राज्यात वर्षभरात तीन हजार अवयव प्रत्यारोपण
By admin | Published: May 11, 2017 07:03 AM2017-05-11T07:03:06+5:302017-05-11T07:03:06+5:30
४२३ प्रत्यारोपण केंद्रांचा समावेश; अवयव दानातून जपली माणुसकी
नीलेश शहाकार
बुलडाणा : सामाजिक भान व माणुसकीचा धर्म जोपासत अवयव दानाची नवीन संकल्पना समाजात रुढ होत आहे.
मृत्यूनंतर डोळे, मुत्रपिंड, यकृतापासून थेट हृदयापर्यंत दान करून ह्यमरावे परि अवयव रूपाने उरावेह्ण या संकल्पनेतून इतरांना नवजीवन मिळत आहे. आरोग्य सेवा संचालनालयाने शासनाकडे सादर केलेल्या अहवालानुसार २०१६-१७ या वर्षात ३ हजार १५३ अवयव प्रत्यारोपणाची नोंद करण्यात आली आहे.
मानवाचे सत्कर्म त्याचे अस्तित्व मृत्यूनंतरही भूतलावर प्रदीर्घ काळ कायम ठेवते; परंतु प्राण गेल्यानंतरही अवयवांच्या रूपाने आणखी काही काळ मनुष्य ईहलोकी राहू शकतात, हे वैज्ञानिक सत्य आहे. अर्थात त्यासाठी अवयव दान हा पर्याय प्रत्येकाकडे उपलब्ध आहे. अवयवच नव्हे, तर संपूर्ण शरीरच दान करणाऱ्यांच्या सामाजिकतेला ईश्वरी कार्य म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
मानवी उपचारांकरिता तसेच मानवी अवयवांची व्यावसायिक विक्री रोखण्याकरिता तत्संबंधी मानवी अवयव काढणे, जतन करणे, प्रत्यारोपण करणे यांचे नियमन व नियंत्रण करण्यासाठी केंद्र शासनाने मानवी अवयव प्रत्यारोपण अधिनियम १९९४ लागू केला आहे. त्यामुळे अनुकूल कायदे, योग्य सरकारी धोरण, तत्पर आणि सुसज्ज रुग्णालये आणि माणुसकीची जाण ठेवणारे नागरिक यामुळे अवयव व देहदान करणारे पुढे येत आहेत.