बुलडाणा: पुर्णा नदीच्या पुलावर बस-कंटेनरची धडक झाल्याने कंटेनर नदीपात्रात कोसळला, चालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 02:04 PM2017-12-07T14:04:54+5:302017-12-07T14:16:50+5:30
नांदुरा तालुक्यातील येरळी नजीकच्या पुर्णा नदीच्या पुलावर गुरुवारी दुपारी भरधाव कंटेनरने बसला धडक दिली. या अपघातात कंटेनर नदी पात्रात कोसळून चालक ठार झाला.
नांदुरा : नांदुरा तालुक्यातील येरळी नजीकच्या पुर्णा नदीच्या पुलावर गुरुवारी दुपारी भरधाव कंटेनरने बसला धडक दिली. या अपघातात कंटेनर नदी पात्रात कोसळून चालक ठार झाला. तर बसचा अर्धा भाग पूलावरून लोंबकळलेल्या स्थितीत आहे. पुलाच्या दगडाला बस अडकल्यामुळे सुदैवाने बसमधील तब्बल ५५ प्रवाशांचे प्राण वाचले. ही घटना गुरुवारी दुपारी १.१५ वाजता तालुक्यातील येरळीजवळ घडली.
जळगाव जामोद येथून एमएच ०७-सी. ९२७० क्रमांकाची बस नांदुरामार्गे बुलडाणा येथे जात होती. दरम्यान येरळीजवळील पुर्णा नदीच्या पुलावरून बस जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या कन्टेनरने बसला धडक दिली. ही धडक येवढी जबरदस्त होती की बस मागे सरकून पुलाच्या काठावर अडकली. तर कंटेनर पुलावरून खाली कोसळला. त्यात कन्टेनरमधील ट्रक चालकाचा मृत्यू झाला. बसमध्ये ५५ प्रवाशी होते. केवळ दैव बलवत्तर म्हणून या प्रवाशांचे प्राण वाचले. अपघाताची वार्ता समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन प्रवाशांना बाहेर काढले. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले असून, बस पुलावरून काढण्याचे काम सुरु आहे. यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूची वाहतुक खोळंबली आहे.