साखर कारखाना खासगी तत्त्वावर सुरु करणार - डॉ. राजेंद्र शिंगणे
By admin | Published: May 26, 2017 01:21 AM2017-05-26T01:21:40+5:302017-05-26T01:21:40+5:30
सिंदखेडराजा : बुलडाणा जिल्ह्याचे वैभव असलेला जिजामाता सहकारी साखर कारखाना खासगी तत्त्वावर सुरु करणार असल्याची ग्वाही माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा : बुलडाणा जिल्ह्याचे वैभव असलेला जिजामाता सहकारी साखर कारखाना खासगी तत्त्वावर सुरु करण्यासाठी राज्य सहकारी बँकेसोबत चर्चा सुरु असून, त्यापूर्वी कामगारांच्या थकीत रकमेचा प्रश्न कामगार संघटनेशी चर्चा करून तो सोडविण्यात येईल. त्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, त्यातच त्यांचे फलीत आहे, असे प्रतिपादन विदर्भ मार्केटिंग कमिटीचे अध्यक्ष माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी केले.
जिजामाता सहकारी साखर कारखाना खासगी तत्त्वावर सुरू व्हावा, यासाठी डॉ.राजेंद्र शिंगणे आणि बुलडाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक यांनी पुढाकार घेऊन राज्य सहकारी बँकेसोबत चर्चा झाली असून, बुलडाणा अर्बनचे ५१ टक्के शेअर्स आणि ज्यांना यात भाग घ्यायचा असेल त्यांची एक कंपनी स्थापन करून कारखाना सुरु करण्याचा मनोदय आजच्या सर्वपक्षीय बैठकीतून निघाला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे हे होते, तर बैठकीला खा.प्रतापराव जाधव, आ.डॉ. शशिकांत खेडेकर, बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक, माजी आ.तोताराम कायंदे, नगराध्यक्ष अॅड. नाझेर काझी, कृषी सभापती दिनकरराव देशमुख, आशाताई झोरे, प्रदीप नागरे, जि.प.सदस्य राम जाधव, विनोद वाघ, शिवदास रिंढे, बद्री वाघ, संतोष खांदेभराड, वामनराव जाधव, गंगाधर जाधव, आत्माराम कायंदे, मन्नान कुरेशी, कामगार नेते गुलाबराव राठोड, प्रभाकर ताठे, डॉ.शिवाजी खरात, दीपक बोरकर यासह कामगार प्रतिनिधी, ऊस उत्पादक शेतकरी, पंचायत समिती सदस्य, सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ.शिंगणे म्हणाले की, साखर कारखाना सुरु झाला पाहिजे, हे बोलणे सोपे आहे; पण प्रत्यक्षात जेव्हा मी कारखाना सुरु केला, त्यात मला काय अडचणी आल्या, हे मलाच माहीत. राजकारणात सर्व सोंग करता येतं; पण पैशाचं सोंग करता येत नाही. पैशाचं सोंग फक्त भाईजीच करु शकतात. मागील काळात आमच्याकडून चुका झाल्या असतील! त्या चुकांचा पाढा वाचत बसल्यापेक्षा भविष्यात आपण शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी काय करु शकतो, यासाठीच जिजामाता सहकारी साखर कारखाना सुरु झाला पाहिजे, ही दूरदृष्टी प्रत्येकांनी ठेवावी, असेही मार्गदर्शन डॉ.शिंगणे यांनी केले.
आर्थिक क्रांती घडविणे हाच मुख्य उद्देश - राधेश्याम चांडक
सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्रांती घडविणे हा मुख्य उद्देश ठेवूनच कारखाना चालविला जाईल. त्यासाठी कामगारांनी चर्चेतून त्यांच्या देणीचा प्रश्न सोडवावा, त्यांची देणी निश्चित करावी, तरच बुलडाणा अर्बन पुढाकार घेऊन पुढचे पाऊल टाकेल. त्यात सर्वांना सोबत घेण्याची भूमिका राहील.