यवतमाळातून जप्त केलेली कागदपत्रे आज बुलडाण्यात आणणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 01:54 AM2017-11-07T01:54:27+5:302017-11-07T01:58:17+5:30
जिगाव प्रकल्पाचे काम मिळवून देण्यासाठी यवतमाळ येथील बाजोरिया कन्स्ट्रक्शनला बनावट कागदपत्रे मिळवून देत, शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने व्यापक स्तरावर शोध मोहीम सुरू आहे. दरम्यान, यवतमाळ येथून जप्त केलेली कागदपत्रे मंगळवारी येथे एक पथक घेऊन येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा/खामगाव : जिगाव प्रकल्पाचे काम मिळवून देण्यासाठी यवतमाळ येथील बाजोरिया कन्स्ट्रक्शनला बनावट कागदपत्रे मिळवून देत, शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने व्यापक स्तरावर शोध मोहीम सुरू आहे. दरम्यान, यवतमाळ येथून जप्त केलेली कागदपत्रे मंगळवारी येथे एक पथक घेऊन येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, यवतमाळ येथील जीवन प्राधिकरणकडून देण्यात आलेली कागदपत्रे आणि प्रत्यक्ष बाजोरिया कन्स्ट्रक्शनने जिगाव प्रकल्पाचे काम मिळावे, यासाठी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये तफावत आढळली आहे. नाशिक आणि नांदेड येथील आरोपींचा तूर्तास माग लागला नाही. मात्र, त्यांच्या घराची झडती आणि कागदपत्रे जप्त करण्याच्या दृष्टीने कारवाई सुरू आहे.
तपासणी समितीत होते मतभेद!
बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीला कंत्राट देण्यासाठी बनावट प्रमाणपत्र तयार करताना पूर्व अर्हता तपासणी समितीत मतभेद होते. या समितीतील एक-दोन जणांनी उपरोक्त प्रस्तावाला विरोध दर्शविला असल्याचीही माहिती समोर आली आहे.
न्यायालयाने ‘एसीबी’सह पोलिसांना मागितला ‘से’!
दरम्यान, या प्रकरणातील आरोपी मन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता मुंदडा यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला, तर न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणाबद्दल शहर पोलीस व एसीबीला याबाबतचे म्हणणे १५ नोव्हेंबरला सादर करण्याचा आदेश दिला आहे.
चौकशीचा खंडपीठाने दिला होता आदेश
या प्रकरणात यवतमाळ येथील अतुल जगताप यांनी नागपूर खंडपीठात २0१६ मध्ये याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन खंडपीठाने १ नोव्हेंबर २0१७ रोजी चार आठवड्यात प्रकरणाची चौकशी करून प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला होता.
नऊ पथकांकडून चौकशी!
या प्रकरणाचा तपास सुरू असून, अमरावती येथील चार, अकोला येथील दोन, यवतमाळ, बुलडाणा, वाशिममधील प्रत्येकी एक पथक प्रकरणाची चौकशी करीत असून, पुणे, यवतमाळ, नांदेड आणि नाशिक येथे सध्या ही पथके डेरेदाखल झालेली आहेत. सर्व आरोपी फरार झालेले आहेत.
-