खामगाव नगर पालिका : आधी करोडपती, आता लखपतीचेही वांदे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 09:54 AM2017-11-29T09:54:07+5:302017-11-29T09:54:51+5:30
नोटाबंदीच्या काळात कर वसुलीत अवघ्या पाच दिवसाच्या कालावधीत ‘करोडपती’ झालेल्या खामगाव नगर पालिकेचे यावर्षी तब्बल सात महिन्यांच्या कालावधीत ‘लखपती’ होण्याचेही वांदे आहेत.
अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: नोटाबंदीच्या काळात कर वसुलीत अवघ्या पाच दिवसाच्या कालावधीत ‘करोडपती’ झालेल्या खामगाव नगर पालिकेचे यावर्षी तब्बल सात महिन्यांच्या कालावधीत ‘लखपती’ होण्याचेही वांदे आहेत. त्यामुळे कर वसुलीचे उद्दीष्ट गाठताना पालिकेची चांगलीच दमछाक होत असल्याचे दिसून येते.
सन २०१७-१८ मध्ये थकीत आणि चालू एकत्रित मालमत्ताकराचे ८ कोटी ५५ लक्ष ७१ हजार २३४ रुपयांचे उद्दीष्ठ ठरविण्यात आले. या उद्दीष्टाचा पाठलाग करताना करवसुलीसाठी पालिका प्रशासनाची चांगलीच दमछाक होत असून, एप्रिल २०१७ ते आॅक्टोबर २०१७ या सात महिन्यांच्या कालावधीत पालिकेची केवळ ७८ लक्ष ८८ हजार ७९८ रुपयांची वसुली केली असून, आतापर्यंत करण्यात आलेल्या रक्कमेची टक्केवारी केवळ ९.२२ टक्के एवढीच आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांमध्ये एकत्रित मालकत्ता कर वसुलीसाठी पालिका प्रशासनाचा कडक उपाययोजना करावी लागणार असल्याचे संकेत आहे. दरम्यान, गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्याच्या वसुलीच्या तुलनेत यावर्षीची कर वसुली असमाधानकारक असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येते. एकत्रित मालमत्ताकरामध्ये शिक्षणकर, वृक्षकर रोजगार हमी उपकर समावेश आहे. तर कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टीही थकीत असल्याची आकडेवारी समोर आली आहे.