शेगाव : ‘श्रीं’चा १४0 वा प्रकट दिन : ७७१ दिंड्या शेगावात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 01:22 AM2018-02-07T01:22:20+5:302018-02-07T01:44:32+5:30
शेगाव : श्री संत गजानन महाराज संस्थानच्यावतीने ‘श्रीं’चा १४0 वा प्रकट दिनोत्सव मिती माघ वद्य ७ फेब्रुवारी रोजी लाखो भाविकांच्या उपस्थितीत भक्तीभाव व उत्साही वातावरणात साजरा होत आहे.
गजानन कलोरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : श्री संत गजानन महाराज संस्थानच्यावतीने ‘श्रीं’चा १४0 वा प्रकट दिनोत्सव मिती माघ वद्य ७ फेब्रुवारी रोजी लाखो भाविकांच्या उपस्थितीत भक्तीभाव व उत्साही वातावरणात साजरा होत आहे.
या प्रकट दिनानिमित्त एक फेब्रुवारीपासूनच शेगावात उत्सवाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळपर्यंत प्रकट दिनाच्या पूर्वसंध्येला तब्बल ७७१ दिंड्या शेगावात दाखल झाल्या आहेत. भाविकांचीही मोठी गर्दी सध्या विदर्भपंढरीत होत आहे.
प्रकट दिनानिमित्त संस्थानच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये काकड आरती, भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन असे दैनिक कार्यक्रम सध्या होत आहेत. दरम्यान, ७ फेब्रुवारीला हरिभक्त परायण श्रीरामबुवा ठाकूर (परभणी) यांचे सकाळी १0 ते दुपारी १२ या कालावधीत ‘शेगावी श्रींच्या प्रागट्या’ निमित्त कीर्तन होईल. त्यानंतर सकाळी १0 वाजता यज्ञाची पूर्णाहूती होईल. दुपारी दोन वाजता श्रींच्या पालखीची रथ, मेणा, गज, अश्वासह नगर परिक्रमा निघेल. गुरूवारी हरिभक्त परायण प्रमोदबुवा राहाणे यांचे सकाळी ७ ते ८ काल्याचे कीर्तन होईल.
दरम्यान, मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता, मंदिराकडे जाणारा रस्ता एकेरी करण्यात आला आला आहे. त्यात दर्शनबारी व श्री मुख दर्शनबारी, महाप्रसाद, श्रींचा पारायण मंडप, श्रींची गादी, पलंग तसेच औदुंबर दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. श्रींच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, मदिंर परिसर केळीच्या खांबांनी सजविण्यात आला आहे.
भक्तांच्या सोयीसाठी संस्थानच्यावतीने सर्वतोपरी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सेवाधारी वर्ग आपली सेवा पूर्ण करीत आहे. या उत्सवादरम्यान मंगळवारी सायंकाळपर्र्यंत ७७१ दिंड्यांचे शेगावात आगमन झाले होते. हा आकडा वाढून एक हजारांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. यामध्ये सहभागी होणार्या नवीन दिंड्यांना नियमांची पूर्तता केल्यावर १0 टाळ, वीणा, मृदंग, हातोडी, सहा पताका, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत ग्रंथ, तुकाराम गाथा असे संत साहित्य संस्थानच्यावतीने वाटप केल्या जात आहे. त्याचबरोबर नियमित येणार्या दिंड्यांना साहित्य दुरुस्तीकरिता अंशदान दिल्या जाते.
या सर्व दिंडीतील सहभागी वारकर्यांसाठी श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने मोफत दवाखाना, महाप्रसाद व ज्या भजनी दिंड्या आपल्या सोयीनुसार राहण्यासाठी राहोटी करतात अशांकरिता व्यवस्थित ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सध्या दिंड्या ७७१ पर्यंत शेगावात दाखल झाल्या. इतर भजनी दिंड्या आपल्या सोयीनुसार श्रींच्या मंदिरात श्रींच्या समाधीचे व कळस दर्शन करून आपल्या नित्यमार्गाने जात आहे. सायंकाळी एकूण ७७१ दिंड्या आल्या होत्या. त्यापैकी ६५ दिंड्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी नवीन १३३ दिंड्या आल्या असून, जुन्या ५७३ दिंड्या आहेत. पैकी ४६0 दिंड्यांना अंशदान करण्यात आले आहे.
अमेरिकेतही श्रींच्या प्रकट दिनाची जय्यत तयारी
अमेरिकेतील श्री गजानन महाराज अमेरिका भक्त परिवार गजानन महाराजांचा प्रकट दिन ७ फेब्रुवारीला विविध ठिकाणी साजरा करीत आहे. न्यू जर्सी, शिकागो, डल्लास, फोनिक्स, सिएटल, लॉस एंजेलिस आणि लंडन (इंग्लंड) आदी ठिकाणी उत्सव साजरा होत आहे. येथील विविध राज्यातील भक्त परिवार प्रकट दिन साजरा करण्यासाठी खूप आतूर झालेले असून, प्रकट उत्सवाची जोरदार तयारी करीत आहेत. उत्सवाची तयारी दोन महिन्यांपासून चालू होती. उत्सवात सामूहिक पारायण, श्रींचा अभिषेक, पादुका पूजन आणि इतर अनेक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. भक्तांमध्ये जागृकता निर्माण करण्यासाठी विविध माध्यमांचा उपयोग करण्यात येत आहे, जसे वेबसाईटवर जाहिरात, अमेरिका रेडिओवर जाहिरात, वर्तमानपत्रात जाहिरात, पत्रके आणि भित्ती पत्रकाद्वारे जाहिरात करण्यात येत आहे. सध्या तेथे चार ठिकाणी ‘श्रीं’ चे मंदिरं आहेत. जगातील सर्व देशांतील भक्तांशी जोडलेला आहे. जे आपल्या मायभूमीपासून दूर आहेत. जसे अमेरिका, इंग्लंड, युरोप, दक्षिण आफ्रिका, मध्यपूर्व देश, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया इत्यादी. या माध्यमातून हा परिवार आपल्या ‘श्रीं’ च्या शिकवणीचा वारसा नवीन पिढीला देत आहेत.
जादा बसगाड्यांची सुविधा
श्री गजानन महाराज प्रकट दिन यात्रा महोत्सवासाठी राज्य परिवहन महामंडळानेही जादा बसगाड्यांची व्यवस्था केली आहे. बुलडाणा आगाराने पाच, चिखली आगार सात, खामगाव ७, मेहकर ८, मलकापूर ३, जळगाव ३, शेगाव १0 अशा एकूण ४३ बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
विदर्भ पंढरीमध्ये प्रकट दिनानिमित्त भाविकांची झालेली गर्दी पाहता पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पार्किंग व्यवस्थाही शहरात ठिकठिकाणी केली आहे. दिंड्यांच्या आगमनामुळे प्रकट दिनाच्या पूर्वसंध्येला विदर्भपंढरीत भक्तीमय वातावरण झाले आहे.