Loksabha election 2019 : युती, ‘वंचित’च्या उमेदवाराची निवडणूक खर्चात आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 03:29 PM2019-05-11T15:29:10+5:302019-05-11T15:32:15+5:30
उमेदवारांच्या खर्चमोजणीची सध्या लगबग सुरू असून १२ ही उमेदवारांचा एकूण मिळून ९३ लाख ७३ हजार ७१६ रुपयांचा खर्च झाल्याची माहिती समोर येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: १७ व्या लोकसभा निवडणुकीसाठी १८ एप्रिल रोजी बुलडाणा लोकसभा मतदार संघात मतदान झाले. दरम्यान, या निवडणुकीत रिंगणात उभे असलेल्या उमेदवारांच्या खर्चमोजणीची सध्या लगबग सुरू असून १२ ही उमेदवारांचा एकूण मिळून ९३ लाख ७३ हजार ७१६ रुपयांचा खर्च झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, यामध्ये निवडणुकीच्या रिंगणात प्रामुख्याने चर्चेत राहलेले युती, आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी तगडा खर्च केला असून १२ उमेदवारांच्या खर्चाची तुलना करता या तिघांचाच खर्च हा ८८ टक्क्यांच्या घरात जात असून त्याची एकत्रीत बेरीज ही ८२ लाख ५५ हजार ४२७ ऐवढी आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये रिंगणातील उमेदवारांना प्रचारासाठी १७ दिवस मिळाले होते. या १७ दिवसामध्े मतदारांच्या मनात आपली प्रतिमा चांगली निर्माण व्हावी, आपण काय करणार आहोत, भविष्यातील योजना काय, जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने काय करणार असे मुद्दे घेऊन निवडणूक रिंगणातील हे १२ उमेदवार प्रचारात व्यस्थ होते. प्रचारात बहुतांश या तीनही उमेदवारांनी आघाडी घेतली होती. आता २३ मे रोजी प्रत्यक्ष मतमोजणी होणार आहे. त्यामध्ये विजयी तथा पराभूत उमेदवारांचा निकाल स्पष्ट होईल. मात्र निवडणुकीच्या खर्चाचा विचार करता ७० लाख खर्च मर्यादा रिंगणातील उमेदवारांसाठी निर्धारित करण्यात आली होती. त्यामध्ये युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांचा आतापर्यंत २८ लाख ४६ ९७९ रुपयांचा प्रचारावर खर्च झाला आहे. त्या खालोखाल वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बळीराम सिरस्कार यांचा २७ लाख १९ हजार ११ रुपयांचा खर्च झालेला आहे. आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा २६ लाख ८९ हजार ४३७ रुपयांचा खर्च झालेला आहे
या तीन उमेदवारांचा खर्च वगळता उर्वरीत नऊ उमेदवारांचा एकंदरीत खर्च हा ११ लाख १८ हजार २८९ रुपये झाला आहे.
यामध्ये अब्दुल हभीज अब्दुल अजीज यांचा चार लाख २४ हजार ३५५ रुपयांचा खर्च झाला आहे. तर प्रताप पंधरीनाथ पाटील यांचा दोन लाख ४६ हजार ८५५ रुपयांचा खर्च असून त्या खालोखाल दिनकर तुकाराम संबारे यांचा एक लाख ७६ हजार ८८३ रुपयांचा खर्च झालेला आहे.
मतमोजणीनंतर अंतिम तपासणी
लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणुक रिंगणातील उमेदवारांनी केलेल्या खर्चाची अंतिम मोजणी तथा तपासणी ही २३ मे रोजी प्रत्यक्ष मतमोजणी झाल्यानंतर होणार आहे. त्यासाठी बुलडाणा लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक खर्च निरीक्षक हे पुन्हा जिल्ह्यात येणार आहेत. अंतिम तपासणी झाल्यानंतर ते परत जाणार आहेत.
तगड्या उमेदवारांचा मेळ जमेना
निवडणूक रिंगणातील पारंपारिक प्रतिस्पर्धी युतीचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव आणि आघाडीचे उमेदवार तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा अंतिम खर्च अद्याप सादर झालेला नाही. त्यामुळे निवडणूक प्रचारादरम्यान झालेल्या खर्चाचा ताळमेळ बसविण्यासाठी उमेदवारांचे प्रतिनिधी सध्या धावपळ करत आहेत. १५ एप्रिल २०१९ पर्यंतचा या उमेदवारांचा खर्च हा अनुक्रमे २८ लाख ४६ हजार ९७९ रुपये आणि २६ लाख ८९ हजार ४३७ रुपये झाला आहे. येत्या काही दिवसात तो अंतिम होणार असून त्यात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यताही निवडणूक विभागातील सुत्रांनी दिली आहे.
खर्चाचेही द्यावे लागणार प्रतिज्ञा पत्र
निवडणूक रिंगणातील सर्वच उमेदवारांना निवडणुकीदरम्यान झालेल्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष खर्चाचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. निवडणूक झाल्यानंतर किमान महिनाभराच्या आत उमेदवारांना त्यांचा खर्च निवडणूक आयोगास सादर करणे बंधनकारक आहे. या कालावधीत हा खर्च सादर न केल्यास संबंधितांवर कारवाईचा बडगाही निवडणूक आयोग उगारू शकतो. त्यात प्रसंगी विजयी उमेदवाराचे सदस्यत्वही रद्द होऊ शकते. त्यामुळे अचूक खर्च निवडणूक आयोगाकडे सादर करण्याचा निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे प्रतिनिधी सध्या प्रयत्न करीत आहेत.