठीण झाले आणि मग त्यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. असे म्हणतात की, घटस्फोटाची केस फाईल झाल्यानंतरही रिया तिचे शॉपिंग आणि अन्य खर्चांचे बिल संजयला पाठवायची. रिया लिएंडरला डेट करत होती. पण लग्न तुटण्यासाठी तिने सर्वस्वी संजयला दोषी ठरवले होते. साहजिकच लोकांच्या नजरेत संजय ‘खलनायक’ बनला होता.
२००८ मध्ये संजय व रियाचा घटस्फोट झाला. यानंतर संजयने मान्यतासोबत लग्न केले आणि रिया लिएंडरसोबत राहू लागली. दोघांनी लग्नही केले. पण या लग्नाची गोष्ट त्यांनी जगापासून लपवून ठेवली. दोघांना एक मुलगी ही झाली. पुढे रियाने लिएंडरविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकरण दाखल केले. यावेळी माझे व रियाचे कधीच लग्न न झाल्याचे लिएंडरने म्हटले. मी रियासोबत लिव्ह इनमध्ये होतो, असे तो म्हणाला. रियाच्या मते, लिएंडर पहिल्या दिवसापासूनचं तिला धोका देत होता. आता लिएंडर व रिया वेगळे झाले आहेत आणि संजय व मान्यता आनंदाने एकत्र नांदताहेत.