जिल्हय़ावर दुष्काळाचे सावट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:14 AM2017-08-18T00:14:41+5:302017-08-18T00:16:51+5:30

बुलडाणा : जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतातील उभे पीक सुकायला लागले आहे, तर काही ठिकाणी पिकांनी माना टाकल्या असून, यावर्षी उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये कमी-जास्त प्रमाणात दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून, याबाबत शासनाने सर्व्हे करून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विविध राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांमधून वाढत आहे. 

Due to drought on the district! | जिल्हय़ावर दुष्काळाचे सावट!

जिल्हय़ावर दुष्काळाचे सावट!

Next
ठळक मुद्देदुष्काळ जाहीर करण्याची मागणी पावसाअभावी पिके करपली

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतातील उभे पीक सुकायला लागले आहे, तर काही ठिकाणी पिकांनी माना टाकल्या असून, यावर्षी उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये कमी-जास्त प्रमाणात दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून, याबाबत शासनाने सर्व्हे करून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विविध राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांमधून वाढत आहे. 
जिल्ह्यात पेरणीच्या सुरुवातीलाच चांगल्या पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यात ७ लाख ४८ हजार ८00 हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी करण्यात आली. सुरुवातीला झालेल्या पावसावर आतापर्यंत पिके तग धरून होती; मात्र सध्या पावसाने पाठ फिरवल्याने घाटावरील पिकांची परिस्थिती चिंताजनक आहे. पावसाअभावी घाटावरील बुलडाणा, चिखली, मोताळा, लोणार, सिंदखेडराजा, मेहकर, देऊळगावराजा या तालुक्यांमधील लाखो हेक्टर क्षेत्रावरील पिके धोक्यात सापडली आहेत, तर घाटाखालील खामगाव, शेगाव, नांदुरा, संग्रामपूर, मलकापूर व जळगाव जामोद तालुक्यात पावसाची ही उघडीप दुष्काळाचे सावट निर्माण करीत आहे.   पाऊस लांबल्याने पिकांवर परिणाम झाला असून, सोयाबीनने माना टाकल्या आहेत. कपाशी पिकांचीही वाढ खुंटल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी शेतकरी पिकांना वाचविण्यासाठी टँकरने पाणी पुरवत असल्याचे चित्रही पाहावयास मिळत आहे.  पाऊस येत नसल्याने  शेतकर्‍यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. त्यामुळे पिकांची परिस्थिती पाहता, जिल्ह्यात पिकांचा सर्व्हे करून दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व शेतकर्‍यांकडून जोर धरत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत  सरासरी ३५३.३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षी आतापर्यंंत ५५३.७ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली होती. यावरून मागील वर्षीपेक्षा यावर्षी पावसाचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात कमी असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी जिल्ह्यातील अनेक प्रकल्पात अल्प जलसाठा दिसून येत असून, येणार्‍या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी मोठय़ा प्रमाणात भटकंती करावी लागणार आहे. 

मोताळा तालुक्यात पिके सुकली! 
 तालुक्यात पावसाअभावी पिके सुकत चालली आहेत.  तालुक्यात पावसाने दगा दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. तालुक्यातील पिकांना पावसाची नितांत गरज आहे. पाऊस नसल्यामुळे पिके मोठय़ा प्रमाणावर सुकत आहेत. यावर्षी समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता; मात्र या हवामान खात्याचा अंदाजही चुकीचा ठरल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तालुक्यातील जयपूर, वरुड, खरबडी, जनुना, कोथळी शिवारातील पावसाअभावी जळालेल्या पिकांची आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी पाहणी केली. पाहणी केल्यानंतर संबंधित यंत्रणेला संपूर्ण तालुक्यातील शेतीचे तातडीने सर्वेक्षण करण्याची व शेतकर्‍यांना तत्काळ मदतीसाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी संबंधित गावातील शेतकर्‍यांना दिले. पिकांची पाहणी करताना आ.हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत मोताळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिल खाकरे, नाना देशमुख, युवकचे जिल्हा उपाध्यक्ष इरफान पठाण, विक्रम देशमुख, नीलेश जाधव, बाळू नावकर व शेतकरी उपस्थित होते.           

मेहकर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी
 मेहकर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा, अशी मागणी मेहकर शिवसेनेच्यावतीने १४ ऑगस्ट रोजी करण्यात आली आहे. मेहकर तालुक्यावर गेल्या २ ते ३ वर्षांपासून दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होत आहे, तर यावर्षीसुद्धा पावसाची परिस्थिती गंभीर आहे.  जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्नही बिकट झालेला आहे, तसेच अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. त्यामुळे शेतकरी मेहकर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा, वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांचा पीक विमा काढण्यात यावा, अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन करेल, अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र गाडेकर, कृउबास सभापती माधवराव जाधव, तालुका प्रमुख सुरेश वाळूकर, युवासेना जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव, पं.स. सभापती जया खंडारे, समाधान साबळे, दत्ता पाटील शेळके, खविसं अध्यक्ष मधुकरराव रहाटे, पं.स. उपसभापती राजू घनवट, विनोद बापू देशमुख, जि.प. गटनेते आशिष रहाटे, जि.प. सदस्य राजेंद्र पळसकर, मनीषा चनखोरे, तेजराव जाधव, रविकुमार चुकेवार आदी उपस्थित होते. 

शेळगाव आटोळ परिसरातील पिके करपली!
 गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेळगाव आटोळ व परिसरातील सोयाबीन, मूग, उडीद ही पिके करपली असून, येत्या चार-पाच दिवसांत पाऊस न आल्यास उत्पादनात प्रचंड घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग संकटात सापडला आहे. या संकटातून सोडवणूक करण्यासाठी शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी चिखली तहसीलदारांकडे केली आहे. यावर्षी परिसरात खरिपाच्या पेरणीनंतर दमदार पाऊस झालाच नाही. त्यामुळे ७0 टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. शासन स्तरावरून मदत देण्यात यावी, अशी मागणी बाजार समिती सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गजानन वायाळ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विष्णू कुळसुंदर, बाजार समिती माजी उपाध्यक्ष ओमप्रकाश भुतेकर, डॉ. विकास मिसाळ आदींनी केली आहे. 

Web Title: Due to drought on the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.