अंढेरा परिसरात पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा
By ram.deshpande | Published: July 26, 2017 01:38 AM2017-07-26T01:38:34+5:302017-07-26T01:38:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
अंढेरा : पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटला असला, तरी देऊळगाव राजा तालुक्यातील पाच गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट कायम असून, टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
परिसरातील अंढेरा, मेंडगाव, बायगाव, शिवणी आरमाळ, धोत्रा नंदई, नागनगाव या गावांना गेल्या २ ते ३ वर्षांपासून दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. यावर्षी अजूनही दमदार पाऊस झाला नसल्याने जमिनीतील जलसाठ्यात वाढ झाली नसल्याने पाणीटंचाईचे संकट कायम आहे. अंढेरा, शिवणी आरमाळ, मेंडगाव येथील धरणात आतापर्यंत जलसाठ्यात वाढ झाली नसून, सदर धरणात आतापर्यंत शून्य मृतसाठा आहे, तसेच परिसरातील पाझर तलावसुद्धा कोरडेच आहे.
शिवणी आरमाळ येथून परिसरातील अनेक गावांना पाणीपुरवठा होतो; परंतु धरणात पाणी नसल्यामुळे ग्रामपंचायतच्या अनेक योजना ठप्प पडल्या आहेत. अंढेरासह परिसरात पाटाचे पाणी येत असल्याने यावर्षी रब्बी पिकांवर मोठे संकट उभे ठाकले आहे. रब्बी पिकांना नगदी पिके म्हणून पाहिली जातात; परंतु पाणीच नसेल तर शेतकºयांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
परिसरातील अनेक गावांत पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. मेंडगाव, बायगाव, शिवणी आरमाळ, पाडळी शिंदे, पिंप्री आंधळे, धोत्रा नंदई, सावखेड नागरे या गावांमध्ये आतापर्यंत सर्वसाधारण पाऊस झाल्याने तूर, सोयाबीन, कापूस, उडीद, मूग ही खरिपाची पिके चांगली आहेत. आतापर्यंत परिसरात दमदार पाऊस झाला नसल्याने दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.
या गावांना होतो टँंकरने पाणी पुरवठा
अंढेरा गावासह परिसरातील पाडळी शिंदे, धोत्रा नंदई, नागणगाव या गावांना अजूनही टँकरने पाणीपुरवठा होत आहे. जुलै महिना संपण्याच्या मार्गावर असून, परिसरात आतापर्यंत दमदार पाऊस झाला नसल्याने या भागातील विहिरी, धरण, पाझर तलाव यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यातच परिसरात दमदार पाऊस झाला नसल्याने शिवणी आरमाळ, अंढेरा, मेंडगाव येथील धरणात पाणी नसल्याने हे प्रकल्प कोरडेच आहेत. येथून गावांना पाणीपुरवठा करण्यात योजना पाण्याअभावी बंद आहेत. जनावरांनासुद्धा पाण्यासाठी भटकंती करावी लागते.