लोणार तालुक्यातील सात गावात हायड्रोकार्बन शोधाच्या दृष्टीने प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 02:39 PM2017-11-22T14:39:01+5:302017-11-22T14:41:16+5:30
लोणार : हायड्रोकार्बनच्या शोधाच्या दृष्टीने लोणार तालुक्यात लवकरच सर्व्हे सुरू होत असून तालुक्यातील जवळपास आठ गावांच्या शेतशिवारामध्ये त्या दृष्टीने प्रयत्न होणार आहे.
लोणार : हायड्रोकार्बनच्या शोधाच्या दृष्टीने लोणार तालुक्यात लवकरच सर्व्हे सुरू होत असून तालुक्यातील जवळपास आठ गावांच्या शेतशिवारामध्ये त्या दृष्टीने प्रयत्न होणार आहे. २०२२ पर्यंत कच्च्या तेलाची देशात दहा टक्के आयात कमी करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारचे प्रयत्न आहे. त्याचा एक भाग म्हणून हायड्रोकार्बन मिळण्याच्या संभाव्यते बाबत कृष्णा-गोदावरी खोर्यात सध्या शोध घेण्यात येत आहे.
लोणार तालुक्यातील येवती, बिबखेड, तांबोळा, हत्ता, हिवराखंड, ब्राम्हणचिकना, खापरखेड, महारचिकना, खळेगाव ही गावे यासाठी निश्चित करण्यात आली असल्यची माहिती आहे. महसूल आणि वनविभागाचे उपसचिव यांनी यासंदर्भात लोणार तहसिल कार्यालयाला याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार देशातील गाळयुक्त अज्ञात खोर्यामध्ये हायड्रोकार्बन साठ्यांची शक्यता तपासण्याच्या दृष्टीने हा सेस्मीक सर्व्हे (हायड्रोकार्बनचा शोध घेण्यासंदर्भातील प्रक्रिया) करण्यात येत आहे. तेल व नैसर्गिक वायू महामंडळातंर्गत हे काम होत आहे.
लोणार तालुक्यातील जमिनीखाली पेट्रोलियम पदार्थांचे साठे सापडू शकतात. त्यांचा शोध घेण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निर्देशानुसार गोदावरी खोर्याचा भाग असलेल्या लोणार तालुक्याच्या पट्टयात त्याबाबत चाचपणी करण्यात येत आहे. या जमिनीखालील खडकांचे नमूने गोळा करण्यास सुरूवात झाली आहे.
७० टक्के तेलाची आयात
देशात ७० टक्के खनीज तेलाची आयात आज घडीला केली जाते. २०२२ पर्यंत यामध्ये दहा टक्क्यांनी घट करण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यानुषंगाने देशातील ज्या भागात यापूर्वी असे सर्व्हे झाले नाहीत त्या भागात त्याचा शोध घेऊन देशांतर्गत तेलसाठे शोधण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचाच हा एक भाग आहे. सोबतच स्वच्छ इंधनाचे स्त्रोत म्हणून नैसर्गिक वायूला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सिमेंट, खत, स्टील उद्योगात इंधन म्हणून नैसर्गिक वायूचा वापर शक्य आहे, अशी माहिती भाजपा तालुका सरचिटणीस प्रकाश माधवराव नागरे यांनी दिली.