संवेदनशील शहरांत सीसी कॅमेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2016 02:18 AM2016-02-13T02:18:26+5:302016-02-13T02:18:26+5:30
खामगाव, नांदुरा आणि मलकापूर शहरात सीसी कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
मलकापूर : कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील म्हणून गणल्या जाणार्या जिल्हय़ातील खामगाव, नांदुरा आणि मलकापूर शहरात सीसी कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. प्रामुख्याने संवेदनशील भागात येत्या चार वर्षांत हे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. मलकापूर येथील विश्रामगृहावर १२ फेब्रुवारीला विविध विभागाच्या घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी ही बाब स्पष्ट केली. जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे, कार्यकारी अभियंता थोटांगे, नियोजन अधिकारी दीपक सिडाम, एसडीओ चंद्रकांत वानखेडे, तहसीलदार जोगी यावेळी उपस्थित होते. येत्या चार वर्षांसाठी ५0 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात ३0 लाख रुपयांचा निधी देण्यात येईल. सोबतच हायमास्क दिव्यांसाठी निधी मंजूर झाला असून, मोठय़ा गावात दोन तरी हायमास्क दिवे लावणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. मलकापूर पालिकेला नगरोत्थान, वैशिष्ट्यपूर्ण योजना व दलित वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे स्पष्ट करीत, यातून शहरातील विकास कामे करण्यात येतील, असे ते म्हणाले. मलकापूर ग्रामीण या नवीन ग्रामपंचायतीसाठी रस्ते, गटारी निर्माण करण्यासाठी विशेष बाब म्हणून दीड कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. दुसरीकडे मलकापूर विधानसभा मतदारसंघासाठी रस्ते विकासांतर्गत साडेसात कोटी रुपये मंजूर केल्याचे पालकंत्र्यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम विभागाला हा निधी देण्यात आला असल्याचे स्पष्ट करीत ५00 लोकसंख्येवरील एकही गाव डांबरीकरणापासून वंचित राहणार नाही.