नऊ रोहींचा विहीरीत पडून मृत्यू; दहा दिवसांपासून मृतदेह विहिरीतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 04:27 PM2019-06-02T16:27:01+5:302019-06-02T16:28:44+5:30
सोनोशी (जि. बुलडाणा): देऊळगाव राजा वनपरीक्षेत्रातंर्गत येत असलेल्या सिंदखेड राजा वतुर्ळातील सोनोशी बीटमध्ये तांदुळवाडी शिवारात पाण्यासाठी भटकंती करणाºया नऊ रोहींचा एकाच विहीरीत पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
महेंद्र मोरे
सोनोशी (जि. बुलडाणा): देऊळगाव राजा वनपरीक्षेत्रातंर्गत येत असलेल्या सिंदखेड राजा वतुर्ळातील सोनोशी बीटमध्ये तांदुळवाडी शिवारात पाण्यासाठी भटकंती करणाºया नऊ रोहींचा एकाच विहीरीत पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, आठ ते दहा दिवसांपासून विहिरीत पडून असलेले रोहींचे मृतदेह कुजल्यानंतरही वनविभागाने ते बाहेर काढण्याची तसदी घेतली नाही. ३१ मे रोजी वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी येथे येऊन पंचनामा करण्याचे केवळ सोपस्कार पार पाडले आहेत.
सोनोशी बिट अंतर्गत तांदुळवाडी शिवारामध्ये सुखदेव उत्तम डिघोळे यांच्या गट क्रमांक ५९ मधील शेतातील विहीरीत हे नऊ रोही पडल्याचे समोर आले आहे. नऊ ते दहा दिवसापूर्वी हे प्राणी विहीरीत पडले असावेत. त्यांनंतर पाच ते सात दिवसांनी वनविभागाला याची माहिती मिळाली. तेव्हा कुठे वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले पण त्यांनी पंचनाम्याशिवाय दुसरा कुठलाही सोपस्कार केला नाही. तांदुळवाडी शिवारातील जमिनीला समांतर असलेल्या या जंगला नजीकच्या विहीरीत हे नऊ रोही पडले होते. आता हे रोही कुजलेल्या स्थिती आहेत. वनविभागाने ३१ मे रोजी येथे पोहोचत पंचनामा केला. मात्र या वन्यप्राण्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात वनविभाग अयशस्वी झाला आहे. पंचनामा केल्यानंतर वनविभागाचा कोणताही अधिकारी इकडे फिरकला नसल्याचे सांगण्यात येत आहे. विहीरीत पडून नऊ रोहींचा मृत्यू झाल्यानंतरही वनविभाग मात्र झोपलेल्या अवस्थेत होता. वेळीच याची माहिती वनविभागाने घेतली असती तर हे वन्यजीव वाचू शकले असते. मात्र त्यादृष्टीने प्रयत्न न करता केवळ पंचनाम्याचा सोपस्कार आटोपण्याचे काम वनविभाग करत आहे. त्यामुळे वनविभागाचे ठिसाळ नियोजन अधोरेखीत होत आहे. प्रादेशिक विभागातंर्गतच्या या जंगलामध्ये खरेच वनविभागाचे कर्मचारी गस्त घालत असतील का? हा संशोधनाचा प्रश्न आहे. बरे गस्त घालत असतील तर या रोहींची माहिती वेळेत वनविभागाला का मिळाली नाही, यावरही मंथन होण्याची गरज आहे.
पिंपरखेड जंगलात एकमेव पानवठा
एकीकडे दुष्काळी स्थितीचा जिल्हा सामना करत असताना जंगलामध्येहे पाण्यासाठी वन्यप्राण्यांची भटकंती होत आहे. जंगलातच पाणी उपलब्ध नसल्याने नागरी भागाकडे वन्यप्राणी येऊ लागले आहेत. सोनोशीसह लगतच्या परिसरातील सहा जंगलांमिळून केवळ पिंपरखेड येथील जंगलातच एकमेव पाणवठा आहे. इतरत्र पानवठा नाही. त्यामुळे वन्यप्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत आहे. जंगलातील पानवठ्यासाठी वनविभागाकडून आर्थिक तरतूद केली जाते. मात्र प्रत्यक्षा किती पानवठे प्रादेशिक वनविभागाने या भागात केले आणि त्यात नियमितपणे पाणी सोडले हा कळीचा मुद्दा आहे.
पाच दिवसानंतर माहिती मिळाली- दुबे
विहीरीत पडून नऊ रोही मृत्यूमुखी पडल्याची माहिती वनविभागार्पंत तब्बल पाच दिवस उशिराने पोहोचली. त्याठिकाणी जावून आम्ही पंचनामा केला. सोबतच हुक टाकून रोहींचे मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ते कुजलेल्या अवस्थेत आले आहेत. त्यामुळे त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावता आली नाही. आता विहीरीतील पाणी काढून नऊ रोहींच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणार असल्याचे सोनोशी बिटचा अलिकडील काळात प्रभार सांभाळणारे तालुका वनपरीक्षेत्र अधिकारी एस. एच. दुबे यांनी लोकमत शी बोलताना सांगितले.