अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा प्रस्ताव विवेकानंद आश्रमाकडून मागे!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2017 09:26 PM2017-09-14T21:26:32+5:302017-09-14T21:41:21+5:30
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कायम संस्थानिकांचेच बटीक असावे, असे ज्या अदृश्यशक्तींना वाटते, त्या शक्तिंनीच विवेकानंद आश्रम व पूज्यनीय शुकदास महाराज यांच्या बदनामीची मोहीम उघडली.
हिवरा आश्रम (बुलडाणा), दि. 14 - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कायम संस्थानिकांचेच बटीक असावे, असे ज्या अदृश्यशक्तींना वाटते, त्या शक्तिंनीच विवेकानंद आश्रम व पूज्यनीय शुकदास महाराज यांच्या बदनामीची मोहीम उघडली. त्यामुळे अनेकांची नाराजी झाली आहे. या बदनामीमुळे ९१ वे साहित्य संमेलन विवेकानंद आश्रम येथे घेण्यासाठी अखिल भारतीय साहित्य महामंडळाकडे पाठविलेला प्रस्ताव मागे घेत असल्याचे विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष रतनलाल मालपाणी यांनी गुरूवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत आर. बी. मालपाणी म्हणाले, की मराठी साहित्य संमेलनाच्या १५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामीण भागात संमेलन होत आहे; याचा
मनस्वी आनंद महाराष्ट्रातील सर्वसामान्य मराठी माणसाला झालेला आहे. खेड्यापाड्यातील, वाडी-वस्त्यांतील मुलांच्या हातात पाटी-पुस्तक देण्याचे कार्य करणारे, दीन-दु:खीतांना हृदयाशी धरुन त्यांच्यावर उपचार करणारे, जातीपातीच्या भिंतीपाडून नवचैतन्याचे वारे पिऊन संकटाशी चार हात करण्याचे बळ देणारे विवेकानंद आश्रम हे समाजाचे ऊर्जा केंद्र आहे. आश्रम ‘मानवसेवा हीच ईश्वरसेवा’ या उद्दिष्टांशी सदैव एकनिष्ठ आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपल्याला हे सर्व पाहायला मिळणार होते; परंतु हे संमेलन कायम संस्थानिकांचेच बटिक असावे, अशी इच्छा असलेला एक वर्ग आहे; त्यांना विवेकानंदांचा बुद्धिप्रामाण्यवाद, धर्मनिष्ठा आणि आश्रमाची त्याग, सेवा, समर्पणाची संस्कृती संमेलनाच्या आयोजन स्थळात अडचण ठरत आहे. त्या शक्तींना अधिक खटाटोप करण्यासाठी संस्थेवर खोटेनाटे घाणेरडे आरोप करावे लागत असतील व त्यातून आश्रमाच्या कार्याशी जोडलेल्या लाखो संवेदनशील स्त्री-पुरुषांची मने दुखवली जात असतील, व त्यांचा संमेलनातील सहभाग केवळ शारीरिक राहणार असेल तर संमेलनाचा उद्देश सफल होऊ शकत नाही. भाषा, साहित्य, संस्कृतीचा प्रचार व प्रसार हाच साहित्य संमेलनाचा पवित्र हेतू आहे, हा हेतूच सफल होऊ शकत नसेल तर आणखी ताणून धरण्यात काय हाशील आहे? त्यामुळे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा प्रस्ताव आम्ही मागे घेत आहोत, असेही मालपाणी यांनी जाहीर केले.
दरवर्षी विवेकानंद विचार साहित्य संमेलन घेणार
अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या यजमानपदाचा त्याग केल्यानंतर विवेक विचारांचा प्रचार करणारे वादातीत असलेले विवेकानंद विचार साहित्य संमेलन
स्वतंत्रपणे विवेकानंद जयंतीनिमित्त आम्ही आयोजित करणारच आहोत, अशी महत्वपूर्ण घोषणाही आर. बी. मालपाणी यांनी यावेळी केली. गेल्या काही दिवसांपासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने संमेलनस्थळ निवडीच्या आडून विवेकानंद आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष पूज्यनीय शुकदास महाराज
यांच्यावर चारित्र्यहनन करणारे आरोप चालविले होते. तसेच, संमेलन इतरत्र घ्यावे, अशी मागणी केली होती. या मागणीवरून साहित्यिकांतही दोन गट निर्माण झाले होते. श्याम मानव व त्यांच्या सहका-यांच्या आरोपांना विवेकानंद आश्रमाच्यावतीने सहसचिव तथा मुख्य प्रवक्ते संतोष गोरे, सहप्रवक्ते पुरुषोत्तम सांगळे, आत्मानंद थोरहाते यांनीही सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. श्याम मानव यांनी पूज्यनीय शुकदास महाराज यांच्याविषयी केलेल्या बदनामीकारक वक्तव्याबद्दल बुलडाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेधही करण्यात येत आहे. मानव यांच्यावर कारवाईसाठी प्रशासकीय यंत्रणेला निवेदनेही देण्यात आली आहेत.