संजू या चित्रपटातील रणबीर कपूरच्या लूकमागे हा या व्यक्तींचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 01:48 PM2018-07-13T13:48:40+5:302018-07-13T13:50:44+5:30
दोन आठवड्यांनंतरही गर्दी खेचणाऱ्या या सिनेमातले रणबीर कपूरचे आठ लूक्स सध्या गाजतायत. संजूचे हे आठ लूक्स डिझाइन करणारे शिल्पकार आहेत, सुरेंद्र साळवी – जितेंद्र साळवी हे दोघे भाऊ.
संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित असलेला संजू हा चित्रपट सध्या चांगलाच गाजतो आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे अाजवरचे अनेक रेकॉर्ड मोडले असून या चित्रपटाची घौडदौड सुरूच आहे. दोन आठवड्यांनंतरही गर्दी खेचणाऱ्या या सिनेमातले रणबीर कपूरचे आठ लूक्स सध्या गाजतायत. संजूचे हे आठ लूक्स डिझाइन करणारे शिल्पकार आहेत, सुरेंद्र साळवी – जितेंद्र साळवी हे दोघे भाऊ.
संजू चित्रपटात रणबीरसोबतच परेश रावल, सोनम कपूर, अनुष्का शर्मा यांचा लूक खूलवण्यामागेसुद्धा सुरेंद्र-जितेंद्र या भावांचा सिंहाचा वाटा आहे. या दोन भावंडांनी संजूच्या मुख्य स्टारकास्टासाठी वीग डिझाइन केले आहेत.
सुरेंद्र आणि जितेंद्र साळवी यांनी आजवर कुली, खुदा गवाह, बाजीराव-मस्तानी, थ्री इडियट्स, अग्निपथ, बाहुबली, पद्मावत, 102 नॉट आऊट अशा चारशेहून अधिक चित्रपटांसाठी वीग डिझाइन केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूडमध्ये गेली 38 वर्षं काम करणाऱ्या सुरेंद्र साळवी आणि 16 वर्षं काम करणाऱ्या जितेंद्र साळवी यांनी बॉलिवूडच्या 95 टक्के सिनेमांसाठी वीग डिझाइन केले आहेत. कुली सिनेमापासून सुरू झालेला हा सिलसिला आता संजूपर्यंत अविरत सुरू आहे. सिनेमाच नाही तर अॅड फिल्मसाठीही या भावांची 'नॅचरल हेअर' ही कंपनी विग डिझाइन करते. सुरेंद्र साळवी याविषयी सांगतात, “काल्पनिक आणि ऐतिहासिक व्यक्तिरेखांसाठी विग डिझाइन करणे सोपे असते. पण एखाद्या लिविंग लिजेंडसाठी लूक डिझाइन करणे हे आव्हानात्मक असते. पण मी सुनील दत्त आणि संजय दत्त या दोघांसोबत काम केले असल्याने मला दोघांच्याही केसांचे स्ट्रक्चर माहीत होते. त्यामुळे वीग डिझाइन करणे माझ्यासाठी सोपे झाले. आम्ही रणबीरसोबत 15 ते 20 लूक्स ट्राय केल्यावर त्यातले आठ लूक्स राजू हिरानींनी फायनल केले.” तर जितेंद्र साळवी सांगतात, “एक दिवस संजय दत्त सेटवर आले होते आणि त्यांनी रणबीरचा लूक पाहून ‘क्षणभर मी स्वत:ला आरशात पाहिल्याचा मला भास झाला’ असं म्हटलं होतं आणि आम्हाला आमच्या कामाची पोचपावती मिळाली.”