पाणी असूनही सुटाळा तहानलेलाच!
By admin | Published: November 5, 2014 11:49 PM2014-11-05T23:49:14+5:302014-11-05T23:49:14+5:30
खामगाव तालुक्यातील प्रकार, १३ दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प.
खामगाव (बुलडाणा) : स्थानिक एकता कॉलनी, ओमनगर, प्रशांतनगर आदी परिसरासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. परंतु, ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभारामुळे पाणी असूनही उपरोक्त परिसरात मागील १३ दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
शहराला लागून असलेल्या तायडे कॉलनी, एकता कॉलनी, प्रशांतनगर, राठी ले-आउट, ओमनगर आदी परिसरासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जवळपास ६0 लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. योजनेचे काम पूर्ण होऊन चाचणीच्या नावाखाली मागील तीन वर्षांपासून सदर परिसराला दे धक्कानुसार पाणीपुरवठा केला जात आहे. सदर योजनेसाठी नेमलेल्या पाणीपुरवठा समितीने वारंवार सदर योजना ग्रामपंचायतने ताब्यात घ्यावी, याकरिता प्रयत्न केले आहे. परंतु, ग्रामपंचायतीच्या ढेपाळलेल्या नियोजनामुळे सदर योजना हस्तांतरित झाली नाही. त्यामुळे कधी तीन दिवसाआड, तर कधी १0 दिवसांनंतर पाणीपुरवठा होत होता. विशेष म्हणजे, एकता कॉलनी, राठी ले-आउट, ओमनगर, प्रशांतनगर परिसरातील पाण्याची पातळी अत्यंत खालावली असून, या ठिकाणी ३00 फुटांपर्यंंत बोअर करूनसुद्धा पाणी लागत नाही. परिसरात बहुतांश हातमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यामुळे त्यांना बोअरवेल करण्याचा खर्चसुद्धा परवडत नाही. परिणामी त्यांना पाणीपुरवठा योजनेच्या पाणीपुरवठय़ावरच अवलंबून राहावे लागत आहे. विशेष म्हणजे, १५ वर्षे जुन्या या परिसरात ग्रामपंचायतद्वारा एकही हातपंप बसविण्यात आला नाही. त्यामुळे नळाद्वारे पाणीपुरवठा न झाल्यास नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. परंतु, जवळपास विहीरही नसल्याने नाइलाजाने २0 रुपये ड्रम किंवा १२0 रुपये दराने पाणी विकत घ्यावे लागत आहे.