रिक्त पदे असूनही शिक्षक भरती बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2017 12:13 AM2017-07-07T00:13:31+5:302017-07-07T00:13:31+5:30

शिक्षण विभागात : हजारो पदवीधर बेरोजगार

Despite the vacant positions, the recruitment was stopped! | रिक्त पदे असूनही शिक्षक भरती बंद!

रिक्त पदे असूनही शिक्षक भरती बंद!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : राज्यात प्राथमिक शिक्षकांची २ लाख ७३ हजार ८४३ पदे मंजूर असून, सध्या २ लाख ५८ हजार ५२० शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षक भरती २००९ च्या शिक्षण कायद्यानुसार रिक्त पदे तातडीने भरणे गरजेचे असतानाही भरती झालेली नाही. त्यामुळे राज्यभरातील शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांची १५ हजार ४२३ पदे रिक्त आहेत. दुसरीकडे लाखो पदवीधारक बेरोजगार असतानाही रिक्त पदे भरण्यात येत नाही.
सन २०१० मध्ये १५ हजार १२ शिक्षक पदासाठी सीईटी घेण्यात आली होती. त्यामध्ये १ लाख ८५ हजार ८०० डी.एड्.धारकांनी सीईटी दिली होती; परंतु त्यानंतर राज्यात गेल्या सात वर्षांपासून शिक्षक भरतीच झालेली नाही. त्यामुळे लाखो डी.एड्., बी.एड्.धारकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. शिक्षक पदासाठी आवश्यक असलेला अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून, भावी शिक्षकांचा लोंढा बाहेर पडत आहे. शैक्षणिक पात्रता असलेले लाखो डीएड् व बीएड्धारक उमेदवार राज्यात आहेत. सन २०१० मध्ये शिक्षकांच्या १५ हजार १२ जागांसाठी सीईटी घेण्यात आली होती. त्यावेळी १ लाख ८५ हजार ८०० विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा दिली होती. त्यापैकी १५ हजार १२ विद्यार्थ्यांची निवड करून उर्वरित ७० हजार ७८८ भावी शिक्षक नोकरीपासून वंचित राहिले; मात्र त्यानंतर गेल्या सात वर्षात सीईटी परीक्षा झाली नाही आणि शिक्षक भरतीसुद्धा घेण्यात आली नाही. राज्यात शाळांमध्ये गुणात्मक व दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने भावी शिक्षकांची सन २०१३ पासून टीईटीच्या माध्यमातून पुन्हा चाळणी करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला या टीईटीला उमेदवारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. पहिल्याच वर्षी राज्यभरातून जवळपास ६ लाख २१ हजार उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा दिली; मात्र आता शिक्षक भरतीच होत नसल्याने डी.एड्. व बी.एड्.धारकांचा टीईटी देण्याकडेही निरुत्साह दिसून येत आहे. राज्यात जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावरील रिक्त पदे असूनही डी.एड्., बी.एड्.धारकांना भरती प्र्रक्रियेची प्रतीक्षा करावी लागत आहे. शिक्षकांच्या रिक्त असणाऱ्या हजारो पदांसाठी तातडीने भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी बेरोजगार उमेदवारांकडून होत आहे.

बेरोजगारांची संख्या वाढली
सात वर्षांपासून शिक्षक भरती न झाल्याने डी.एड्. व बी.एड्.धारकांची संख्या वाढली आहे. सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न गंभीर बनत आहे. त्यामुळे राज्यभरात लाखोंच्या संख्येने असलेले बेरोजगार शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत.

राज्य शासनाने रिक्त पदे भरण्याची गरज आहे. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांवर ताण येणार नाही, तसेच बेरोजगारांना रोजगारही मिळेल व शिक्षणाचा दर्जा सुधारेल.
- प्रशांत खाचणे
विभागीय अध्यक्ष, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी परिषद, बुलडाणा.

Web Title: Despite the vacant positions, the recruitment was stopped!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.