मुंबई : देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पाच ठिकाणी क्रुझ पर्यटनाची तयारी सुरू असून, त्यात मुंबईचाही समावेश आहे. त्याखेरीज गोवा, चेन्नई, मंगळुरू व कोच्ची या बंदरांचा पुढील दोन ते तीन वर्षात विकास केला जाणार आहे. त्यासंबंधीचे धोरण केंद्रीय पर्यटन व नौवहन (शिपिंग) विभाग तयार करीत आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
इटालीच्या कोस्ता कंपनीचे १६०० प्रवासी क्षमता, १३०० चौरस मीटर व १४ मजले असलेले क्रुझ जहाज शुक्रवारी मुंबईच्या बंदरात दाखल झाले. हे जहाज पहिल्यांदाच ‘होमपोर्टिंग’ अर्थात मोठ्या कालावधीसाठी येथे दाखल झाले आहे. त्यानिमित्ताने रावल यांनी या जहाजावरच क्रूझ पर्यटनाची माहिती पत्रकारांना दिली.
मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनीही क्रुझ पर्यटनावर प्रकाश टाकला. अशा क्रुझ श्रेणीतील ९०० जहाजे भारतातील बंदरात
येऊ शकतात. त्या माध्यमातून ४० लाख प्रवाशांची ये-जा होईल. त्यातून अडीच लाख थेट रोजगार तयार होऊ शकेल. मुंबई बंदरात ८० जहाजांची क्षमता असून दरवर्षी ६० जहाजे येतात. मात्र आता बंदराचा विस्तार केला जाणार आहे. त्यानंतर २०० भव्य जहाजे येथे येऊ शकतात, असे ते म्हणाले.
राज्याच्या पर्यटन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, महाव्यवस्थापिका स्वाती काळे, कोस्ता क्रुझेसच्या भारतातील प्रतिनिधी नलिनी गुप्ता, जहाजाचे कॅप्टन स्टेफनो वोकासे यांच्यासह अन्य अधिकारी या वेळी उपस्थित होते.
>जानेवारीपासून
फ्लोटिंंग रेस्टॉरंट
जानेवारीपासून मुंबईच्या समुद्रात तीन फ्लोटिंग रेस्टॉरंट सुरू होतील. त्यापैकी एक गेट वेला असेल, अशी माहिती भाटिया यांनी दिली.
मुंबईच्या पूर्व समुद्रात
एप्रिलपासून रोपॅक्स फेरी सुरू होईल. त्यासाठी नेरूळ, जेएनपीटी व मांडवा बंदरांचा विकास केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
पाच ठिकाणी होणार ‘क्रुझ’ पर्यटन, मुंबईसह गोवा, चेन्नई, मंगळुरू व कोच्ची या बंदरांचा तीन वर्षांत विकास
मुंबई : देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पाच ठिकाणी क्रुझ पर्यटनाची तयारी सुरू असून, त्यात मुंबईचाही समावेश आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 03:36 AM2017-11-25T03:36:44+5:302017-11-25T03:36:55+5:30