रा. स्व. संघाने मराठा सेवा संघावर संघर्ष लादला - पुरुषोत्तम खेडेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 03:25 AM2018-01-13T03:25:15+5:302018-01-13T03:30:43+5:30
सिंदखेडराजा: संपूर्ण राज्यात घडविण्यात आलेला कोरेगाव भीमा संघर्ष हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मराठा सेवा संघावर लादल्याचा घणाघात मराठा सेवा संघाचे संस्था पक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी शुक्रवारी येथे जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा: संपूर्ण राज्यात घडविण्यात आलेला कोरेगाव भीमा संघर्ष हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मराठा सेवा संघावर लादल्याचा घणाघात मराठा सेवा संघाचे संस्था पक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी शुक्रवारी येथे जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात केला.
मराठा सेवा संघाच्यावतीने आयोजित ४२0 व्या राष्ट्रमाता माँ जिजाऊ जन्मोत्सवाच्या या कार्यक्रमास सातार्याचे छत्रपती खा. उदयनराजे भोसले, कोल्हापूरचे छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले, तंजावरचे छत्रपती बाबाजीराजे भोसले, खा. प्रतापराव जाधव, आ. शशिकांत खेडेकर, माजी खासदार नाना पटोले, छत्रपती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष स्वप्निल खेडेकर, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, महासचिव मधुकर मेहकरे, संभाजी ब्रिगेडचे आखरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तु पकर, माजी आमदार रेखाताई खेडेकर, गंगाधर बनबरे, कामाजी पवार, हरियाणाचे मांगीराम चोपडे यांच्यासह जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी प्रामुख्याने विचारपीठावर उ पस्थित होत्या.
अँड. पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले, की ‘आरएसएस’ने कोरेगाव-भीमा संघर्ष ‘एमएसएस’वर लादला आहे. त्यामुळे आपले मूळ काम हे आता वाढले आहे. सर्व समाजात बंधुता निर्माण करण्यासाठी मराठा सेवा संघाची जबाबदारी त्यामुळे वाढली आहे. त्यामुळे सर्व संघटनांनी आपला धर्म बाजूला ठेवून विकासाच्या मुद्यावर बोलावे. कोणाचाही अपमान होईल, असे बोलू नये, असेही ते म्हणाले. श्री छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांसाठी आदर्श असून, त्यांच्या संदर्भात कोणीही अनुचित बोलू शकत नाही. बहुजन समाजाध्ये वाद नाही. राजकीय पक्षांमध्ये वाद आहेत. त्यामुळे आपला शत्रू कोण आहे, याची जाणीव आता युवा वर्गाला होण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, १९ फेब्रुवारीला देशमुख, पाटील असा आपल्या पदव्या बाजूला ठेवून मूळ आडनाव पुन्हा धारण करण्याचे आवाहन त्यांनी केले. एम फॅक्टर एकत्र यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमादरम्यान संभाजी ब्रिगेडचे मनोज आखरे यांनी, संभाजी ब्रिगेड एक राजकीय पर्याय उभा करू शकते. आर्थिक दहशतवाद संपवून बंधुभावाने काम कसे करता येईल, याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे, असे ते म्हणाले. यावेळी जतीन पटेल, मांगीराम चोपडे यांची समयोचित भाषणे झाली. माजी खासदार नाना पटोले यांचेही भाषण झाले.
उद्योजकांचे ठसे घेतले होते का? - रविकांत तुपकर
शेतकर्यांची कर्जमाफी करताना त्यांच्या हाताचे ठसे राज्य शासनाने घेतले; पण अंबानी, अदानींसारख्या बड्या उद्योजगांचे कर्ज माफ करताना त्यांच्या हाताचे ठसे घतले होते का, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकर यांनी केला.
मल्ल्या तर चुना लावून निघून गेला. त्याचे काय केले, असा प्रस्न उपस्थित करत राज्य शासनाच्या दुटप्पी भूमिकेवर त्यांनी टीका केली. समाजासमोर शेतकरी आत्महत्या हा मोठा प्रश्न असला तरी शेतकर्यांच्या घरातील मुलींच्याही आता आत्महत्या होत आहे. ही एक गंभीर बाब असून, आतापर्यंत १६ ते १८ वयोगटातील मुलींनी आत्महत्या केल्याचे त्यांनी सांगितले.
जिजाऊ सृष्टीवर सामाजिक विचारांचे मंथन - प्रतापराव जाधव
जिजाऊ सृष्टीवर सामाजिक विचारांचे मंथन होते. सत्तेवर बसलेले आपल्यामुळेच बसलेले आहेत. त्यामुळे आगामी काळात समाज संघटित करून जो चांगले काम करेल, असा विश्वास असेल त्याच्या बाजूने कौल द्या, असे आवाहन खा. प्रतापराव जाधव यांनी केले.
शिवरायांचे विचारच देशाला तारु शकतात!
सध्या सत्तेत कोण आहे किंवा कोण नाही, याला आपण महत्त्व देत नाही. राजकारणी लोक महत्त्वाचे विषय बाजूला ठेवून भलत्याच विषयांचा बाऊ करतात. असेच राहिले तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. व्यक्ती स्वार्थ आणि द्वेषापोटी तरुणाईसमोर अवडंबर माजविले जात आहे. जाती, धर्म भेद संपुष्टात आणण्यासाठी माँ जिजाऊ आणि शिवरायांचे विचारच देशाला तारू शकतात, असे त्यांनी सांगितले.
- छत्रपती उदयनराजे भोसले
तंजावरमध्ये या, संस्कृती जोपासा!
तामिळनाडूतील तंजावरमध्ये या. तेथे तमिळ आणि मोडी लिपीतील लाखो दस्तावेजांमध्ये मराठा समाजाचा दैदिप्यमान इतिहास सामावलेला आहे. तो आपला सर्वांचा आहे. त्याचे जतन करून संस्कृती जोपासण्याची आपल्याला गरज आहे. आपल्या सर्वांचा हा इतिहास तिथे जिवंत ठेवलेला आहे, असे छत्रपती बाबाजीराजे भोसले म्हणाले.
- छत्रपती बाबाजीराजे भोसले
.तो दिवस ‘ब्लॅक डे’ होता
मध्यंतरी घडलेली घटना पाहता तो दिवस महाराष्ट्रासाठी ‘ब्लॅक डे’ होता. भविष्यात पुन्हा असा प्रकार होऊ नये. महाराष्ट्राला गालबोट लागू नये, अशी भावना छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी विचारपीठावरून बोलताना व्यक्त केली. महाराष्ट्रात सध्या काय चाललेय? शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती, बहुजन समाजाला सोबत घेऊन राज्य केले. शाहू महाराजांनी ५0 टक्के आरक्षण दिले. सिंदखेडराजा ही बहुजन समाजाला विचार देण्याची जागा आहे. जिजाऊंचा आदर करायचा असेल तर शिवाजी महाराज समजून घेणे आवश्यक आहे. ते असामान्य कसे झाले, याचा अभ्यास झाला पाहिजे, असे ते म्हणाले.
- छत्रपती संभाजीराजे भोसले
रायगड प्राधिकरणासाठी ६00 कोटी
रायगड प्राधिकरणासाठी ६00 कोटी रुपये मंजूर झाले असून, येत्या २0 ते २५ दिवसात प्रत्यक्ष त्याचे काम सुरू होईल. या निधीतून रायगडचे संवर्धन होण्यासोबतच परिसराच्या विकासालाही प्राधान्य मिळणार आहे. रायगड, राजगड, पन्हाळा, मराठवाड्यातील, खान्देशातील एक अशा प्रमाणे एक-एक किल्ला घेऊन त्याचे संवर्धन होणे क्रमप्राप्त आहे. किल्ले संवर्धनाच्या योजनेत जिजाऊ सृष्टीचाही समावेश करण्याचा आपण प्रयत्न करू, असे प्रतिपादन यावेळी बोलताना छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले.
पुरस्कार प्रदान
उद्योजक संजय वायाळ यांना मराठा उद्योजक विश्वभूषण पुरस्कार, विजय तनपुरे यांना मराठा विश्व शिवशाहीर, तर अँड. मिलिंद पवार यांना मराठा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिजाऊ पुरस्कार लेफ्टनंट स्वाती महाडिक यांना जाहीर झाला होता. तो त्यांच्या आई रंजना आणि वडील बबन शेंडगे यांनी स्वीकारला.