आज लोणार सरोवर पर्यटन महोत्सव
By admin | Published: March 3, 2017 12:18 AM2017-03-03T00:18:34+5:302017-03-03T00:18:34+5:30
महोत्सवाच्या निमित्ताने झाली रंगरंगोटी : तयारीसाठी प्रशासनाची धावपळ
किशोर मापारी
लोणार - लोणार महोत्सवाला ३ मार्चपासून सुरुवात होत असून, त्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व नगर परिषद यांच्या प्रयत्नाने लोणार शहराची रंगरंगोटी झालेली आहे. सरोवर पर्यटन महोत्सव तयारीसाठी प्रशासनाची चांगलीच धावपळ होत असल्याचे दिसून आले.
जगात अस्तित्वात असलेल्या चारपैकी एक असे निसर्ग निर्मित लोणार सरोवर आहे. औरंगाबादपासून सुमारे १६० कि.मी., अकोलापासून १३० आणि बुलडाणापासून १०० कि.मी. अंतरावर हे लोणार सरोवर आहे. १७० ते २०० फुट व्यास असलेली, सुमारे २ कोटी टन वजनाची अशनी २० कि.मी. प्रतिसेकंद या वेगाने आदळून हे सरोवर तयार झाल्याचा अंदाज आहे. लोणार सरोवराचा परिघ हा सुमारे आठ किलोमीटर आहे, तर सर्व बाजूंनी ६० ते ७० अंश उतार असलेल्या सरोवरामध्ये १०० मीटर उतल्यावर साधारण चार किलोमीटरचा परिघ असलेले आणि समुद्राच्या पाण्यापेक्षा काही पट खारे असलेले खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. या विवराची खोली सुमारे १५० मीटर आहे, तर प्रत्यक्ष सरोवराची खोली काही मीटर म्हणजे ५ ते ६ मीटर आहे. सरोवरच्या परिसरात चांगले वन- जंगल असून, या सान्निध्यात १२ पुरातन म्हणजे किमान हजार वर्षांपूर्वी बांधलेली १२ अप्रतिम शिल्पाकृती मंदिरे भले मोडकळीला आलेली का असेना, पण ऊन वारा खात अजूनही तग धरून आहेत. या भागात असणारे जीवाणू, झाडे, प्राणी संपत्ती हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय ठरू शकेल, एवढी संपन्नता याठिकाणी आहे. सरोवराच्या काठावर असलेली मंदिरे व लोणार गावांमध्ये काही ठिकाणे ही न चुकता भेट द्यायला पाहिजेत, अशी आहेत. लोणार विवराकडे येणारा पाण्याचा एकमेव धावता स्रोत म्हणजे ‘धार ’ नावाचे ठिकाण जे गावाच्या वेशीवर लोणार विवराच्या एका बाजूला आहे. हे धार ठिकाण अप्रतिम मंदिर आणि शिल्पांनी बांधून टाकले गेले आहे. आवर्जून पहावे असे लोणार गावांतील दैत्यसुदन मंदिर. चालुक्य काळात १२ व्या शतकात हे मंदिर बांधले गेले असावे, असा अंदाज आहे. मंदिरात प्रखर अशा नजरेची विष्णूची मूर्ती असून, संपूर्ण मंदिर हे शिल्पांनी सजलेले आहे. विशेष म्हणजे विविध शिल्पेही या ठिकाणी पहायला मिळतात. या मंदिराचे वर्णन, अभ्यास हा एक स्वतंत्र विषय होऊ शकेल इतके हे मंदिर अप्रतिम आहे. मोठा मारोती. गावाच्या बाहेर साधारण नऊ फूट लांबीच्या झोपलेल्या म्हणजे आडवा असलेल्या हनुमान मंदिराचे ठिकाण आहे. खरं तर या ठिकाणाला धार्मिक स्थळाचे स्वरूप प्राप्त झाले असले, तरी हनुमान मूर्तीचा दगड किंवा तो परिसर विशेष चुंबकीय क्षेत्र दाखवतो. लोणार विवराच्या आघाताच्या वेळी चुंबकीय गुणधर्म असलेल्या अशनीचा काही भाग हा सध्या हे मंदिर असलेल्या ठिकाणी जाऊन पडला, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. हिंदू, जैन, मोगल, मराठा आणि इंग्रज अशा विविध शासकांचे राज्य या लोणारमध्ये गेल्या हजार शतकांपासून होते. त्यामुळे त्या-त्या राज्यकर्त्यांच्या खुणा या शिल्पे, मंदिरे आणि बांधकामांच्या स्वरूपात लोणारमध्ये कमी अधिक प्रमाणात अस्तित्वात आहेत.
----------
अप्रतिम शिल्पाकृती मोडकळीस
विवरामधील सरोवराच्या काठावर मोडकळीस आलेल्या पण अप्रतिम शिल्पाकृती असलेल्या १२ मंदिरांची जोपासना होताना दिसत नाही. लोणार गावांतील मंदिर-शिल्पाकृती बघण्यासाठी माहिती फलक आणि दिशादर्शक फलकांचा अभाव आहे. लोणार गावांमध्ये किंवा किमान लोणार विवराच्या बाजूला असलेल्या लोकवस्तीमध्ये हगणदरीमुक्त, स्वच्छ अभियान राबवण्याची आवश्यकता आहे.
----------
लोणार सरोवर अडकले समस्यात!
लोणारकडे येणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.
लोणार सरोवराबद्दल माहिती कुठे मिळेल, गाइड कुठे मिळेल, याची चौकशी करावी लागते.
शास्त्रोक्त आणि परिसरातील इतिहासाबद्दल माहिती देणारी पुस्तिका मिळत नाही.
लोणार सरोवरामध्ये उतरण्यासाठी एकमेव दगडी मार्ग आहे, पण आता नसल्यातच जमा आहे.
लोणारवासीयांच्या लोणार संवर्धनासाठी मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहेत.