शिलाई मशीन,सायकल लाभार्थींची ससेहोलपट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 01:00 AM2017-11-14T01:00:42+5:302017-11-14T01:03:46+5:30
यादीतील तब्बल ९६ महिला लाभार्थी व ८ विद्यार्थिनींना सदरचे साहित्य हे चिखली येथून वितरित न होता लोणार, मेहकर, सिं.राजा व दे.राजा येथील गोडाउनमधून पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना हे साहित्य मिळविण्यासाठी करावा लागणार्या खर्चाच्या तुलनेत थेट बाजारातून ते स्वखर्चाने विकत घेणे परवडणार असल्याने, लाभार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सुधीर चेके पाटील।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : गरजू महिलांसाठी मोफत शिलाई मशीन आणि गरीब घरातील विद्यार्थिनींसाठी मोफत सायकल वाटपाची योजना शासनाने सुरू केली आहे. या अंतर्गत तालुक्यातील शिलाई मशीनसाठी पात्र १0२ महिला व सायकलसाठी पात्र ८ लाभार्थी विद्यार्थिनींची निवड जिल्हा परिषदेने केली आहे; मात्र या यादीतील तब्बल ९६ महिला लाभार्थी व ८ विद्यार्थिनींना सदरचे साहित्य हे चिखली येथून वितरित न होता लोणार, मेहकर, सिं.राजा व दे.राजा येथील गोडाउनमधून पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना हे साहित्य मिळविण्यासाठी करावा लागणार्या खर्चाच्या तुलनेत थेट बाजारातून ते स्वखर्चाने विकत घेणे परवडणार असल्याने, लाभार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
लाभार्थ्यांना या माध्यमातून दिलासा मिळण्याऐवजी वेळ, पैसा मानसिक त्रास देण्याचा गंभीर प्रकार जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले यांच्याच तालुक्यात होत असल्याने, ही ससेहोलपट दूर करावी, अशी मागणी लाभार्थ्यांमधून होत आहे. गरीब वर्गातील महिलांना जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत शिलाई मशीनचे वाटप करण्यात येते. त्याचप्रमाणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील शालेय मुलींना सायकल वाटप करण्यात येते; मात्र या योजनेचा आतापर्यंतचा प्रवास आणि झालेल्या वाटप यंत्नणेचा अनुभव पाहता अनेकदा घोळ झाल्याचे उघड झाले आहे.
पात्न लाभार्थीच्या यादीनुसार वाटप होत नाही, वशिलेबाजी होते. जि.प.महिला व बाल कल्याण विभागाकडे सन २0१५-१६ च्या विशेष घटक योजना व जि.प.सेस फंडातून गोडाउन शिल्लक राहिलेले शिलाई मशीन व सायकलींचे वाटप करण्याचा ठराव १0 जुलै २0१७ च्या महिला व बालकल्याण समितीच्या सभेत घेण्यात आल्याने त्यानुसार लाभार्थ्यांंची निवड करण्यात आली आहे.
चिखली तालुक्यातील विविध गावांतील १0२ महिलांची शिलाई मशीनसाठी तर ८ विद्यार्थिनींची सायकलींसाठी निवड करण्यात आली आहे; मात्र या लाभार्थ्यांना हे साहित्य देऊळगावराजा, सिंदखेडराजा, मेहकर व लोणार येथील गोडाउनमधून वितरित करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जि.प.महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकार्यांनी पंचायत समितीस यादी देऊन पात्र लाभार्थ्यांंना सदर साहित्याचे वितरण करण्याबाबत कळविले आहे. शिलाई मशीनसाठी पात्र प्रत्येक महिलांकडून ७४१ रुपये लाभार्थी हिस्सा घेण्यात येणार आहे. ही शिलाई मशीन घेण्यासाठी लाभार्थी महिलेस ७४१ रुपयांचा डी.डी.काढणे, चिखली पंचायत समितीतून इतर तालुक्यात असलेल्या संबंधित गोडाउनची पास घेणे आणि त्यानंतर संबंधित गोडाउन जावून शिलाई मशीन मिळविणे या सर्व बाबींसाठी वेळ व अतिरिक्त प्रवास खर्च करावा लागणार आहे. या योजनेतून मिळणारे शिलाई मशीनची किंमत बाजारभावानुसार ३ हजार रुपये गृहीत धरली असता, यामध्ये लाभार्थी हिस्सा ७४१ रुपये वजा केल्यानंतर उरणारी रक्कम, त्यात गावाहून तालुक्याचे ठिकाण चिखली येथे आल्यानंतर बँकेतून डी.डी.काढणे, पंचायत समितीतून गेट पास बनविणे व त्यानंतर लोणार, मेहकर, सिं.राजा व दे.राजासारख्या ठिकाणी येथे जावून शिलाई मशीन घेणे या सर्व बाबींसाठी करावा लागणारा खर्च हा शिलाई मशीनच्या मूळ किमतीइतका किंबहुना त्यापेक्षा जास्तीचा होतो. त्यामुळे लाभार्थ्यांंमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
लाभार्थ्यांंसाठी योजना ठरते डोकेदुखी
तालुक्यातील महिला, विद्यार्थिनींना दिलासा मिळावा, यासाठी जि.प.महिला व बालकल्याण समितीच्या सभापती श्वेता महाले यांनी सभापतीपद मिळताच या योजनेंतर्गत शिल्लक साहित्य वाटपाबाबत उचित कारवाईचा योग्य निर्णय घेतला खरा; परंतु लाभार्थ्यांंची निवड झाल्यानंतर त्यांना साहित्य मिळविण्यासाठी करावी लागणारी कसरत पाहता लाभार्थ्यांंसाठी ही योजना डोकेदुखी ठरण्यासोबतच त्यांना आर्थिक व मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे.
यासंदर्भात जि.प.महिला व बाल कल्याण विभागाचे उप -कार्यकारी अधिकारी सुनील मेसरे यांना सदर लाभार्थ्यांंचे गेटपास वितरित करू नका, त्यांना एकाच ठिकाणी, एकाचवेळी साहित्य वितरित करू, असे स्पष्ट सांगितले होते. याशिवाय जे साहित्य वितरित होत आहे, ते विविध गोडाउनला पडून होते. आपण पुढाकार घेऊन या पडून असलेल्या साहित्याचा वापर व्हावा, या प्रामाणिक हेतूने ठराव घेऊन लाभार्थी निवड करण्यात आलेली आहे. सदर बाब गंभीर असून, या लाभार्थ्यांंना एकाच दिवशी एकाच ठिकाणावरून साहित्य वितरित करण्याची सूचना संबंधिताना दिल्या आहेत.
- श्वेता महाले, जि.प.सभापती, महिला व बालकल्याण.