केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट संघटनेचा आज बंद
By admin | Published: May 30, 2017 12:53 AM2017-05-30T00:53:28+5:302017-05-30T00:53:28+5:30
जिल्ह्यात २० औषध दुकाने राहणार सुरू
बुलडाणा: आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट यांनी ३० मे रोजी देशातील औषध दुकाने बंद ठेवत असल्याचा निर्णय घेतला आहे. तातडीचे प्रसंगी औषध मिळण्याकरिता केमिस्ट संघटनेकडून जिल्ह्यात २० दुकाने सुरू ठेवण्यात येणार आहेत.
रुग्णांची गैरसोय होऊ नये व औषधांचा तुटवडा पडू नये, याकरिता अन्न व औषध प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत, तसेच रुग्णांचे हित लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व केमिस्ट यांनी नित्यनेमाने ज्या वेळेत व्यवसाय आहे, त्या वेळेत व्यवसाय करण्याची विनंती केली आहे व ३० मेच्या बंदमध्ये सहभागी न होण्याचे आवाहनही केले आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, इंडियन मेडिकल असोसिएशन बुलडाणाचे अध्यक्ष व नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, बुलडाणा यांनी आपल्या अधिपत्याखालील सर्व रुग्णालयांनी पुरेशा प्रमाणात औषध साठा उपलब्ध करून रुग्णांची गैरसोय होणार नाही, याबाबत सूचना देण्याचे आवाहन केले आहे. बंदच्या दिवशी कार्यालयामध्ये संपर्क नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा व औषध दुकानांनी बंदमध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन सहायक आयुक्त रा. ल पाटील यांनी केले आहे.