शेतकर्यांचे पांढरे सोने शेतातच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:44 AM2017-10-31T00:44:51+5:302017-10-31T00:45:05+5:30
बुलडाणा: सोयाबीन निघाल्यानंतर कपाशीची बोंडे फुटल्यामुळे हिरवे शेत पांढरे दिसत आहे. हा कापूस बाजारात विकून बँकेचे काही कर्ज फेडावे, असा विचार शेतकर्यांचा आहे; मात्र कापूस वेचणीसाठी मजूर मिळणे कठीण झाले असून, मागील वर्षी कापूस वेचणीचा दर ५ रुपये किलो असताना यावर्षी ४ रुपयाने दरवाढ करूनही मजूर मिळत नसल्यामुळे शेतकर्यांचे पांढरे सोने शेतातच पडून आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: सोयाबीन निघाल्यानंतर कपाशीची बोंडे फुटल्यामुळे हिरवे शेत पांढरे दिसत आहे. हा कापूस बाजारात विकून बँकेचे काही कर्ज फेडावे, असा विचार शेतकर्यांचा आहे; मात्र कापूस वेचणीसाठी मजूर मिळणे कठीण झाले असून, मागील वर्षी कापूस वेचणीचा दर ५ रुपये किलो असताना यावर्षी ४ रुपयाने दरवाढ करूनही मजूर मिळत नसल्यामुळे शेतकर्यांचे पांढरे सोने शेतातच पडून आहे.
बुलडाणा जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगाम शेतकर्यांकरिता लाभाचा कमी त्रासाचाच अधिक राहिला. प्रारंभी पावसाने मारलेल्या दडीने अनेक कापूस उत्पादकांना दुबार पेरणीचा सामना करावा लागला. यातही उत्पादन निघण्याच्या काळात परतीच्या पावसाने कापूस ओला झाला. घाटाखालील क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात कापूस काळवंडला, या शिवाय दमट वातावरणामुळे बोंडे काळी पडून सरकीला कोंबे फुटली. यामुळे शेतकर्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. यात आता बोंडे फुटून कापूस बाहेर आल्याने वेचण्याची तयारी होऊ लागली असताना शेतकर्यांना मजुरीच्या दराचा फटका बसत आहे. साधारणत: दिवाळीपासूनच कापसाचा हंगाम सुरू होतो. यावर्षी याला थोडा विलंब होईल असे वाटत होते; पण ज्यांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली त्यांच्या पर्हाटीला कापूस आला आहे. या कापसामुळे शेत पांढरी दिसू लागली आहे; मात्र हा कापूस वेचण्याकरिता मजूरच मिळत नसल्याने शेतकर्यांची चांगलीच गोची झाली आहे. काही भागात अद्यापही सोयाबीनची काढणी सुरू आहे. या काढीची मजुरी शेतकर्यांकडून अधिक मिळत असल्याने कापूस वेचणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी शेतातील कापूस तसाच असल्याचे दिसून आले आहे.
मजुरांना शेतात ने-आण करण्याचाही खर्च
मागील वर्षीपेक्षा यावर्षी शेतमजुरांच्या मजुरीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. मजुरांची वाढीव मजुरी देण्याबाबत शेतकरी चिंचेत असताना यात आणखी भर म्हणजे मजुरांना शेतात ने-आण करण्याचा खर्चही करावा लागत आहे. परिणामी शेतकर्यांच्या खर्चात आणखीच वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. अशा स्थितीमुळे काही शेतकर्यांच्या शेतात अजूनही सोयाबीन काढण्यासाठी, कापूस वेचणीसाठी मजूर मिळाले नसल्याचे वास्तव आहे. जमिनीच्या मशागतीचा खर्च, बियाणे, खते, आंतरमशागत, पीक काढणे हा सर्व खर्च वजा जाता नफा मिळतो की तोटा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कापूस वेचणीत किलोमागे चार रुपयांची वाढ
जिल्ह्यात गतवर्षी ३ ते ५ रुपये किलो वेचणीचा दर आता ६ ते ८ रुपयांवर पोहोचला आहे. यामुळे एक क्विंटल कापूस वेचण्याकरीता ६00 ते ८00 रुपयाचा खर्च पडत आहे. हा वाढीव भाव देणार्या शेतकर्यांकडे मजुरांचा ओढा वाढत आहे. ज्यांच्याकडे सोय आहे, त्यांना हा दर देणे शक्य आहे; पण ज्यांच्याकडे सोय नाही त्यांना हा भाव परवडणारा नाही. मजुरांना योग्य मजुरी दिली नाही तर कापूस तसाच शेतात राहण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या वाढत असलेली मजुरी आणि कापसाला मिळत असलेला अत्यल्प दर यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यामुळे कापसाचा वेचा कसा करावा, असा प्रश्न त्यांना पडला आहे.