मुंबई : सावधान, दूरसंचार क्षेत्रात एकाधिकारशाही येण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. हे क्षेत्र ‘आयसीसीयू’मध्ये असून, त्यामुळे सरकार आणि कर्जदात्या बँकांची जोखीम वाढणार आहे, असा इशारा प्रख्यात उद्योगपती अनिल अंबानी यांनी दिला आहे.
अनिल अंबानी यांचे मोठे बंधू मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओचे दूरसंचार क्षेत्रात आगमन झाल्यानंतर या क्षेत्रातील दर प्रचंड प्रमाणात घसरले आहेत. जुन्या कंपन्या संकटात सापडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अनिल अंबानी यांनी हे वक्तव्य केले आहे.
रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या (आरकॉम) वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अनिल अंबानी म्हणाले की, वायरलेस अथवा मोबिलिटी क्षेत्र सध्या बिकट परिस्थितीतून जात आहे. ते जनरल वॉर्डात नाही, तसेच आयसीयूमध्येही नाही. ते ‘आयसीसीयू’मध्ये आहे. सध्याच्या स्थितीमुळे महसुलाच्या बाबतीत सरकारला पद्धतशीर धोका निर्माण झाला आहे.
आपल्या बँकिंग व्यवस्थेसाठीही ही धोकादायक स्थिती आहे. या स्थितीचे वर्णन मी ‘सर्जनात्मक विध्वंस’ (क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन) असे करेन.
या क्षेत्रातील सेवादाता कंपन्यांची संख्या एकेकाळी डझनभर होती. ती आता सहावर येत आहे. स्पर्धात्मकता संपली आहे. बहुतांश जागतिक कंपन्या भारतातून निघून गेल्या आहेत. मोठ्या प्रमाणातील पैशांवर पाणी सोडून या कंपन्या भारत सोडत आहेत. बाजाराच्या शक्तीमुळे त्यांना बाहेर पडावे लागत नसून अन्य घटक त्याला कारणीभूत आहेत, असे त्यांनी सांगितले.
अनिल अंबानी म्हणाले की, रिझर्व्ह बँकेने एप्रिलमध्ये इशारा जारी केल्यानंतर दूरसंचार क्षेत्राला नवे कर्ज देणे बँकांनी थांबविले आहे. या क्षेत्राला थोड्या थोडक्या नव्हे, वर्षाला १ लाख कोटींच्या गुंतवणुकीची गरज आहे.
गुंतवणुकीअभावी सेवेचा दर्जा कसा काय टिकविता येणार? ग्राहक हा राजा असावा आणि बाजारात अनेकाधिकारशाही असावी, द्वैधिकारशाही असावी की एकाधिकारशाही हे आपल्याला ठरवावे लागेल.
आरकॉमला मिळाली सवलत
अंबानी यांनी सांगितले की, आरकॉमवर ४५ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. कंपनीला डिसेंबरपर्यंतची सवलत मिळाली आहे.
चीनसह सर्व कर्जदात्यांचा कंपनीला पाठिंबा आहे. आमच्यासमोर अनेक पर्याय आहेत. या वित्तवर्षाच्या अखेरपर्यंत आम्ही योग्य तोडगा काढू.
सावधान, दूरसंचार क्षेत्रात एकाधिकारशाही येतेय! अनिल अंबानी यांचा इशारा
सावधान, दूरसंचार क्षेत्रात एकाधिकारशाही येण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. हे क्षेत्र ‘आयसीसीयू’मध्ये असून, त्यामुळे सरकार आणि कर्जदात्या बँकांची जोखीम वाढणार आहे, असा इशारा प्रख्यात उद्योगपती अनिल अंबानी यांनी दिला आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 02:28 AM2017-09-28T02:28:36+5:302017-09-28T02:28:48+5:30