नवी दिल्ली: सामान लवकरात लवकर ग्राहकांपर्यत पोहोचवण्यासाठी अॅमेझॉननं आपल्या कर्मचाऱ्यांना अनोखा प्रस्ताव दिला आहे. नोकरी सोडा आणि आमच्यासोबत व्यवसाय करा, असा प्रस्ताव अॅमेझॉनकडून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यासाठी कंपनीनं कर्मचाऱ्यांना आर्थिक मदतदेखील देऊ केली आहे. या नव्या धोरणाची घोषणा आजच कंपनीकडून करण्यात आली.
अॅमेझॉनकडून प्राइम मेंबरशिप दिली जाते. या अंतर्गत येणाऱ्या ग्राहकांना वेगवान सेवा दिली जाते. सध्या अशा ग्राहकांपर्यंत दोन दिवसांमध्ये सामान पोहोचतं. मात्र हा कालावधी एका दिवसावर आणण्याचं उद्दिष्ट कंपनीनं ठेवलं आहे. त्यासाठी कंपनीनं नवी योजना आखली आहे. सामानाच्या डिलिव्हरीसाठी स्टार्ट अप कंपनी सुरू करण्याचं आवाहन अॅमेझॉननं कर्मचाऱ्यांना केलं आहे. या स्टार्ट अप कंपनीत अॅमेझॉन 10 हजार डॉलरपर्यंतची गुंतवणूक करणार आहे.
नोकरी सोडून व्यवसाय करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अॅमेझॉन तीन महिन्यांचा पगारदेखील देणार आहे. पार्ट टाइम आणि फुल टाइममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीनं ही 'बिझनेस ऑफर' दिली आहे. गोदामांमध्ये ऑर्डर पॅक करणाऱ्या कर्मचाऱ्यांनादेखील या ऑफरचा लाभ घेता येईल. यामधून नेमक्या किती कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडून व्यवसाय करणं अपेक्षित आहे, यावर भाष्य करणं अॅमेझॉनकडून टाळण्यात आलं. कोणीही व्यक्ती स्वतंत्र अॅमेझॉन डिलेव्हरी बिझनेस सुरू करू करण्यासाठी अर्ज करू शकते, अशी घोषणा कंपनीनं गेल्याच वर्षी केली होती. सामानाच्या डिलेव्हरीसाठी पोस्ट किंवा इतर सेवांवर असलेलं अवलंबित्व कमी करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.
नोकरी सोडा, पैसे घ्या, आमच्यासोबत बिझनेस करा; अॅमेझॉनची अमेझिंग ऑफर
व्यवसायासाठी अॅमेझॉन करणार अर्थसहाय्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 09:16 PM2019-05-13T21:16:29+5:302019-05-13T21:20:45+5:30