नगराध्यक्ष हरीश रावळ यांना धमकी
By admin | Published: May 30, 2017 01:17 AM2017-05-30T01:17:08+5:302017-05-30T01:17:08+5:30
मलकापूर : २९ मे रोजी अॅड. हरीश रावळ यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आल्याने, त्यांनी याबाबतची तक्रार शहर पोलीस स्टेशनला दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : पूर्णा नदीपात्रात धुपेश्वर येथे बोटीद्वारे अवैधरीत्या रेती उपसा होत असताना पाणी दूषित होऊन मलकापूरवासीयांच्या आरोग्यास धोका होऊ नये व ती अवैध बोट बंद करावी, या मागणीसाठी नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ व सहकारी नगरसेवकांनी बेमुदत उपोषण केल्याने रेतीमाफियांचे पित्त खवळले. दरम्यान, २९ मे रोजी पोस्टकार्डद्वारे अॅड. रावळ यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र कार्यालयामध्ये आल्याने याबाबतची तक्रार त्यांनी शहर पोलीस स्टेशनला दिली आहे.
तक्रारीत नमूद केले आहे, की २९ मे रोजी पोस्टकार्डव्दारे धमकी देण्यात आली, की ‘हरीश रावळ तू स्वत: काय समजतो तुला माहीत नाही, तू कोणाबरोबर पंगा घेतला. रेतीच्या ठेक्यासाठी किती पैसे लागतात तुला माहीत तरी आहे का?’ रेतीच्या ठेक्यावर आंदोलन करून तू काय हिरो समजतो का?’ आमचे लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे, तुझे आम्ही काय करू हे तुला समजणार नाही तुला गाडीसह उडवून दिलं तर बाकीची जनता तुझ्यासोबत येणार का, आता पुढे तुझं काय होते ते पाय’ आली रे आली आता तुझी बारी आली’ असा मजकुराचे पोस्टकार्ड आॅफीसमध्ये आले, असे नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.