तळणी शिवारात आढळले बिबट्याचे पिल्लू
By admin | Published: December 9, 2015 02:45 AM2015-12-09T02:45:03+5:302015-12-09T02:45:03+5:30
मोताळा तालुक्यातील घटना.
मोताळा : तालुक्यातील शेलापूर-तळणी शिवारातील एका शेतकर्याच्या शेतात बिबट्याचे पिल्लू ८ डिसेंबर रोजी सकाळी १0 वाजेच्या सुमारास आढळले. शेतात कापूस वेचत असताना पिल्लाच्या आरडाओरडीमुळे काही महिलांच्या निदर्शनास हा प्रकार आला. शेलापूर-तळणी शिवारात शेलापूर येथील संजय होले यांचे शेत आहे. मंगळवारी १0 ते १२ महिला मजूर त्यांच्या शेतात कापूस वेचत असताना अचानक बिबट्याच्या पिल्लाचा ओरडण्याचा आवाज आला. या महिलांनी लगेच शेतमालकाच्या मुलाला ही बाब सांगितली. मुलाने कुतूहलाने आवाजाच्या दिशने जाऊन पाहिले असता, मांजरीचे पिल्लू असल्याचे त्याने आईला सांगितले; मात्र मांजरीचे एकच पिल्लू शेतात कसे राहील, ही शंका आल्याने या महिलेने परिसरातील शेतकर्यांना बोलावून खातरजमा केली असता, ते पिल्लू बिबट्याचे असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेची माहिती शेतकर्यांनी तत्काळ वन विभागाच्या अधिकार्यांना सांगितली. ही माहिती मिळताच दुपारी वन परिक्षेत्र अधिकारी पी. टी. कसले, वनपाल संजय राठोड, वनरक्षक नागरेसह देशमुख, तवलारकर, मुंजाळकर, लवंगे, सोनुने व गणेश जाधव यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती गाव परिसरात पडल्यामुळे शेतात बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. वन विभागाच्या कर्मचार्यांनी मादी बिबटपासून प्राणहानी होऊ नये, यासाठी परिसरातील गर्दी हटवून त्या ठिकाणी दुपारी दोन वाजेपासून गस्त लावलेली आहे.