१६ प्रकल्पांवर लावणार बाष्पीभवन मापक यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 02:27 AM2017-11-18T02:27:37+5:302017-11-18T02:27:44+5:30
हवामानातील बदल, वाढते उष्णतामान पाहता एक हजार हेक्टरपेक्षा अधिक सिंचन क्षमता असणार्या बुलडाणा जिल्हय़ातील मोठय़ा, मध्यम आणि लघू अध्या एकूण १६ प्रकल्पांवर नाशिक येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (मेरी) मार्गदर्शक तत्त्वानुसार बाष्पीभवन मापक यंत्र बसविण्यात येणार आहेत.
नीलेश जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: हवामानातील बदल, वाढते उष्णतामान पाहता एक हजार हेक्टरपेक्षा अधिक सिंचन क्षमता असणार्या बुलडाणा जिल्हय़ातील मोठय़ा, मध्यम आणि लघू अध्या एकूण १६ प्रकल्पांवर नाशिक येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (मेरी) मार्गदर्शक तत्त्वानुसार बाष्पीभवन मापक यंत्र बसविण्यात येणार आहेत.
अलीकडील काळात जागतिक हवामान बदलामुळे वाढलेलेले उष्णतामान पाहता प्रकल्पातील जलसाठय़ाच्या बाष्पीभवनाचे प्रमाण वाढलेले आहेत. साधारणत: वार्षिक सरासरी ३0 टक्के पाण्याचे बाष्पीभवन होत असते. परिणामी शहरी तथा नागरी भागासाठी पिण्याचे पाणी तथा शेती सिंचनाचे पाणी आरक्षित करताना बाष्पीभवनाचा अंदाज घेऊन करण्यात येते. परिणामी बर्याचदा अंदाज चुकत होते. परिणामस्वरूप हा निर्णय घेण्यात आला आहे. साधारणत: राज्यातील मोठय़ा व मध्यम स्वरूपाच्या प्रकल्पांवर प्रकल्प निर्मितीदरम्यानच हे बाष्पीभवन मापक यंत्र लावण्यात येतात.
मात्र विदर्भामधील काही छोट्या प्रकल्पांवर ते लावण्यात आले नव्हते. त्यामुळे राज्य शासाने गेल्या वर्षी अर्थात २0१६ मध्ये राज्यातील पाचही महामंडळांना लिखित स्वरूपात पत्र पाठवून अनुषंगिक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते. त्याची प्रक्रिया आता वेग घेत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्पांवर आधीपासूनच सुविधा आहेत. राज्य शासनाने त्यानुषंगाने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळालाही पत्र पाठवले होते.
त्यात एकूण १६ प्रकल्प समोर आले आहेत. या प्रकल्पांच्या भिंतीलगत मोकळ्य़ा जागेत जेथे सावली येणार नाही आणि अन्य उपद्रव राहणार नाही, अशा ठिकाणी हे पॅन इव्हॅपुरेशन मीटर बसविण्यात येईल.
या प्रकल्पांचा आहे समावेश
बुलडाणा जिल्हय़ातील मोठय़ा प्रकल्पांपैकी नळगंगा, मध्यम प्रकल्पांपैकी ज्ञानगंगा, कोराडी, पलढग, मस, मन, तोरणा, उतावळी आणि लघू प्रकल्पांपैकी मांडवा, व्याघ्रा नाला, बोरखेडी, ढोरपगाव, मासरूळ, विद्रूपा, करडी, ब्राह्मणवाडा या प्रकल्पांवर ही यंत्रे बसविण्यात येणार आहेत. नळगंगा प्रकल्पासह खडकपूर्णा आणि पेनटाकळी प्रकल्पावर ही यंत्रे पूर्वी बसविण्यात आलेली होती; मात्र नळगंगा प्रकल्पावरील एक यंत्र नादुरुस्त झाले होते. त्यामुळे त्याचा समावेश करण्यात आला आहे. नाशिक येथील मेरी संस्थेने ही यंत्रे बनवली असून प्रती यंत्र ८0 हजार रुपये खर्च त्यास असून १२ लाख ८0 हजार रुपये किमतीची ही यंत्रणे सध्या बुलडाणा पाटबंधारे विभाग, बुलडाणाला प्राप्त झाली आहेत.
आतापर्यंत अंदाजानुसार होत होते मापन
प्रारंभी एकूण जलसाठय़ापैकी जवळपास ३0 टक्के पाण्याचे वर्षभरात बाष्पीभवन होत असल्याचा अंदाज होता. दरम्यान, खामगाव, मलकापूर, मेहकर, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा या पट्टय़ात वाढते तापमान पाहता ३२ टक्के पाण्याचे बाष्पीभवन होत होते. बुलडाणा परिसरात हे प्रमाण २७ टक्क्यांच्या आसपास होते.
११ वर्षांपूर्वी झाला अभ्यास
नाशिक येथील मेरी संस्थेने ११ वर्षांपूर्वी राज्यातील नदी खोरे, प्रकल्पांचा बाष्पीभवनासंदर्भात अभ्यास केला होता. पसरट प्रकल्पांतील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग अधिक असल्याचे त्यावेळी निदर्शनास आले होते. त्यानंतर अनुषंगिक काही निर्णय घेण्यात आले होते.
हा होईल फायदा!
ही यंत्रे बसविल्यानंतर उपरोक्त प्रकल्पांवरून प्रतीदिन किती पाण्याचे बाष्पीभवन होते, याचा अंदाज येऊन महिना, ऋतू आणि वार्षिक बाष्पीभवनाचा अंदाज येईल. त्यामुळे प्रकल्पातील पाणी पिण्यासोबतच सिंचनासाठी किती प्रमाणात आरक्षती करता येईल, याचा अचूक अंदाज पाटबंधारे मंडळाला येईल. त्याचा शेतकर्यांना मोठा फायदा होऊन सिंचन कार्यक्रम व्यापकस्तरावर राबवणे सोपे होईल. बुलडाणा जिल्हय़ातील महत्तम सिंचन क्षमता ३१ टक्के असली तरी प्रत्यक्षात त्याच्या तुलनेत अत्यल्प प्रमाणात सिंचन होते. ही टक्केवारी वाढविण्यास यामुळे मदत होईल.