सिंचन विहिरी अडकल्या तांत्रिक अडचणीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 01:40 AM2017-11-02T01:40:38+5:302017-11-02T01:41:03+5:30

बुलडाणा : धडक सिंचन विहीर योजनेतील जवळपास ९५२ विहिरी या तांत्रिक अडचणीत अडकल्या असून, त्या आता पूर्ण होणे जवळपास अशक्य असल्याचे चित्र आहे. असे असले तरी जिल्ह्यातील १६ हजार ९00 पैकी १३ हजार ५४७ विहिरी पूर्णत्वास गेल्याने शेतकर्‍यांना शाश्‍वत सिंचनाचा एक नवा मार्ग उपलब्ध झाला आहे.

Troublesome technical problems in irrigation well | सिंचन विहिरी अडकल्या तांत्रिक अडचणीत!

सिंचन विहिरी अडकल्या तांत्रिक अडचणीत!

Next
ठळक मुद्देमुदतवाढीचा पाठवला प्रस्ताव जिल्ह्याचा सिंचन अनुशेष मोठा

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : धडक सिंचन विहीर योजनेतील जवळपास ९५२ विहिरी या तांत्रिक अडचणीत अडकल्या असून, त्या आता पूर्ण होणे जवळपास अशक्य असल्याचे चित्र आहे. असे असले तरी जिल्ह्यातील १६ हजार ९00 पैकी १३ हजार ५४७ विहिरी पूर्णत्वास गेल्याने शेतकर्‍यांना शाश्‍वत सिंचनाचा एक नवा मार्ग उपलब्ध झाला आहे.
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात २0१0 मध्ये १६ हजार ९00 विहिरी करण्यास धडक सिंचन योजनेंतर्गत मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी जवळपास तीन हजार विहिरींची कामे रखडलेली होती. 
त्यामुळे त्यांच्यासाठी मुदतवाढीचा प्रस्ताव २0१५ मध्ये पाठविण्यात आला होता. यापैकी एक हजार ६६७ विहिरी पुर्णत्वास गेल्या आहेत, तर वर्तमानात रखडलेल्या सुमारे ३00 विहिरींसाठी नव्याने मुदतवाढीचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासाठी जवळपास ४२ कोटी सात लाख ९३ हजार रुपयांचा खर्च झालेला आहे. ७२ कोटी ९७ लाख ५0 हजार रुपयांचा निधी बुलडाणा जिल्ह्यास या कामासाठी मिळाला होता.

९५२ विहिरी ठरताहेत डोकेदुखी
धडक सिंचन योजनेंतर्गत ९५२ विहिरी प्रशासनाची चांगलीच डोकेदुखी ठरत आहे. विशेष म्हणजे ज्या शेतजमिनीत या विहिरी घेण्यात येणार होत्या, त्या जमिनीच संबंधितानी विकल्याच्या किंवा तांत्रिकदृष्ट्या तेथे विहीर घेणे शक्य नसणे तर विहीर बांधण्याचा मानसच संबंधित लाभार्थ्यांनी बदलल्यामुळे जिल्हा परिषद सिंचन विभागाची डोकेदुखी वाढली आहे. राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत या विहिरी येत असल्या तरी त्याची अंमलबजावणीची जबाबदारी ही जिल्हा परिषद सिंचन विभागाकडे आहे. 

३00 विहिरींचा प्रश्न मार्गी लागणार!
गेल्या सात वर्षांपासून धडक सिंचन विहीर योजना जिल्ह्यात सुरू आहे. २0१५ मध्ये नव्याने मुदतवाढ घेत दोन हजार ९१९ विहिरींची कामे सुरू करण्यात आली होती. त्यापैकी वर्तमान स्थितीत ३00 विहिरींची कामे बाकी असल्याने त्यांच्यासाठी मुदतवाढीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. 

सिंचन अनुशेष मोठा
बुलडाणा जिल्ह्याचा सिंचन अनुशेष मोठा असल्याने धडक सिंचन विहिरींतर्गत शेतकर्‍यांना त्यांच्या शेतातच सिंचनाचा एक शाश्‍वत मार्ग उपलब्ध होत असल्याने या योजनेवर राज्य शासनाने जोर दिला होता. बुलडाणा जिल्ह्याच दृष्टीने ही योजना महत्त्वाची आहे.  एकटा जिगाव प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास बुलडाणा जिल्ह्याचा नव्हे तर अमरावती विभागाचा सिंचन अनुशेष दूर होण्यास मदत होणार आहे. तसेच झाल्यास महत्तम ३१ सिंचन क्षेत्राच्या आसपास जिल्हा पोहोचेल; मात्र प्रदीर्घ कालावधीपासून या प्रकल्पाचेही काम रखडलेले आहे. त्यामुळे या सिंचन विहिरी शेतकर्‍यांसाठी मोठा आधार ठरणार्‍या आहेत.

Web Title: Troublesome technical problems in irrigation well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.