पशुसंवर्धन विभाग वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:01 AM2018-05-11T00:01:01+5:302018-05-11T00:01:01+5:30
स्थानिक पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत नेहमी दांडी मारत असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांअभावी पशुसवंर्धन विभाग ओस पडला आहे. परिणामी ग्रामीण भागातून दूरवरून येणाऱ्या पशुपालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : स्थानिक पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत नेहमी दांडी मारत असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांअभावी पशुसवंर्धन विभाग ओस पडला आहे. परिणामी ग्रामीण भागातून दूरवरून येणाऱ्या पशुपालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पं.स.च्या पशुसंवर्धन विभागाचा भोंगळ कारभार या निमित्ताने समोर आला आहे. कार्यालय खुले मात्र टेबल, खुर्च्यावर कोणीच नाही, अशी स्थिती या कार्यालयाची दिसून येते.
प्रस्तुत प्रतिनिधीने दोन दिवस कार्यालयीन वेळेत पं.स.च्या पशुसंवर्धन विभागात सतत भेट दिली असता, कार्यालय खुले, टेबल-खुर्च्या रिकाम्या. मात्र एकही अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहत असल्याचे दिसून आले नाही. ग्रामीण भागातून आलेले बरेचशे नागरिक कार्यालयाला भेट देऊन परत जात असल्याचे दिसून आले. येथील पशुधन विकास अधिकाऱ्यांचे पद रिक्त असल्याने या पदाचा भार एका पशुधन विकास अधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहे. ते सुध्दा आठवड्यातून एक-दोन दिवस कर्तव्यावर दिसतात. इतर दिवशी मिटींगला गेले, दौऱ्यावर गेले असे येथील कर्मचाऱ्यांकडून सांगितले जाते. आरमोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. मात्र पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे तसेच रिक्त पदांमुळे तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाची सेवा पूर्णत: ढासळलीआहे. तालुक्याच्या शिवणी (खुर्द) येथे अज्ञात आजाराने पाच गुरे नुकतीच दगावली. याला डॉक्टर व कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात. मात्र या योजनांची जनजागृती केली जात नसल्याने तालुक्यातील बºयाच पशुपालकांना योजनांची परिपूर्ण माहिती नसल्याचे वास्तव आहे.
विभागाच्या कामाची चौकशी करा
अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे पं.स.च्या पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची पूर्णत: वाट लागली आहे. त्यामुळे विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, अधिकाºयांचे बैठकानिमित्त होणारे दौरे तसेच उचल केलेले भत्ते याची सखोल चौकशी करण्यात यावी, पं.स.च्या पशुसंवर्धन विभागात कार्यालयीन वेळेत गैरहजर राहणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी तालुक्यातील पशुपालकांनी केली आहे. या बाबीकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे.