नवी दिल्ली, दि. 24 - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 200 रुपयांची नोट उद्यापासून चलनात येणार असल्याची माहिती दिली आहे. 200 रुपयांची नोट चलनात आल्यामुळे नोटाबंदीनंतर निर्माण झालेला कॅश तुटवडा भरुन काढण्यात मदत मिळणार आहे. अर्थ मंत्रालयाने नवी नोट चलनात आणणार असल्याची माहिती दिली असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोटेची डिझाईन रिलीज केली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अर्थ मंत्रालयाशी चर्चा केल्यानंतर मार्च महिन्यातच ही नवी नोट आणण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सुरक्षा चाचण्या आणि प्रिंटिंग प्रेसमधील क्वालिटी तपासल्यानंतरच ही नोट चलनात आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, काळा पैसा, भ्रष्टाचार रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. 200 रुपयांच्या सुमारे 50 कोटी नोटा बाजारात आणण्यात येणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.
RBI Introduces ₹ 200 denomination banknotehttps://t.co/xmDfAo9cBa
— ReserveBankOfIndia (@RBI) August 24, 2017
नोव्हेंबर महिन्यात नोटाबंदीची घोषणा करण्यात आल्यानंतर नव्याने चलनात येणारी ही तिसरी नोट आहे. नोटाबंदीची घोषणा करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000 रुपयाच्या नोटांवर बंदी घातली होती. यानंतर 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणण्यात आल्या होत्या. सध्या 100 रुपये ते 500 रुपयांमधील कोणतीही नोट सध्या चलनात उपलब्ध नाही. त्यामुळे रिझर्व्ह बँकेचे असे म्हणणे आहे की, 200 रुपयांची नोट व्यवहारात आल्यास फायदेशीर ठरेल आणि यामुळे नोटांची उपलब्धता सुनिश्चित होण्यास मदत होणार आहे
एटीएममध्येही मिळणार दोनशे रूपयांची नोट
दोनशे रूपयांची नोट एटीएममध्ये उपलब्ध होणार नाही, असं वृत्त काही दिवसांपूर्वी आलं होतं. पण नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार दोनशे रूपयांची नोट एटीएममध्ये उपलब्ध होणार आहे. 500 आणि 2 हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या त्यावेळी एटीएम मशिनमध्ये बदल करावे लागले. कारण या नोटांच्या आकारात बदल होता. मात्र सध्या चलनात असलेल्या नोटांएवढाच आकार 200 रुपयाच्या नोटांचा असणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे एटीएममध्ये काहीही बदल करण्याची गरज भासणार नाही.