Tanushree Dutta Harassment Case : तनुश्री दत्ताच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल!!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 11:17 AM2018-10-01T11:17:07+5:302018-10-01T11:17:35+5:30
‘हॉर्न ओक प्लीज’ या चित्रपटाच्या एका गाण्याच्या शूटींगवेळी नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केले होते आणि यानंतर एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्याला धमकावले होते,असा तनुश्रीचा आरोप आहे.याच घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ २००८ सालचा आहे.
तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांचा वाद दिवसागणित चिघळत असल्याचे दिसतेय. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपांचीच चर्चा आहे. ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या एका गाण्याच्या शूटींगवेळी नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केले होते आणि यानंतर एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्याला धमकावले होते,असा तनुश्रीचा आरोप आहे. ताज्या मुलाखतीत तनुश्रीने दहा वर्षांपूर्वीचे हे प्रकरण उखरून काढत, नानावर गंभीर आरोप केलेत. याच घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ २००८ सालचा आहे.
व्हिडिओत काही लोक तनुश्रीच्या गाडीवर हल्ला करताना दिसत आहे. या गाडीत तनुश्री बसलेली आहे. तनुश्रीच्या गाडीवर हल्ला करणारे लोक कथितरित्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अर्थात मनसेचे कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात येत आहे. हे कार्यकर्ते तनुश्रीच्या गाडीची तोडफोड करत आहेत. एक इसम तिच्या गाडीच्या चाकातील हवा काढताना दिसतोय. एक तर गाडीच्या छतावर उड्या मारतो आहे. तनुश्रीच्या गाडीचा फ्रंट काचही फुटलेला दिसतोय. याच घटनेच्या संदर्भात तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर आरोप केले आहेत. या हल्ल्यासंदर्भात तनुश्रीने नाना पाटेकर यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. पण यावर काहीच कारवाई झाली नव्हती, असाही तनुश्रीचा आरोप आहे. तनुश्रीच्या आरोपांवरून सध्या बॉलिवूडमध्ये घमासान सुरू आहे, बॉलिवूड दोन गटात विभागले गेले आहे. काहींनी तनुश्रीचे आरोप खोटे आणि पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हटले आहे. पण अनेक जण तनुश्रीची बाजू घेणारेही आहेत.
नाना पाटेकर, गणेश आचार्य यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असताना ‘हॉर्न ओके प्लीज’चे दिग्दर्शक राकेश सारंग यांनीही तनुश्रीचे हे आरोप पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हटले आहे. कदाचित तिला पुन्हा कमबॅक करायचे असेल. म्हणून जाणीवपूर्वक तिने हे प्रकरण उखरून काढले असावे, असे त्यांनी म्हटले आहे. कुणालाही फ्लर्ट करायचे असेल तर ती व्यक्ती सर्वांदेखत करेल का, असा सवाल करून त्यांनी नाना पाटेकर यांची बाजू उचलून धरली आहे.
अनेकांनी तनुश्रीचे आरोप खोटे ठरवले असले तरी प्रियांका चोप्रा, सोनम कपूर, ट्विंकल खन्ना, रिचा चड्ढा, स्वरा भास्कर, फरहान अख्तर आदींनी तनुश्रीला पाठींबा दिला आहे.