खडकपूर्णा नदीपात्रावरील पूल कठडेविना
By admin | Published: August 13, 2015 12:12 AM2015-08-13T00:12:22+5:302015-08-13T00:12:22+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष.
देऊळगावराजा (जि. बुलडाणा) : राज्य महामार्गावर असलेल्या पुलांना कठडे नसल्याने अपघाताच्या मोठय़ा घटना घडून निष्पाप लोकांना लाखमोलाचा जीव गमवावा लागल्याच्या घटना ताज्या असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने या घटनांचे गांभीर्य घेतले नसल्याचे राज्य महामार्ग क्र.१७६ वरील देऊळगाव महीनजीक असलेल्या कठडेविना पुलाकडे बघून स्पष्ट होते. १00 वर्षांपूर्वी ब्रिटिशकालीन राजवटीमध्ये देऊळगावराजा ते चिखली महामार्गावर देऊळगावमहीजवळ खडकपूर्णा नदीपात्रावर या पुलाची निर्मिती करण्यात आली होती. आजच्या स्थितीत हा पूल अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये आहे. या पुलाला संरक्षक कठडे नसल्याकारणाने, अजून एक गंभीर बाब म्हणजे या पुलाच्या दोन्ही बाजूला दोन मोठी वळणे असून, ती ओलांडल्यानंतर वाहनचालकांना या पुलाचे दर्शन घडते. वळणाच्या ठिकाणी गतिरोधक नसल्याने वाहने भरधाव वेगात असतात. वाहने पुलावर आल्यानंतर कठडेविना पुलावरून चालकांना वाहने न्यावी लागतात. दोन्हीकडची वाहने पुलावर समोरासमोर आल्यानंतर वाहनचालकांच्या चुकीमुळे किंवा वाहनांना काही दोष निर्माण झाल्यास वाहन पुलावरून खाली कोसळण्याशिवाय पर्याय उरत नाही. राज्यात कठडेविना पुलावर प्रवासी वाहन किंवा मालगाडी खाली पडून जीवितहानी झाल्याच्या घटना ताज्या असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने खडकपूर्णा नदीपात्रावरील कठडेविना पुलाची दखल घेतली नसल्याने या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.